Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम-अर्थसंकल्पावर चर्चेच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांचं
प्रतिपादन
· घरगुती गॅसच्या टंचाईबाबत राज्य सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात- विधानसभाध्यक्षांचे
निर्देश
· छत्तीसगडमध्ये सहा जिल्ह्यातल्या १०८ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
आणि
· लोकसभेत अध्यक्षांविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावरची चर्चा आजही सुरू
****
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम असून, आर्थिक शिस्तीचं पालन करत यंदाचा अर्थसंकल्प मांडल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील
चर्चेला उत्तर देत होते. राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात पाचव्या क्रमांकावर
आहे,
मात्र राज्याच्या जीडीपी वाढीचा दर देशाच्या जीडीपी वाढीच्या
दरापेक्षा जास्त आहे असं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सन २०१३-१४ ला राज्याचा जीएसडीपी १६ लाख कोटी होता तो आता ५१
लाख कोटींवर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा जीडीपीतला वाटा १४ पूर्णांक ३ दशांश टक्के
असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगातली तिसाव्या
क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यावरील कर्ज वाढलं आहे, मात्र राज्याचं कर्ज हे, सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या
२५ टक्क्यांच्या आत असणं आवश्यक असतं आणि महाराष्ट्रावरचं हे प्रमाण १८ टक्के असल्याचं
सांगत,
महाराष्ट्राची अजून कर्ज घेण्याची क्षमता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजकोषीय तूट तीन टक्क्यांपेक्षा कमी आणि महसूली तूट एक टक्क्यांपेक्षा
कमी राखण्यात यश आल्याचं सांगतानाच, राज्याने सिंचन, ऊर्जा,
सामाजिक न्याय अशा सर्व विभागांत प्रगती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
घरगुती गॅसच्या टंचाईबाबत राज्य सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात
असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार
यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या तुटवड्यामुळे मुंबई आणि नागपूर
या शहरांमध्ये ३० टक्के हॉटेल बंद झाली आहेत, असं
वडेट्टीवार यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्यात गॅसचा किती साठा आहे आणि गॅस पुरवठा
सुरळीत करण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना राबवत आहे याची माहिती द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. त्यावर बोलतांना विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी, हा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असला तरी राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना
कराव्यात अशा सूचना दिल्या.
****
दरम्यान, गॅस आणि इंधनांचा तुटवड्यामुळे
वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या मुलांची गैरसोय होऊ नये, याची
जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम
शिंदे यांनी दिले. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि सचिन अहिर
यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता. वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी
योग्य ती व्यवस्था करावी, असंही शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात
सूचित केल्याचं,
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं, ते म्हणाले -
बाईट - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
****
मुंबईच्या जेएनपीए बंदरात अडकलेल्या फळे आणि भाजीपाला कंटेनरवरील
साठवण किंवा थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला
आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात
८० टक्के सवलत देण्याचा तसंच नवीन जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा उपलब्ध करून
देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. सध्या जवाहरलाल नेहरू बंदरावर २५० कंटेनर तर
गुजरातमधल्या मुंद्रा बंदरावर १५० कंटेनर थांबलेले आहेत.
****
छत्तीसगड राज्यात सहा जिल्ह्यांमधल्या १०८ नक्षलवाद्यांनी आज
आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे ३ कोटी ९५ लाख रुपयांचं एकत्रित बक्षीस होतं.
देश या महिनाअखेरपर्यंत नक्षलवादापासून मुक्त होईल, असा
पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
****
गेली १२ वर्ष कोमात असलेल्या ३२ वर्षीय रुग्णाला इच्छामरण देण्याची
परवानगी आज सर्वोच्च न्यायालयानं दिली. रुग्णाच्या प्रकृतीत काहीही बदल होण्याची शक्यता
नसल्याच्या कारणावरून रुग्णाच्या आईवडिलांनी इच्छामरणाबाबतची याचिका दाखल केली होती.
त्यावर न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठानं
हा ऐतिहासिक निर्णय दिला. जगण्याच्या हक्कात, ‘सन्मानानं जगणं’ असा अर्थ अभिप्रेत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. रुग्णाची
प्रतिष्ठा कायम ठेवून त्याची जीवरक्षक प्रणाली काढून घेण्याची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश पीठानं दिले आहेत.
****
लोकसभेच्या अध्यक्षांविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावरची चर्चा
आजही सुरू होती.
अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याला बोलायची संधीच न देणं, विरोधकांना मुद्दे मांडण्यासाठी वेळ न देणं हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच
घडत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी याबाबत बोलतांना, विरोधी पक्षांच्या काही नेत्यांच्या अहंकारापोटी हा ठराव आणल्याची टीका केली. अनुराग
ठाकूर यांनी या चर्चेत सहभाग घेत, विरोधी पक्षाचे सदस्य घटनात्मक
समज सोडून सदनात येत असल्याची टीका केली. भाजपचे तेजस्वी सूर्या, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, आदींनी या चर्चेत भाग घेतला.
सध्या गृहमंत्री अमित शहा या प्रस्तावावर बोलत आहेत.
****
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार -आरटीई कायद्यानुसार
मोफत प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार
पालकांना १८ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार
हजार ७८१ जागांवर या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर
परिसरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी विकासकामाच्या उपाययोजना संयुक्तपणे
राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. मंदिर परिसर विकास
आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली, त्यावेळी स्वामी बोलत होते.
****
लोकसंस्कृतीचा वारसा लोक कलावंतानी भक्तीच्या जोरावर जतन करुन
ठेवावा असं आवाहन मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे
यांनी केलं आहे. बीड इथं लोककला संवर्धन आणि जतन या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
चंदनशिवे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय नाटय परिषद बीड शाखेच्या
अध्यक्ष दीपा क्षीरसागर यावेळी उपस्थित होत्या.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि केशरकाऊ काकू, कला, विज्ञान ,वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र आणि संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
ही कार्यशाळा घेतली जात आहे.
****
नांदेड इथं, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठात पीएम - उषा यांच्या आर्थिक सहाय्याने आयोजित आठ दिवसीय नेट, सेट आणि गेट मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते आज या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. सदस्य युवराज पाटील
यावेळी उपस्थित होते.
****
लातूर इथं झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी’ स्पर्धेत कोल्हापूरचा मल्ल रोहन पवार यानं विजेतेपद पटकावलं.
पुण्याच्या रामा कांबळे याच्यावर ११ गुणांनी विजय मिळवत त्यानं हा मानाचा किताब पटकावला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी
येत्या बुधवारी १८ मार्चला जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विशेष सभा होणार आहे.
याच दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील तर दुपारी विशेष
सभा घेतली जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment