Thursday, 5 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 05 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

११ वा रायसीना संवाद आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. जागतिक मुत्सद्देगिरी, धोरणात्मक मुद्दे आणि समकालीन आंतरराष्ट्रीय आव्हानांवर मंथनासाठी हा महत्त्वाचा मंच ठरला आहे. हिंद-प्रशांत रणनीती, उदयोन्मुख तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि ग्लोबल साऊथची भूमिका यांसारख्या विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब रायसीना संवादात प्रमुख अतिथी म्हणून बीजभाषण करणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अलेक्झांडर स्टब यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

****

राज्यसभेच्या दहा राज्यांमधल्या ३७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, नऊ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. गरज भासल्यास १६ मार्चला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल. यामध्ये महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने चार उमेदवारांची यादी जाहिर केली असून, महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

****

राज्यात मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. या कामाची व्याप्ती वाढवण्याच्या दिशेने या क्षेत्रातल्या नामांकित विविध कंपन्यांसोबत राज्य शासनाने सामंजस्य करार केले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत विविध कंपन्यांसोबत एकूण ५५ सामंजस्य करार करण्यात आले असून, याद्वारे ७८ हजार २१५ मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची उभारणी प्रस्तावित आहे. एकूण गुंतवणूक सुमारे चार लाख १६ हजार कोटी रुपये इतकी अपेक्षित असून, या प्रकल्पाद्वारे सुमारे एक लाख २७ हजार ९९० रोजगार निर्मिती होणार आहे. ऊर्जाक्षेत्राला सक्षम करण्यासाठी हे करार महत्वाचे असून, कालबद्धरित्या या प्रकल्पांची अंमलबजावणी करावीअशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.

****

स्फोटक कारखान्यांसंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. नागपूर जिल्ह्यात स्फोटकांचे अकरा कारखाने असून, गेल्या तीन वर्षांत ४३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव दाखल केला होता.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत दहा कोटी टन ऊस गाळप झालं असून, नऊ पूर्णांक ४१ टक्के उताऱ्यानुसार ९४ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १४८ लाख मेट्रिक टनांनी ऊस गाळप आणि १३ लाख मेट्रिक टनांनी साखर उत्पादन वाढलं आहे, अशी माहिती साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी दिली. वाढीव गाळप क्षमता आणि ऊस तोडणी यंत्रांच्या वाढत्या वापरामुळं कारखान्यांनी वेगानं गाळप पूर्ण केलं.

****

वर्तमान गळीत हंगामात उस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपये थकबाकी देय असल्यानं यावर शासनानं तातडीनं ठोस उपाय करावेत, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. कारखान्यांना कमी व्याज दरानं कर्ज द्यावं, उसाच्या किमान विक्री किंमतीत वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडे  पाठपुरावा करावा, साखर निर्यातीसाठी अनुदान द्यावं आणि इथेनॉलच्या दरवाढीसाठीही तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

****

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला आज पहाटेपासून देहू नगरीमध्ये सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीनं भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

बीड जिल्हा प्रशासनामार्फत येत्या आठ मार्च ते १५ मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समापन शिबीर अभियान – टप्पा दोन राबवण्यात येणार आहे. सामान्य जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न एकाच ठिकाणी निकाली काढणं, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यातही या अभियानाअंतर्गत विविध शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आज भारताच्या लक्ष्य सेनचा दुसर्या फेरीतला सामना हाँगकाँगच्या आंगुस के एल सोबत होणार आहे. तर मिश्र दुहेरीत ध्रूव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीचा सामना हाँगकाँग च्या जोडीसोबत होणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत काल पुरुष एकेरीत आयुष शेट्टीचं, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचं, तर मिश्र दुहेरी गटात रोहन कपूर आणि ऋत्विका गड्डे या जोडीचं आव्हान संपुष्टात आलं. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 31 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...