Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 March 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२८ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू-काश्मीर
आणि लडाख यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाजवळील जोजिला जवळ आज झालेल्या हिमस्खलनात
सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. उंच भागातून जात असलेल्या वाहनांवर
अचानक मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळल्याने अनेक वाहने त्यात अडकली. घटनेनंतर तात्काळ विविध
यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं असून बर्फ हटवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर
सुरू आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सामाजिक माध्यमांवरून या घटनेत सात
जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं असून जखमींना सर्वतोपरी मदत पुरवली जात असल्याचं
त्यांनी म्हटलं आहे. लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनीही या दुर्घटनेबद्दल
शोक व्यक्त केला आहे.
****
पेट्रोलियम
आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ने एका दिवसात
आतापर्यंतचे सर्वाधिक तेल आणि वायू उत्पादन केल्याबद्दल कंपनीचे अभिनंदन केले आहे.
‘ऑईल इंडिया लिमिटेड’ने
परवा गुरुवारी १ लाख ४७ हजार १५९ बॅरल तेलाचे उत्पादन करून नवा विक्रम प्रस्थापित केला
आहे. भारताची ऊर्जा पायाभूत सुविधा अधिक बळकट होत असून, देश ऊर्जा क्षेत्रातील
आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत असल्याचे त्यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या
संदेशात म्हटलं आहे.
****
अवकाळी
पावसामुळे झालेल्या नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जास्तीत
जास्त लाभ मिळवून देण्याचे निर्देश केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज
सिंह चौहान यांनी दिले आहेत. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल चौहान
यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले आहेत. नुकसानाचं मूल्यमापन
करण्यासाठी केंद्र सरकारचं एक पथक आधीच राज्याच्या दौऱ्यावर असल्याची माहिती त्यांनी
दिली. शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आणि कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी केंद्र
सरकार वचनबद्ध असल्याचंही शिवराज सिंह चौहान यांनी पुनरुच्चार केला आहे.
****
भारतीय
रिझर्व बँकेने देय व्यवहार दृष्टीकोन अर्थात ‘पेमेंट व्हिजन’-२०२८ काल जाहीर केलं.
डिजिटल व्यवहार व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठीची रूपरेषा यात मांडण्यात आली आहे.
ग्राहक सक्षमीकरण, फसवणुकीपासून संरक्षण आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन
देणं, यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.
****
महिला
बचत गटांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट होत असून, या उपक्रमात गुणवत्तापूर्ण कामाला अधिक महत्त्व असल्याचं, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी म्हटलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या
नवतेजस्विनी महोत्सवाच्या उद्घघाटनप्रसंगी ते काल बोलत होते. जिल्ह्यातल्या सर्व महिलांना
बचत गटात समाविष्ट करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र
शासन पुरस्कृत ‘उल्लास’ - नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षातील
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उद्या आयोजित करण्यात आली आहे. लातूर
जिल्ह्यातील चार हजार ७०२ नागरिक या परीक्षेला बसणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण
विभागातर्फे या परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
****
डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मार्च-एप्रिल २०२६ च्या उन्हाळी सत्र परीक्षांचं
वेळापत्रक जाहीर केलं आहे. पदवीच्या परीक्षा सात एप्रिलपासून तर पदव्युत्तर परीक्षा
१६ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.
****
दिवंगत
शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या स्मृतिनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं
‘नाथस्वर’ संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या
गोविंदभाई श्रॉफ सभागृहात आज सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर नजीक असलेल्या श्रीक्षेत्र देवगड इथं आजपासून मातृसंस्कार अधिवेशनाचं आयोजन
करण्यात आलं आहे. विश्वमांगल्य सभेच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या या अधिवेशनात सांस्कृतिक
कार्यक्रमांसोबत व्याख्यानं, परिक्रमा, गंगा गोदावरी आरती, आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
बँकॉक
इथं आशिया कप जागतिक मानांकन स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारतानं तीरंदाजीमध्ये दोन
सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण १० पदकं जिंकली, यामध्ये कंपाऊंड प्रकारात मिश्र सांघिक सुवर्णपदक आणि पुरुषांच्या वैयक्तिक गटातील
सर्व पदकांचा समावेश आहे.
****
यंदाच्या
टाटा आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. विद्यमान विजेता
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना आज एम. चिन्नास्वामी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद
विरुद्ध होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. ३१ मे पर्यंत
या स्पर्धा चालणार आहेत.
****
विदर्भ
आणि मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होत असून आज विदर्भ वगळता उर्वरित
राज्यात हवामान कोरडं राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची
शक्यता हवामान विभागांनं वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात अकोला
इथं राज्यात सर्वाधिक ४१ पुर्णांक ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अहिल्यानगर इथं सर्वात कमी म्हणजेच १९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment