Tuesday, 24 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातच अनुसूचित जाती किंवा जमाती हा दर्जा अस्तित्वात असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीनं ख्रिश्चन किंवा तत्सम धर्म स्वीकारल्यास त्याचा अनुसूचित जाती किंवा जमातीचा दर्जा समाप्त होतो, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. अशा प्रकारे धर्म बदलल्यास अनुसूचित जाति–जमाती संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण मागण्याचा अधिकारही समाप्त होतो, असंही न्यायालयानं नमूद केलं.

****

केंद्र सरकारच्या निरंतर प्रयत्नांमुळे देशातल्या शेतक-यांच्या उत्पन्नात उल्लेखनीय वाढ झाल्याचं, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. देशाचं कृषी बजेट एकोणीस हजार तीनशे सहा कोटी रुपयांवरून एक लाख तीस हजार कोटी रुपयांपर्यंत पोचल्याचं त्यांनी सांगितलं. २०१४ पासून देशात अन्नधान्याच्या उत्पन्नात चव्वेचाळीस टक्के वाढ झाल्याचंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

**

देशाच्या सहकार क्षेत्राला मजबुती देण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या पाच वर्षांत पाच लाख कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याची माहिती, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णन पाल गुर्जर यांनी लोकसभेत दिली. शेतक-यांच्या कल्याणाला मोदी सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून, सहकारी साखर कारखान्यांना मजबूत बनवण्याच्या दृष्टीनं सरकारनं एक योजना सुरू केल्याची आणि त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

भारतीय औषध नियंत्रकांनी वजन घटवणा-या जीएलपी १ आधारित औषधांची अनधिकृत विक्री आणि प्रचाराच्या विरोधात देखरेख वाढवली आहे. बाजारातली औषधांची दुकानं, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, ठोक विक्रेते आणि क्लिनिक्समध्ये आढळून येणारी या औषधांच्या जेनेरिक प्रकारांची वाढती उपलब्धता लक्षात घेत हे पाऊल उचलण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं घेण्यानं गंभीर दुष्परिणाम होतात, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आरोग्य विभागाच्या याबाबतच्या नियमांचं उल्लंघन करणा-यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

जागतिक क्षयरोग दिन आज पाळला जात आहे. “होय! आपण क्षयरोग संपवू शकतो” ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. या दिवशी क्षयरोगच्या आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक परिणामांबाबत जनजागृती केली जाते आणि जगभरात हा रोग नष्ट करण्यासाठी प्रयत्न वाढवण्याचं आवाहन केलं जाते.

जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आज नागरिकांना क्षयरोगाचं निर्मूलन करण्याचं आणि सर्वांसाठी, विशेषतः सर्वाधिक असुरक्षित घटकांसाठी उत्तम आरोग्य सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताने लक्षणीय प्रगती साधली असून, प्रतिबंध, निदान आणि उपचार या क्षेत्रांतल्या प्रयत्नांना अधिक बळकटी दिल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

**

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वाशीम इथं राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयात या रॅलीचा समारोप झाला. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ३२ हजारांहून अधिक संशयित रुग्णांची तपासणी फिरत्या क्षयरोग एक्स-रे व्हॅनद्वारे करण्यात आली.

****

ज्यादा पैसे देण्याचं आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या कंपन्यांच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावासाठी खुल्या करण्यासाठी कायदा तयार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य हेमंत ओगले यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. अशा जप्त केलेल्या मालमत्तांबाबत सहा ते सात वर्षे निकाल लागत नाही, त्यामुळे फसलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यात दिरंगाई होते, त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये न्यायालयांनी सहा महिन्यात निर्णय घ्यावा, अशा तरतुदीचा कायदा तयार होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

भंडारा जिल्ह्यात महसूल विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे. नागपूर वैद्यकीय मंडळामार्फत २२ कर्मचाऱ्यांची पुनर्तपासणी करण्यात आली असून, यात सात जणांची प्रमाणपत्रं बनावट असल्याचं उघड झालं आहे. यापैकी तीन अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ तर तीन जणांना निलंबित करण्यात आलं असून, एका नायब तहसीलदाराच्या बडतर्फीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्हा परिषदेंतर्गत चार विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीकरीता येत्या दोन एप्रिल रोजी जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. अर्थ, शिक्षण- आरोग्य, बांधकाम आणि समाजकल्याण या विषय समित्यांच्या सभापतींची यावेळी निवड होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...