Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· श्रीरामनवमीचा उत्सव देशभरात साजरा-धार्मिक
तसंच सामाजिक उपक्रमात तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग
· हॉटेल व्यावसायिकांनी गॅस किंवा इंधन
शुल्क आकारू नये-केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे आदेश
· छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्हा प्रशासनांकडून
पेट्रोल डिझेलच्या अमर्याद विक्रीवर नियंत्रण
आणि
· धारशिव जिल्ह्यात पळसप इथं येत्या
२९ तारखेला ११ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन
****
श्रीरामनवमीचा सण आज देशभरात उत्साह आणि भक्तीमय वातावरणात साजरा
होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम नवमी निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीरामांची जीवनयात्रा आपल्याला सार्थक जीवनासाठी सत्य, न्याय आणि सद्गुणाच्या
मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करते असं राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा
संदेशात म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्याग, तपस्या आणि संयमाने परिपूर्ण असलेलं मर्यादा पुरुषोत्तमाचं जीवन प्रत्येक परिस्थितीचा
पूर्ण क्षमतेने सामना करण्याची आपल्याला प्रेरणा देत असल्याचं म्हटलं आहे.
****
नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव
साजरा करण्यात आला. मंदिराचे मानकरी नरेंद्रबुवा पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजन
करून दुपारी बारा वाजता उत्सव मानकरी, पुजारी, विश्वस्तांच्या उपस्थितीत
मंत्रोच्चारात श्रीराम जन्माचा सोहळा पार पडला.
बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथे श्री संत गजानन महाराज
मंदिर संस्थांनच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
या उत्सवात आध्यात्मिक रामायण स्वहाकार आयोजित केला जातो. शेकडो दिंड्या घेऊन हजारो
भाविक या उत्सवासाठी शेगावनगरीत दाखल झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध राम मंदिरात रामनवमी उत्साहात
साजरी करण्यात आली. शिर्डी इथे अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांचं छायाचित्र, पोथी तसंच विणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर साईबाबांची पाद्यपूजा करण्यात
आली. देशविदेशातून आलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे.
मराठवाड्यातही राम नवमीचा उत्साह दिसून येत आहे. याबाबत अधिक
माहिती देणारा हा वृत्तांत -
छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध राम मंदिरांमध्ये
माध्यान्हकाळी राम जन्मोत्सव साजरा झाला. भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली.
बहुतांश मंदिरात महाप्रसादासह रक्तदान शिबीर आणि सर्व रोगनिदान शिबीरं घेण्यात आली.
शहरात अनेक ठिकाणी सांगितिक कार्यक्रम पार पडले. बीड वळण रस्त्यावर असलेल्या श्रीरामचंद्र
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या परिसरात राम मंदिराचा पायाभरणी सोहळा आज पार पडला.
अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जाणार आहे.
जालना शहरातल्या बडी सडक इथल्या श्रीराम मंदिरात
पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. जुना जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम
मंदिरातही रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जालना शहरातून सकाळी काढण्यात
आलेल्या शोभायात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात जांब या समर्थ
रामदास स्वामींच्या जन्मगावी, त्यांच्या घरच्या रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
बीड शहरातून रामभक्तांनी दुचाकी फेरी काढली. दुपारच्या
वेळी विविध मंदिरांमध्ये रामजन्म साजरा झाल्यावर महाप्रसादासह विविध कार्यक्रम पार
पडले, सायंकाळच्या सुमारास शहरातून शोभायात्रा
काढण्यात येत आहे.
परभणी शहरातील प्राचीन राम मंदिरात आज प्रभू श्री
राम जन्मोत्सव मोठ्या गुलाल आणि फुलांची उधळण करत उत्साहात साजरा करण्यात आला तर पूर्णा
तालुक्यातील कातनेश्वर इथे श्री हनुमान जयंती पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
करण्यात आली.
लातूर शहरात सकाळपासूनच श्रीराम मंदिरामध्ये भक्तांची
गर्दी झाली होती. श्रीराम मंदिर, केशवराज मंदिर आणि साई मंदिर इतर मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवासह
अभिषेक, पूजन, आरती आणि भजन-कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. दुपारी
१२ वाजता महिलांनी पाळणा गीत गात राम जन्म सोहळ्यात रंग भरला.
नांदेड इथं गाडीपुरा भागातल्या रेणुकामाता मंदिरातून
श्रीरामाच्या भव्य प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली, आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंदराव बोंढारकर यांच्या
हस्ते श्रीरामाची आरती करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेत महिला पुरुष मोठ्यासंख्येने
सहभागी झाले. अशोक नगरातल्या श्रीराम मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला.
