Sunday, 15 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      आसाम, केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडू येथे विधानसभेच्या निवडणुका एका टप्प्यात; बारामती आणि राहुरी इथली पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी

·      कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

·      उन्हामुळं जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत उद्यापासून बदल

आणि

·      छत्रपती संभाजीनगरमध्ये `हेरिटेज वॉक’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संगीतमय अभिवादन उत्साहात

****

निवडणूक आयोगानं आज आसाम, केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडू येथे विधानसभेच्या निवडणुका एका टप्प्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. दिल्ली इथं आज पाच राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की, आसाम, केरळ आणि पुडुचेरी येथे नऊ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होईल. पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात १४२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. चारही राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतमोजणी चार मे रोजी होईल. कुमार यांनी सांगितलं की, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. पाच विधानसभांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये सुमारे १७.४ कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत आणि एकूण ८२४ मतदारसंघ आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुमारे ६.४४ कोटी, तामिळनाडूमध्ये ५.६७ कोटी, केरळमध्ये २.७० कोटी, आसाममध्ये २.५० कोटी आणि पुडुचेरीमध्ये ९.४४ कोटी लाख मतदारांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, या पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात एकूण २.१९ लाख मतदान केंद्रे असतील आणि सुमारे २५ लाख निवडणूक अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. राज्यातल्या बारामती आणि राहुरी इथली पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होईल तर मतमोजणी चार मे रोजी होणार असल्याची माहितीही निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

****

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या मागणीला समाजवादी पक्षाचा पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ज्ञानेश कुमार हे कर्तव्याबाबत प्रामाणिक नसल्याचा आरोप यादव यांनी केला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहामधे ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी करणारी नोटीस दिली आहे. लोकसभेचे १३० आणि राज्यसभेच्या ६३ खासदारांनी यावर स्वाक्षरी केली आहे. ज्ञानेश कुमार हे विरोधी पक्षांसोबत भेदभाव करतात, सत्ताधारी पक्षाला नेहमी झुकतं माप देतात, सखोल पुनरीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांना मतदानापासून वंचित ठेवलं असे आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत.

****

कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून या माध्यमातून शेतीचा उत्पादन खर्च हा २५% कमी झाला आहे, तर उत्पन्न मात्र वाढल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभात ते आज बोलत होते. राज्यामध्ये केलेली कर्जमाफी ही तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना आहे मात्र शाश्वत शेतीचं दीर्घकालीन प्रारूप तयार करण्यात राज्य सरकार सह इतर संस्था आणि कृषी स्नातकांनी वाटा उचलावा असं आवाहन त्यांनी केलं. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानीत करण्यात आलं. कृषी विद्यापीठाच्या स्नातकांनी, संशोधन, तंत्रज्ञान, नवोन्मेष यावर भर द्यावा, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. विविध विद्याशाखांतल्या एकूण ४ हजार ६०२ स्नातकांना या सोहळ्यात पदवी, पदव्युत्तर पदवी, आणि आचार्य पदवीनं गौरवण्यात आलं. राज्यातल्या इंधन प्रश्नासंदर्भात योग्य उपाय योजना करण्यात आली असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असल्यानं, जिल्हा परिषद प्रशासनानं उद्यापासून शालेय विद्यार्थ्यांच्या शाळांच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शाळांची वेळ सकाळी ७ ते १२ अशी ठेवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांत उष्णतेची लाट असतानाच ,शनिवारी राज्याच्या अनेक भागांत उन्हाचा पारा ३८ अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला होता. त्यामुळे हा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागानं घेतला असल्याचं कळवण्यात आलं आहे.

****

पुण्यात मेट्रोच्या जिल्हा न्यायालय स्थानकात उभारण्यात आलेल्या मेट्रो भवन प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. देशात सर्वाधिक गतिशीलतीनं झालेल्या मेट्रो प्रकल्पात, पुणे मेट्रोचा उल्लेख करावा लागेल, येत्या काळात २०० किलोमीटरचा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश महामेट्रोला देण्यात आले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे मेट्रोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, दररोज अडीच लाख प्रवासी यातून प्रवास करतात. गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या पावणे सहा लाखांवर गेली होती त्यामुळे पुणेकरांनी मेट्रोला पसंती दिल्याचं स्पष्ट झालं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळामार्फत, राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्या या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचं वितरण करण्यात येणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात लातूर-तुळजापूर मार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. करजखेडा गावानजीक तीन वाहनं धडकून हा अपघात झाला. जखमींना धाराशिव आणि सोलापूरच्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक यांच्यातर्फे आज ‘हेरिटेज वॉक’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संगीतमय अभिवादन हा विशेष कार्यक्रम शहरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीच्या ऐतिहासिक घटनेला, यंदा ३६० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही फेरी घेण्यात आली. इतिहासानुसार, पुरंदरच्या तहानंतर पाच मार्च १६६६ रोजी रायगडावरून आग्रा प्रवासासाठी निघालेले छत्रपती शिवाजी महाराज, साधारण आठवडाभरात तत्कालीन औरंगाबादला पोहोचले होते, त्यावेळी जयसिंगपुरा इथं मिर्झाराजे जयसिंग यांच्या छावणीत त्यांचा मुक्काम झाला होता. या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

आज सकाळी मकाई गेट ते जयसिंगपुरा या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी नागरिकांना शहराच्या इतिहासाशी निगडित विविध स्थळांचे महत्त्वं, त्यांची वैशिष्ट्यं आणि शिवकालीन संदर्भ यांचा सविस्तर माहिती देण्यात आली. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी ‘नादांबरी’ वाद्यपथकानं छत्रपती शिवाजी महाराजांना संगीतमय अभिवादन केलं. शहराच्या ऐतिहासिक वारशाची माहिती सांगणारे असे ११ हेरिटेज वॉक या वर्षात होणार असल्याचं महापौर राजुरकर यांनी यावेळी सांगितलं.

****

आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन शहरात येणाऱ्या देश-विदेशातील भाविक व पर्यटकांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावं यासाठी प्रादेशिक पर्यटन संचालनालय यांच्या वतीने २०० पर्यटन मार्गदर्शक तयार करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे उपसंचालक विजय जाधव यांनी दिली. विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. यामुळं परिसरातील जागतिक वारसा स्थळं, धार्मिक पर्यटन स्थळं, तसंच सांस्कृतिक वारसा यांची माहिती प्रभावीपणे पर्यटकांपर्यंत पोहोचावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं जाधव म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथंल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत २० मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक व संशोधन पात्रतेचा तपशील पुन्हा भरावा लागणार आहे. तसंच नवीन उमेदवारांनाही अर्ज सादर करता येतील, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...