Sunday, 15 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पश्चिम आशियातल्या युद्धाची झळ देशातल्या नागरिकांना बसू नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पंतप्रधानानंचं प्रतिपादन

·      गॅस सिलिंडरची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन

·      राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं आयोजन

·      नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रदान

आणि

·      बीड आणि परभणीसह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

****

पश्चिम आशियातल्या युद्धाची झळ देशातल्या नागरिकांना बसू नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल आसाममध्ये सिल्चर जिल्ह्यात विविध विकास कामांची दूरस्थ पद्धतीने पायाभरणी केल्यावर ते बोलत होते. देशातल्या नागरिकांवर या युद्धाचा कमीत कमी प्रभाव पडावा, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

शिवालिक आणि नंदा देवी, या दोन भारतीय जहाजांनी, काल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे सुरक्षितपणे मार्गक्रमण केलं. जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिल्लीत आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दोन जहाजांवरून ९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी आयात केला जात आहे. ही जहाजे उद्या आणि परवा गुजरातमधल्या मुंद्रा आणि कांडला बंदरांवर पोहोचतील, असं सिन्हा यांनी सांगितलं.

****

गॅस ग्राहकांनी गॅस सिलिंडरची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी, असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. राज्य सरकारांकडे व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध असून, आता २९ राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचं वितरण सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. गॅस वितरकांच्या दुकानांबाहेर रांगा लावण्याची काहीही आवश्यकता नसल्याचं शर्मा यांनी नमूद केलं, त्या म्हणाल्या…

बाईट- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा

****

एलपीजीच्या वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा जाणीवपूर्वक करण्यात आलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. ते काल रत्नागिरी इथं संबंधित विभागाच्या बैठकीत बोलत होते. असा दिरंगाईचा प्रकार आढळल्यास संबंधित कंपन्या किंवा व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. शासनाने १३ मार्च रोजी गॅस वितरणाची मार्गदर्शक तत्त्वं ठरवली असून, त्यानुसार वितरण केलं जाणार असल्याचं, सामंत यांनी नमूद केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅस पुरवठा नियमित सुरू असून, कुठेही टंचाई नसल्याचं, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितलं. गॅस एजन्सीतर्फे व्यवस्थित गॅस पुरवठा सुरू असून, जिल्ह्यात कुठेही काळाबाजार होत असल्याचं वृत्त नसल्याचं, ते म्हणाले. जिल्ह्यात भरारी पथकाने आतापर्यंत ४६ एजन्सीची तपासणी केल्याची माहिती फुलारी यांनी दिली.

****

गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं दहा भरारी पथकं तैनात केली आहेत.

बीड शहरात शिवनेरी नगर परिसरात एका घरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अवैध साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, हा साठा जप्त करण्यात आला आहे.

****

२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अ‍ॅडव्हान्स टॅक्स ई-कॅम्पेन अंतर्गत करदात्यांना पाठवलेल्या काही ईमेल संदेशांबाबत प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण जारी केलं आहे. तांत्रिक त्रुटीमुळे काही करदात्यांना "महत्त्वपूर्ण व्यवहारांची" चुकीची माहिती असलेले ईमेल प्राप्त झाले असतील, तर अशा करदात्यांना त्‍या ईमेलकडे दुर्लक्ष करण्याची विनंती करण्यात आली आहे.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘फास्टटॅग’ वार्षिक पासचे दर अडीच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन हजार रुपयांत मिळणारा हा वार्षिक पास आता ३ हजार ७५ रुपयांना मिळणार आहे. येत्या एक एप्रिलपासून हे नवे दर लागू होतील.

****

राज्यात काल ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं. महसूल, आरोग्य, पुरवठा, महिला आणि बालविकास, ग्रामविकास आणि पंचायतराज, शिक्षण, कृषी, वनविभाग, भूमी अभिलेख, आदी विभागांच्या माध्यमातून विविध सेवा देण्यात आल्या.

बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातल्या हिरडव इथं महाराजस्व अभियानाचं उद्घाटन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी साहेबी थाट बाजूला सारून जनतेचं काम करावं, असं त्यांनी सांगितलं. या शिबिरात महसूल विभागासह इतर १५ हून अधिक विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ग्रामीण जनतेने या अभियानाचा लाभ घ्यावा, असं आवाहन जाधव यांनी केलं. ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव

****

परभणी जिल्ह्यातल्या सिंगणापूर महसूल मंडळातही काल महाराजस्व समाधान शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात एकाच दिवसात एक हजार ४१ लाभधारकांना लाभ वितरित करण्यात आले. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि सिंगणापूर इथल्या प्रशासक तथा सरपंच शारदा खिल्लारे यांच्यासह अनेक अधिकारी या शिबीरात उपस्थित होते. 

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या राणी उंचेगाव इथं काल घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात ७२० नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ देण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटावेटर तसच इतर कृषी उपकरणांचं वाटप करण्यात आलं.

****

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा कार्यक्षम खासदार पुरस्कार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना काल प्रदान करण्यात आला. नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन निंबाळकर यांना गौरवण्यात आलं. लोकशाही ही लोकांसाठी समर्पित असली पाहिजे, मतदारांनी आर्थिक प्रलोभनाने केलेलं मतदान गैरव्यवहारास प्रवृत्त करतं, असं मत खासदार निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशित असलेल्या गावातल्या नागरिकांचा वाघ- बिबट्यांच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा, यासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करत अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. पिपरिया या गावाजवळ तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसंच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

****

युवा वर्गामध्ये वाचनाची ओढ निर्माण करण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वपूर्ण ठरतात, असं मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यात औसा इथं, दोन दिवसीय लातूर जिल्हा ग्रंथोत्सव आणि ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मराठवाड्यातल्या सुमारे साडे तीनशे शाळा आणि महाविद्यालयांना प्रत्येकी ३६ हजार रुपयांची ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिल्याचं काळे यांनी सांगितलं.

****

परभणी विधानसभा क्षेत्रात मतदार यादी अचूक तसंच अ‌द्ययावत ठेवण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केलं आहे.

****

शासनाच्या अमृत संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित ‘अमृत पेठ’ मेळाव्याचा आज समारोप होत आहे. स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना आणि स्थानिक कारागिरांना बाजारपेठ मिळवून देणं हा या मेळाव्याचा उद्देश आहे. स्थानिक उद्योजक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांच्या विविध उत्पादनांची दालनं या मेळाव्यात असतील. शहराच्या बीड बायपास परिसरातल्या शिवम् मंगल कार्यालयात हा मेळावा भरवण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून थकीत कराच्या वसुलीसाठी धडक मोहीम सुरु आहे. या मोहीमेत काल तीन मालमत्ता जप्त करण्यात आल्या. चार मार्च २०२६ पासून महानगरपालिकेनं मालमत्ताकर थकवलेल्या ३४ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

****

जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांना काल जर्मनीच्या शिष्टमंडळाने भेट दिली. अजिंठा लेणीतील चित्रकला आणि शिल्पकृती पाहून या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुढाकारातून या शिष्टमंडळाचा दौरा आखण्यात आला. राज्यातले शेतकरी, ग्रामीण भागातले पर्यटक, उद्योजक तसंच महिलांसाठी पर्यटनाशी संबंधित विविध उद्योग आणि व्यवसायाच्या संधी, आपल्या विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं, पर्यटन विभागाचे उपसंचालक विजय जाधव यांनी सांगितलं.

****

 

हवामान

येत्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात पुणे, सिंधुदुर्ग, नाशिकचा घाटमाथा इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड आणि परभणीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...