धाराशिव इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीने भगवा ध्वज
यात्रा काढण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, नगराध्यक्षनेहा राहुल काकडे यांच्या उपस्थितीत या
यात्रेचा प्रारंभ झाला. भगवे फेटे घालून, हाती भगवे ध्वज घेऊन पुरुष तसंच महिला भाविक या भगवाध्वज यात्रेत सहभागी झाले.
राज्यात अकोला, गोंदिया, जळगाव, धुळे यासह सर्वच ठिकाणी रामनवमीचा
उत्सव उत्साहात साजरा झाला.
****
हॉटेल तसंच खानपान-गृहांसारख्या आस्थापनांनी एलपीजी गॅस किंवा
इंधन शुल्क या नावाखाली कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. जर संबंधित व्यावसायिकांनी अशा
शुल्काची आकारणी केली, तर ग्राहकांना १ ९ १ ५ या हेल्पलाईन
क्रमांकावर किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या मोबाईल ॲपवर त्याची तक्रार करता येईल.
संबंधित जिल्हाधिकारी किंवा थेट प्राधिकरणाकडेही याची तक्रार नोंदवता येणार आहे.
****
भारताच्या तेल तसंच वायू वाहक जहाजांची होर्मुझच्या सामुद्रधुनीतून
सुरळीत वाहतुक सुरू असल्याचं, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी
सांगितलं. ते म्हणाले
-
बाईट - केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू
आखाती देशांमधल्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात
घेत राज्य सरकारने पर्यायी इंधन म्हणून केरोसीन वितरणाला गती देण्याचा निर्णय घेतला
आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला मंजुरी
दिली आहे. प्रत्येक शिधापत्रिकेमागे ३ लिटर केरोसीन चं वाटप केलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने पेट्रोल डिझेलच्या अमर्याद
विक्रीवर नियंत्रण आणलं आहे. आता जिल्ह्यात दुचाकीसाठी २०० रुपये तर चारचाकीसाठी २
हजार रुपयांपेक्षा जास्त इंधन देऊ नये असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी
यांनी इंधन वितरकांना दिले. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध
असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने
केलं आहे.
हिंगोली जिल्हा प्रशासनानेही असेच आदेश जारी केले आहेत. दुचाकी
वाहनांसाठी एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपये तर चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त
२ हजार रुपयांचं इंधन देण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना
दिल्या आहेत.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश पेट्रोल पंपावर सकाळपासूनच
नो स्टॉकचा बोर्ड लागलेला दिसून येत आहे. सकाळी शहरात मोजकेच पेट्रोलपंप सुरू असल्याचे
दिसून आले. पेट्रोल टाकण्यासाठी ग्राहकांच्या पंपावर रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात पेट्रोल
डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं स्पष्ट केलं आहे. नांदेड जिल्ह्यात पेट्रोल पंपावर रांगा
दिसून आल्या, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बोलत होते. पेट्रोल डिझेलचा
अनाधिकृत साठा केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला
आहे.
परभणी जिल्ह्यातही इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी
अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, विलास मुसळे यांनी म्हटलं आहे. मात्र वाढती गर्दी आणि पुरवठा साखळीतील तात्पुरता
असमतोल टाळण्यासाठी प्रशासनामार्फत इंधन विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात येत
असल्याचंही मुसळे यांनी स्पष्ट केलं आहे.
****
जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून, अचूक नियोजन करावं आणि कोणतीही दिरंगाई करू नये, असे स्पष्ट निर्देश लातूरच्या
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या
दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन प्रसंगी आज त्या बोलत होत्या.
जिल्ह्यातील २३ चार्ज अधिकारी आणि १०६ प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते.
****
धाराशिव शहरातील प्रत्येक वार्डातून पाच प्रभागातून दहा महिलांना
स्वयंरोजगारासाठी पंतप्रधान मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य देण्यात
येणार असल्याची ग्वाही, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना
पाटील यांनी दिली. धाराशिव नगरपरिषदेच्या नारीशक्ती सन्मान सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून
त्या बोलत होत्या. शहरातील कचरा संकलनासाठी वीस घंटागाड्या देण्याची आणि हातलाई तलावावर
संगीत कारंजे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धारशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं येत्या २९ तारखेला ११ व्या मराठवाडा
ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक
संघ आणि शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, यांच्या वतीने आयोजित
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे
यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे ही माहिती दिली. या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिर असे उपक्रम
घेण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment