Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा तूटीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर
· मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या इतर शहरांच्या विकासाचं नियोजन
· शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तर स्टार्टअपसाठी महाफंड स्थापन
· आकांक्षित जिल्हा योजनेचा विस्तार-बीड, जालना, परभणी तसंच हिंगोलीचा समावेश
· विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका-उद्योजकांकडून मात्र स्वागत
आणि
· इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज लक्ष्य सेनचा चीनच्या ली शी फेंगशी सामना
****
प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभावर आधारित राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प
आज सादर झाला. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री
आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेसमोर अर्थसंकल्प मांडला. आगामी आर्थिक वर्षात राज्याचं
महसुली उत्पन्न सहा लाख १६ हजार ९९ कोटी रुपये तर महसुली खर्च, सहा लाख ५६ हजार ६५१ कोटी रुपये असेल. राज्याची अंदाजे तूट ४० हजार ५५२ कोटी रुपये
राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सदर राजकोषीय तूट, नियमानुसार
स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात राज्यसरकार यशस्वी ठरल्याचं
सांगत,
जीएसटी संकलनात राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं.
जिल्हा वार्षिक योजनेत २१ हजार ८६७ कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीच्या घोषणेसोबतच, विकसित
महाराष्ट्र २०४७ चं व्हिजन डॉक्युमेंट यावेळी जाहीर करण्यात आलं, एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे राज्याची वेगाने वाटचाल सुरू असून, २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
इलेक्ट्रिक किंवा पर्यावरणस्नेही वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी
अशा वाहनांना रस्ते करात भरघोस सूट तर इतर वाहनांवरच्या करात मोठी वाढ मुख्यमंत्र्यांनी
प्रस्तावित केली. पात्र निकषांपेक्षा कमी मुद्रांकावर दस्त मंजुरीच्या दंडात मोठी वाढ
करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केलं आहे.
आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामं, आग्रा तसंच हरियाणात पानिपत इथं मराठा साम्राज्य स्मारक उभारणी, छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी, लोकसेवा
आयोगासह इतर माध्यमातून ७५ हजार पदांची भरती, प्रशासकीय
कामकाजाचं डिजिटायझेशन, कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर, नदीजोड प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा, पेयजल
पुरवठा,
पूर नियंत्रण, सांडपाणी पुनर्वापर, आरोग्य सेवा, आदी कामांसाठीच्या नियोजनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी
दिली.
बालकांसाठी पोषणक्षम आणि सुरक्षित वातावरण, महिला उद्योजकांना प्रोत्साहन, ज्येष्ठांना आरोग्यदायी सन्मानजनक
जीवनाची हमी,
एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण, शाश्वत आणि वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्यात येणार असून, येत्या वर्षात उमेद अंतर्गत आणखी २५ लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री
लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरोग्य सुविधांच्या समन्वयासाठी
शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना, शाश्वत शहरी विकासासाठी सक्षम
प्रादेशिक प्राधिकरणांची स्थापना, ५० पेक्षा अधिक सुनियोजित शहर
समूह विकास,
तसंच मालकी हक्कांचे वाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र भूमी हक्क
मालकी अधिनियम आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या
इतर शहरांच्या विकासाबाबत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात जाहीर केली. त्यासोबतच नियमित
कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी
केली. ते म्हणाले-
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (कर्जमाफी)
राज्यात एक हजार पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना
काँक्रीट रस्त्याने जोडण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. आशियाई विकास
बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवजला जाईल. छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळुज
औद्योगिक शहर या दरम्यान उन्नत मार्गाचं काम दोन टप्प्यात करण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गादरम्यान १९२ किलोमीटरच्या ग्रीनफील्ड
महामार्गाचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कल्याण
ते लातूर ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
राज्यातल्या एकूणच रस्ते विकासाबाबत मुख्यमंत्री म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (रस्ते विकास)
स्टार्टअप आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. पुढील
पाच वर्षात सव्वा लाख उद्योजक घडवणं, आणि ५० हजार स्टार्टअप्स ना बळ देण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे. नव
उद्योजकांसाठी मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (स्टार्टअप)
पुनावळे ते वासोटा किल्ला रोप वे प्रकल्प, नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं रामसृष्टी तसंच कालिदास सृष्टीची उभारणी, राज्यातल्या तिसऱ्या चित्रनगरीची रामटेक तालुक्यात उभारणी, पालघर जिल्ह्यात वाढवण इथं चौथी मुंबई विकसित करण्याचं नियोजन तसंच राज्यात दहा शैक्षणिक शहरं उभारण्यात
येणार असल्याचं सांगत, नवी
मुंबई विमानतळाजवळ देशातली पहिली एज्यु सिटी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी
केली. आकांक्षित जिल्हा तसंच आंकाक्षित तालुका विकास योजनेचा विस्तार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
अंदाजपत्रकीय भाषणात जाहीर केलं. ते म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (आकांक्षित जिल्हा)
२०२६-२७ हे महात्मा फुले यांचं दोनशेवं जयंती वर्ष, संत गाडगेबाबा यांचं दीडशेवं जयंती वर्ष, तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाचं शंभरावं
वर्ष आहे. यामुळे हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं
आहे.
हा अर्थसंकल्प सादर करतांना, दिवंगत उपमुख्यमंत्री तथा
अर्थमंत्री अजित पवार यांची आठवण म्हणून गुलाबी जाकीट परिधान केलेल्या
मुख्यमंत्र्यांनी, हा
अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांच्या
व्यक्तिमत्त्वाला साजेसं भव्य स्मारक तसंच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा
पुरस्कार सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर
केलं.
****
आगामी वर्षाचा अर्थसंकल्प व्हिजनरी तसंच विकसित महाराष्ट्र २०४७
कडे भक्कमपणे वाटचाल करणारा अर्थसंकल्प असल्याचं, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा अतिशय समर्पक
आणि सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, सुनील तटकरे तसंच धनंजय मुंडे
यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं.
****
ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत अंतिम आठ मध्ये
भारताच्या लक्ष्य सेनचा सामना आज रात्री चीनच्या ली शी फेंगशी होणार आहे. काल बर्मिंगहॅम
इथं झालेल्या सामन्यात लक्ष्यने हाँगकाँगच्या खेळाडूचा पराभव करत या स्पर्धेच्या उपांन्यपूर्व
फेरीत प्रवेश केला आहे.
****
No comments:
Post a Comment