Thursday, 5 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 05 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्याचा आर्थिक वर्ष २०२५–२६ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधीमंडळात सादर झाला. सलग पावच्या वर्षीही राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहिल असा अंदाज असून, चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक नऊ टक्के वाढ अपेक्षित असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधानसभेत सादर करणार आहेत. 

****

बीड जिल्ह्यात आंबेजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कायमस्वरूपी कार्डिओलॉजिस्टची नेमणूक करण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासंदर्भातल्या विशेष चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. रुग्णालयात आवश्यक तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करून देणं तसंच उपचार सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात आरोग्य सेवा अधिक सक्षम करून आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी या रुग्णालयासाठी १०२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती, लवकरच या ठिकाणी सुसज्ज असं रुग्ग्णलाय उभारलं जाईल, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. 

****

वाहतुकदार संघटनांनी पुकारलेल्या बंद संदर्भात सर्व संबंधित संघटनांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न असून, वाहतूकदारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. वाहतुकदार संघटनांनी ई चलान बंद करण्याची मागणी करत बंदचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ई चलान प्रणालीचा उद्देश सरकारचं उत्पन्न वाढवणं हा नाही, तर वाहतुक विषयक नियमांचं काटेकोर पालन सूनिश्चित करणं असून, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ही व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.  

****

नवी दिल्लीत आज ११ व्या रायसीना संवादाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बीजभाषण करणार आहेत. हिंद-प्रशांत रणनीती, उदयोन्मुख तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि ग्लोबल साऊथची भूमिका यांसारख्या विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.

****

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य होण्याची आपली इच्छा होती, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. दोन दशकांहून अधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी जनतेने आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी आभार मानले. बिहारमध्ये स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आपलं पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन असेल, असंही नितीश कुमार म्हणाले.

****

राज्यसभेच्या दहा राज्यांमधल्या ३७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, नऊ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. गरज भासल्यास १६ मार्चला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल. यामध्ये महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश आहे.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने भारत–म्यानमार सीमेजवळून ३६ किलोग्रामपेक्षा अधिक मेथॅमफेटामाइन आणि सुमारे एक किलो हेरॉईन जप्त केलं आहे. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत सुमारे ३१ कोटी रुपये आहे. याप्रकरणी म्यानमारच्या एका नागरिकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

****

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला आज पहाटेपासून देहू नगरीमध्ये सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीनं भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातल्या नावकी, कातनेश्वरसह अनेक ठिकाणी आज संत श्री तुकाराम महाराज बीजेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर राम महाराज नांदगावकर यांचा कीर्तन सोहळा झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर फुलांची उधळण करण्यात आली.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आज भारताच्या लक्ष्य सेनचा दुसर्या फेरीतला सामना हाँगकाँगच्या आंगुस के एल सोबत होणार आहे. तर मिश्र दुहेरीत ध्रूव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीचा सामना हाँगकाँग च्या जोडीसोबत होणार आहे.

****

टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपान्त्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी विजेतेपदासाठी न्यूझीलंड सोबत खेळेल. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 31 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...