Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण
· जल जीवन मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ
· लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू
· नांदेडसह अकरा अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांना राज्य सरकारची मंजुरी
आणि
· बीसीसीआयकडून टी ट्वेंटी विश्वविजेत्या संघाला १३१ कोटी रुपये बक्षीस जाहीर
****
देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. मुस्लिम महिलांबाबत भेदभाव होत
असल्यामुळे १९३७च्या शरियत कायद्यातल्या तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी करणारी एक याचिका सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती
जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती आर.महादेवन यांच्या पीठापुढे आली, यावरच्या सुनावणीत न्यायालयानं हे समान नागरी कायद्याबाबतचं हे निरीक्षण नोंदवलं.
सदर याचिकेतल्या मागणीप्रमाणे शरियत कायद्यातली वारसा हक्काची तरतूद रद्द केल्यास, मुस्लिम वारसाहक्कासंदर्भात कोणताही वैधानिक कायदा अस्तित्वात नसल्यानं, कायदेविषयक पोकळी निर्माण होईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं
आहे. या याचिकेसंदर्भात संसदेनं लक्ष घालण्याची सूचना न्यायालयानं केली आहे.
****
जल जीवन मिशन योजनेला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्याला
आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी
वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तामिळनाडूतल्या मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यालाही
आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
****
राज्यसभेत आज शून्य प्रहरामध्ये तृणमूल काँग्रेस सदस्य डेरेक
ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगानं विविध राज्यात राबवलेल्या मतदारयादी पुनरीक्षणाबाबत
चर्चा करण्याची मागणी केली, तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन
खरगे यांनीही निवडणूक प्रक्रियेतल्या सुधारणांबाबत चर्चा करण्याची मागणी केली. यानंतर
विरोधी पक्षांनी सभात्याग केला. चर्चा झालेल्या विषयांवर पुन्हा चर्चेची मागणी करून
सभात्याग करण्यामुळे विरोधी पक्षाला सदनात खऱ्या चर्चेत रस नसल्याचं दिसून येतं, अशी टीका सभागृह नेते जे.पी.नड्डा यांनी केली. ते म्हणाले -
बाईट – जे. पी. नड्डा
****
लोकसभेत आज अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव
सादर झाला. विरोधकांच्या गदारोळामुळे १२ वाजेपर्यंत तहकूब झालेलं सभागृहाचं कामकाज
पुन्हा सुरू झाल्यावर काँग्रेसचे खासदार डॉक्टर मोहम्मद जावेद यांनी हा प्रस्ताव मांडला.
पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी या चर्चेसाठी दहा तासांचा वेळ दिल्याचं सांगितलं, दरम्यान,
यावेळी अध्यक्ष बिर्ला स्वत: उपस्थित नसल्याबद्दल अनेक विरोधी
पक्ष सदस्यांनी आक्षेप घेतला.
काँग्रेसचे गौरव गोगोई, समाजवादी
पक्षाचे राजीव रॉय, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, द्रमुकचे टी आर बालू, तेलगूदेसमचे एल एस के देवरायलु, पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे आदींनी
या चर्चेत भाग घेतला.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, या प्रस्तावाचा विरोध करत, लोकसभा अध्यक्ष हे कायम निष्पक्षपणेच
काम करत असल्याचं सांगितलं.
****
केंद्र सरकारनं तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे
आदेश दिले आहेत. या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी वापरासाठी करण्याचे आदेशही
जारी करण्यात आले आहेत. साठवणूक आणि काळाबाजार टाळण्यासाठी दोन सिलिंडरमधल्या नोंदणीचा
कालावधी २५ दिवसांचा करण्यात आला आहे. दरम्यान, देशात
अंदाजे १९० कोटी मेट्रिक टनापेक्षा जास्त वापरायोग्य तेल इंधनसाठा, तसंच नैसर्गिक वायू इंधनाचा एक हजार ८०० अब्ज घनमीटरपेक्षा जास्त साठा उपलब्ध असल्याची
माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत दिली.
****
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही फक्त साडेसात अश्वशक्तीपर्यंत
वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
आहे. ते आज विधानसभेत सत्यजित देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. शेतकरी ग्राहकांनी
आवश्यक उपाययोजना करून हा वीज वापर या मर्यादेच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ
देण्यात येईल,
अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
विधानसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली. ज्येष्ठ नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, संजय
केळकर,
नितेश राणे, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, विनय कोरे, राहुल
कुल, यांच्यासह अनेक सदस्यांनी या
चर्चेत भाग घेतला.
****
केंद्र सरकारने नाफेडमार्फत एक पूर्णांक सदोतीस लाख मेट्रिक
टन आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ-एनसीसीएफ मार्फत एक पूर्णांक चाळीस लाख मेट्रिक
टन कांदा खरेदी केला आहे. मंत्री संजय सावकारे यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली.
कांद्याला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळावी, यासाठी
पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचं सावकारे यांनी सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विधानपरिषदेत झालेल्या
चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उत्तर दिलं. या चर्चेदरम्यान सर्व सदस्यांनी
मांडलेल्या सूचनांचा सकारात्मकपणे विचार करण्याची ग्वाही, सुनेत्रा
पवार यांनी यावेळी दिली. हरवलेल्या महिलांच्या शोधासाठी ऑपरेशन शोध एक आणि दोन अंतर्गत
एकंदर पाच हजार सहासष्ट महिला आणि दोन हजार सातशे एक्काहत्तर बालकांचा शोध लावल्याची
माहिती पवार यांनी दिली.
मुंबई महानगरपालिका कार्यालयात Come Early, Go Early या संकल्पनेनुसार ज्या महिला कर्मचारी सकाळी सव्वानऊ ते पावणे दहा या कालावधीत
कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटं काम करतील, तितकी
मिनिटं त्यांना कार्यालयातून लवकर निघण्याची, म्हणजे
तीस मिनिटांची सवलत देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री पवार
यांनी यावेळी केली.
****
राज्य मंत्रिमंडळानं राज्यात नांदेडसह अकरा अतिरिक्त जिल्हाधिकारी
कार्यालयं मंजूर केली आहेत. याशिवाय, जमावबंदी आयुक्तांकडे
दोन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पदं नव्यानं दिली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी पत्रकारांना ही माहिती दिली, ते म्हणाले -
बाईट - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
****
सफाई कर्मचारी यांच्या वारसांना लाड- पागे समितीच्या निर्देशनानुसार
नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनाने सफाई कर्मचारी म्हणून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती
द्यावी,
तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या विविध
आवास योजनेचा लाभ प्राधान्याने द्यावा असे निर्देश, राज्य
सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डांगोर यानी दिले. छत्रपती संभाजीनगर
इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिष्यवृत्ती, इतर आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक योजनांचा लाभ जिल्हा प्रशासनाने तसंच नगरपालिका, समाज कल्याण विभागाने एकत्रितपणे द्यावा, यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वय साधून काम करावे, असे
निर्देश डांगोर यांनी दिले.
****
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्हा
रुग्णालयात १४ मार्चपर्यंत जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त
नेत्र विभागात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी यावेळी बोलतांना, ४० वर्षे वय पूर्ण झालेल्या
प्रत्येक व्यक्तीने तसंच मधुमेही रुग्णांनी किमान सहा महिन्यांतून एकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडून
डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन केलं.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयनं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
जिंकणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटी रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. संघाचे १५ खेळाडू, प्रशिक्षक,
कर्मचारी आणि इतर सहाय्यकांमध्ये ही रक्कम वितरित केली जाणार
आहे.
****
No comments:
Post a Comment