Saturday, 21 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      दीक्षांत समारंभ हा कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा - उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयात-निर्यात लॉजिस्टिक्स प्रशिक्षणाला प्रारंभ

·      निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचं निधन-मुंबईत अंत्यसंस्कार

आणि

·      ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी

****

दीक्षांत समारंभ हा फक्त शैक्षणिक यशाचा उत्सव नसून कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. आज मुंबईत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पदवीधर विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, रोजगारभिमुखता आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं महत्त्व याविषयी मार्गदर्शन करतांना उपराष्ट्रपती म्हणाले -

बाईट - उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन

या दीक्षांत समारंभानंतर मुंबईत लोक भवन इथे जैन दीक्षा समारंभालाही उपराष्ट्रपती उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्र उभारणीत जैन समाजाच्या योगदानाबद्दल बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपराष्ट्रपती दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी नागपूर इथं भारतीय युवा संसदेच्या २९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला ते उपस्थित होते. भारतीय युवा संसद हे फक्त चर्चेचं व्यासपीठ नसून ते भविष्यात जबाबदार नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, असं उपराष्ट्रपती म्हणाले.

उद्या २२ मार्चला पुण्याजवळ उरळीकांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमात उपराष्ट्रपती सहभागी होणार आहेत.

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समितीकडून युवांसाठी आयात-निर्यात लॉजिस्टिक्स प्रशिक्षण अभ्याक्रमाला आजपासून सुरुवात झाली. मुंबईत शिवसेना भवन इथं माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमाचं  उद्घाटन झालं. अशाचप्रकारचे वर्ग राज्यभरात सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा आठवड्यांचा असेल. यात लॉजिस्टिक आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जाईल. तसंच प्रात्यक्षिकाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

****

भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची नाशिक पोलीसांनी आज विशेष पथकाव्दारे दोन तास कसून चौकशी केली. खरातच्या कार्यालयातील एक सहकारी पोलीसांच्या ताब्यात असून त्याच्या माहितीच्या आधारे पोलीसांनी ही चौकशी केली आहे.

दरम्यान, खरात प्रकरणातील पीडीत महिलांची ओळख पटतील अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्या देऊ नये, अशाप्रकारची बातमी दिल्यास संबंधीतांना दंड आणि दोन वर्षे कारावास होऊ शकतो, असं विशेष तपास पथकाच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.

****

केंद्रिय जल शक्ती मंत्रालयाच्या वतीन येत्या २३ मार्च रोजी नवी दिल्ली इथं ‘जागतिक जल दिवस परिषदेचं आयोजन करणार आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील तसच उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ‘उद्योगांसाठी पाणी’ या विषयावर आधारित ही परिषद शाश्वत जल व्यवस्थापनासाठी संवाद, नवोन्मेष आणि सहकार्य यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून कार्य करेल, असं मंत्रालयाने म्हटलं आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील सातशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

****

सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचं आज मुंबई इथं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथले मुळ रहिवासी असलेले सुधाकरराव कुर्डूकर यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम केलं. पंजाबचे प्रभारी राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. न्यायमूर्ती कुर्डूकर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत गिरगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

भाजपाचे प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांचं छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ५५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते मृत्रपिंड विकाराने ग्रस्त होते. एजाज देशमुख यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी बीड इथं दफनविधी केला जाणार आहे.

****

आज आंतरराष्ट्रीय वन दिन पाळला जात आहे. यानिमित्त, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना वनांचं रक्षण करण्याची शपथ घेण्याचं आवाहन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं २०१२ मध्ये २१ मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केलेला आहे.

****

ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी झाली.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्याभरात उत्साह, आनंद आणि बंधुभावाचं अनोखं चित्र पाहायला मिळालं. शहरातील विविध मशिदी आणि ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. नवीन वेशभूषेत आबालवृद्धांनी शिस्तबद्ध पद्धतीने नमाज अदा केली. छावणी ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकतेचा संदेश दिला. यावेळी जनकल्यासाठी प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी परस्परांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ईद निमित्ताने खास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी सणाचा आनंद लुटला.

 

जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या कदीम जालना ईदगाह मैदानावर मुस्लीम समाजबांधवांनी सामुहिक नमाज अदा केली. यावेळी उपस्थित राजकीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

बीड इथं शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष हेमलता पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

धाराशिव इथं शहरातील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली, यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

नांदेड इथं ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज उत्साहात साजरी झाली. ईदची मुख्य नमाज ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली. यावेळी विश्वशांतीची प्रार्थना करण्यात आली. नमाजनंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदींनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

लातूर जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

****

गुणात्मक दर्जेदार हळद पिकविणारा जिल्हा अशी ओळख निर्माण केलेल्या हिंगोली जिल्ह्यात आता हळदीवर प्रक्रिया करून महिला बचत गटांनी विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली आहेत. या मूल्यवर्धित उत्पादनांचं ब्रँडिंग करून त्यांना देशपातळीवर ओळख मिळवून दिली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

बाईट – रमेश कदम, हिंगोली

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने तसच भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या सहकार्याने शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना या विषयावचा २१ दिवसाचा हिवाळी अभ्यासदौरा पूर्ण झाला आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...