Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 March
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता आज पंतप्रधान जारी करणार
· देशात घरगुती वापराचा गॅस तसंच इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध
असल्याची सरकारची माहिती
· कृषी अन्न प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत महिला नेतृत्वाला
प्रोत्साहन देण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त
आणि
· आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन उद्योजकांच्या
पाठीशी; उद्योग मंत्री उदय सामंत यांची ग्वाही
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधल्या गुवाहाटी इथून प्रधानमंत्री
किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता जारी करणार आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी
कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत
चार लाख नऊ हजार कोटींहून अधिक रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. आज
पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ
हस्तांतरणाद्वारे, १८ हजार ६४० कोटी रुपये
जारी करण्यात येतील असं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान
देशातलं एकूण अन्नधान्य उत्पादन २०१४ मध्ये २५२ दशलक्ष टनांवरून, २०२५ मध्ये, सुमारे ३५७
दशलक्ष टनांपर्यंत वाढलं असल्याची माहिती, चौहान यांनी दिली.
****
देशात घरगुती वापराचा गॅस तसंच इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी काल संसदेत दिली. नागरिकांनी यासंदर्भात चिंता करण्याचं किंवा अस्वस्थ होण्याचं कारण नाही,
पश्चिम आशियात सुरू असलेलं युद्ध लांबलं, तरीही देशात इंधनाचा तुटवडा जाणवणार नाही, असं पुरी यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले…
बाईट- पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी
देशातल्या व्यासायिक ग्राहकांना गॅसपुरवठा सुरू झाल्याची माहिती
पुरी यांनी दिली.
घरगुती गॅसची नोंदणी केल्यावर अडीच दिवसांत गॅस सिलिंडर घरपोच दिलं
जात असून, गॅस सिलिंडरच्या दोन मागण्यांमध्ये शहरी भागात २५
दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवसांचं अंतर ठेवण्याचा नियम लागू केल्याचं त्यांनी
सांगितलं. रुग्णालय तसंच शैक्षणिक संस्थांना
अखंडित गॅस पुरवठा केला जात असून, देशभरात केरोसीनची किरकोळ
विक्री सुरू केल्याची माहितीही पुरी यांनी दिली.
****
दरम्यान,
घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या
पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा,
यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा
निर्णय घेतला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याची नागरिकांनी निश्चिंतता बाळगावी, अशी ग्वाही
विभागाकडून देण्यात आली आहे.
****
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री
अब्बास अराघची यांच्यात झालेल्या चर्चेनंतर इराणने, भारताचे ध्वज असलेल्या
दोन तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे.
पुष्पक आणि परिमल ही दोन्ही जहाजं होर्मुझमधून प्रवास करून भारतात येतील. पश्चिम
आशियातल्या संघर्षामुळे भारताची २८ जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात थांबून
आहेत. या जहाजांवर सुविधा आणि सुरक्षा पुरवणं, यावर
संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
****
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विशेषत: कृषी
अन्न प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची गरज,
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी व्यक्त केली. ‘कृषी अन्न प्रक्रियेत महिलांची भूमिका’ या विषयावरच्या
जागतिक परिषदेचं उद्घाटन नवी दिल्लीत काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं,
त्यावेळी त्या बोलत होत्या. या क्षेत्रात
महिलांच्या योगदानाचा उल्लेख करतांना राष्ट्रपती म्हणाल्या…
बाईट- राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू
****
लोकसभेत काल पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. सुमारे
दोन लाख ८१ हजार कोटी रुपयांच्या ६१ मागण्या सरकारने सदनासमोर ठेवल्या आहेत.
****
राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या
११३ व्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमावर तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित
पवार यांनी कराड इथल्या प्रीती संगमावर चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरु डॉ.
अशोक महाजन यांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर काल दुसऱ्या दिवशी
विधानसभेत चर्चा झाली. यावेळी विविध विभागाशी संबंधित मागण्या सदस्यांनी केल्या.
विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून
सरकारवर टीका केली.
****
आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीची झळ उद्योगांना बसू नये
यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करत असून, शासन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे,
अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योग प्रतिनिधी आणि संस्थांना
दिली. छत्रपती संभाजीनगर इथं काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
उद्योग चालवण्यासाठी लागणाऱ्या गॅस इंधनाची आवश्यकता, पर्यायी इंधन व्यवस्था याबाबतच्या उपायांची यावेळी
चर्चा करण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात घरगुती गॅसचा सुमारे तीन दिवसांचा साठा
उपलब्ध असून, पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू आहे. जिल्हा
पुरवठा अधिकारी सविता चौथर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती
देण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं
आवाहन प्रशासनाने केलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर साठा पुरेशा प्रमाणात
उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
परभणी जिल्ह्यातही पेट्रोल-डिझेल तसंच घरगुती गॅस सिलेंडरचा
पुरेसा साठा उपलब्ध असून,
नागरिकांनी अस्वस्थ होऊ नये, असं आवाहन
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे.
****
बीडमध्ये तीन हॉटेलवर छापे टाकून घरगुती सिलिंडर जप्त करण्यात
आले. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हॉटेल व्यावसायिक
घरगुती गॅसचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर
पुरवठा विभागाने कारवाई केली.
****
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये
काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
महानगर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात महिला
कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी
नगरसेवक अनिल मकरिये यांची निवड करण्यात आली. महानगरपालिकेच्या इतर महत्त्वाच्या
समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रियाही काल पार पडली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी
नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य,
शिक्षण आदी विषयांवर १६ मार्च पर्यंत प्रस्ताव पाठवता येणार आहेत.
****
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड आज होत आहे. जिल्हा
परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, भाजप १९ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
****
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंह
डागोर यांनी बीड इथं सफाई कर्मचारी नियुक्ती प्रक्रिया तसंच त्यांच्या प्रलंबित
प्रश्नांचा आढावा घेतला. लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या
नियुक्तीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, डागोर यांनी परभणी इथंही काल आढावा बैठक
घेतली. सफाई कर्मचाऱ्यांना मुलभूत हक्क आणि योजनांचा लाभ
वेळेत देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
****
मध्ययुगीन कालखंडात संत परंपरा तसंच सुफी संप्रदायांने
सामाजिक समता तसंच नैतिक मुल्यांची शिकवण दिल्याचं, इतिहास अभ्यासक डॉ.गनी
पटेल यांनी म्हटलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या इतिहास विभागात आर. एस गुप्ते व्याख्यानमालेत ते काल बोलत होते.
या दोन दिवसीय व्याख्यानमालेचा डॉ.
दुलारी कुरेशी यांनी अध्यक्षीय समारोप केला.
****
पालकांनी मुलांचे मालक न होता, त्यांच्यासाठी उत्तम
माध्यम व्हावं, असं आवाहन,
ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ नंदू मुलमुले यांनी केलं
आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं यशवंतराव चव्हाण
केंद्राच्या वतीने ‘सजग पालकत्व’
या विषयावर घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. पालकांनी आपला विचार
मुलांवर लादू नये, कारण मुलांकडे त्यांचा स्वत:चा विचार असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा बस स्थानकात डिझेल भरत असताना एका एसटी
बसला अचानक आग लागली. या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली,
तर डिझेल भरणारे ऑपरेटर बसवराज मठपती हे गंभीररित्या भाजले.
काल संध्याकाळी ही घटना घडली.
****
No comments:
Post a Comment