Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०६ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
शेती आणि ग्रामीण परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर
वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत शेती, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि ग्रामीण उपजीविका
या चार मुख्य क्षेत्रांवर आठ वेगवेगळ्या सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण महिला
उद्योजक, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रातली गुंतवणूक यांसारख्या
विषयांवरही या वेबिनारमध्ये सविस्तर मंथन होणार आहे.
****
आसाममध्ये भारतीय हवाई दलाचं सुखोई-३० एम के आय लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान
कोसळून दोन पायलटचा मृत्यू झाला. जोरहाट इथल्या हवाई दलाच्या तळापासून ६० किलोमीटर
अंतरावर कार्बी आंगलोंग इथं आज सकाळी ही दुर्घटना घडली. पायलट अनुज आणि पवेश दुरगकर यांचा या अपघातात मृत्यू झाला.
****
महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत
मंजुरी मिळाल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी काल वार्ताहरांना दिली. धर्म स्वातंत्र्य
अधिनियम २०२६ या नावानं हा कायदा असेल, या कायद्याचा शासन आदेश लवकरच निघेल
असं राणे म्हणाले. कोल्हापूरमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी शेंडा पार्कमधील 34 हेक्टर जमीन देण्याच्या
प्रस्तावालाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ
यांनी दिली.
****
राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या वर्षी जवळपास
चार लाख घरकुलांचं बांधकाम पूर्ण करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार
गोरे यांनी काल विधानपरिषदेत दिली. अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या
उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी राज्यातल्या २८ लाख २४ हजार ३८६ घरांना
मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी ३ लाख ९५ हजार २२२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले
असून हा एक विक्रम असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
कोल्हापुरातल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर आणि परिसराच्या
सुधारित विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. यासंदर्भात
काल शिखर समितीची बैठक झाली. मंदिराच्या या
नव्या विकास आराखड्याअंतर्गत १७० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर जुन्या राखड्याअंतर्गत
८० कोटी रुपये खर्चाची कामं प्रत्यक्षात सुरु झाली आहेत.
****
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत
तसंच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची
बैठक काल पार पडली. संदीप शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये ४८ लाख
कुणबी नोंदी आढळलेल्या असून, त्याआधारे एकूण १२ लाख ११ हजार ३०३
कुणबी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यापैकी
छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये दोन लाख ५७ हजार ८४ प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली
आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाऱ्या
शासन निर्णयाविरुद्धच्या न्यायालयीन याचिकांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
****
महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गामुळे परभणी जिल्ह्यातली
सुपीक आणि बागायती जमीन बाधित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असलेल्या चिंतेची दखल राज्य
सरकारने घेतली आहे. परभणीतल्या शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच
पुढील निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी दिलं. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डिपेक्स–२०२६ या राज्यस्तरीय प्रकल्प
प्रदर्शनाचं उद्घाटन काल मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडलं. अखिल भारतीय
विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट तसंच महाराष्ट्र शासनाच्या
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या
वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात राज्यभरातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले
४०० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.
****
बुलडाणा इथं आयोजित जिल्हा विक्री प्रदर्शन, मिनी सरस आणि पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. बचत गटांच्या वस्तू केवळ महोत्सवापुरत्या
मर्यादित न राहता त्या बाराही महिने ग्राहकांसाठी उपलब्ध राहिल्या पाहिजेत, असं ते म्हणाले. आठवडी बाजार, विविध महोत्सव, शिबिरे तसंच बचत गटांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचं
जाधव यांनी नमूद केलं.
****
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात फतियाबाद, पिसादेवी आणि गोपाळपूर मांडकी या गावांत महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत २९
जण वीजचोरी करताना आढळले. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रणरणत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात
भरवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment