Saturday, 28 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी दक्षता, सज्जता आणि समन्वित कृतीची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त

·      पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लीटर दहा रुपये कपात

·      लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास कठोर कारवाई-मुख्यमंत्र्यांचा इशारा

·      सरकारी जमिनीवर जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणं सशर्त नियमित

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळांना मंजुरी

आणि

·      इंडियन प्रीमिअर लीग टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात

****

आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी दक्षता, सज्जता आणि समन्वित कृतीची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसोबत दूरदृश्य प्रणालीने घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान बोलत होते. बदलत्या परिस्थितीकडे सातत्यान लक्ष ठेवणं आणि परिस्थितीनुसार धोरणांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आर्थिक आणि व्यापारी स्थैर्य राखणं, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणं, नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं आणि पुरवठा साखळी बळकट करणं याला सरकारचं प्राधान्य असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लीटर दहा रुपये कपात करण्यात आली आहे. यामुळे वाढत्या किमतींपासून ग्राहकांना संरक्षण मिळेल. याव्यतिरिक्त, डिझेलच्या निर्यातीवर साडे २१ रुपये प्रति लिटर आणि विमान इंधनावर साडे २९ रुपये प्रति लीटर दराने शुल्क आकारण्यात आलं आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे.

****

सरकारचा हा निर्णय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम हा तेल कंपन्या तसंच सरकारकडून वहन केला जाणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. देशात लॉकडाऊन लागण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. अशी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा टप्प्याटप्प्याने वाढवून ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठा असून, नागरिकांनी टंचाईच्या भीतीपोटी इंधन खरेदी करू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

**

दरम्यान, अशा टंचाईच्या भीतीमुळे वाढलेल्या इंधन खरेदीला प्रतिबंध म्हणून, काही जिल्हा प्रशासनांनी इंधन विक्रीवर घातलेली मर्यादा, रद्द केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच परभणीच्या जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेले याबाबतचे आदेश रद्द केले आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना याबाबत केलेल्या आवाहनात, जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत होत असल्याचं नमूद केलं, ते म्हणाले:

बाईट – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही नागरिकांना पेट्रोल-डिझेलची पॅनिक खरेदी किंवा अतिरिक्त साठा करू नये, असं आवाहन केलं आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप धारकांची कर्डिले यांनी काल बैठक घेतली, त्यानंतर ते बोलत होते. पेट्रोलपंपधारकांच्या मागणीनुसार इंधन उपलब्ध करून देण्याबाबत तेल कंपन्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

**

जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही नागरिकांना आपल्या गरजेपेक्षा अधिक इंधनाची खरेदी करू नये, असं आवाहन केलं आहे. अफवांमुळे नागरिक गरजेपेक्षा अधिक इंधन भरत असल्यामुळे टंचाईसदृश स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या…

बाईट - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

****

अहिल्यानगर इथं घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरून देणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याचा साथीदार मात्र फरार झाला. त्याच्याजवळून तेहतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेकडून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर कथित चढ्या दरानं विकणाऱ्या गॅस एजन्सींच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शहरातल्या २३ गॅस एजन्सीना यासंदर्भातलं निवेदन देण्यात आलं.

****

अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिरात रामनवमीचा उत्सव काल साजरा झाला. दुपारी बारा वाजता रामलल्लांचा जन्मसोहळा पार पडला, त्यावेळी सूर्यकिरणांमुळे रामलल्लाच्या कपाळावर सूर्यटिळा पाहायला मिळाला. रामलल्लाचं दर्शन, पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

****

आकाशवाणी आणि दूरदर्शनचं प्रसारण अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने देशभरात आणखी ६८ ट्रान्समीटर उभारण्यास परवानगी दिली आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. यासाठीच्या दोन हजार ५३९ कोटी रुपये खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आकाशवाणीच्या प्रसारणाची व्याप्ती ७० टक्क्यांवरून ८१ टक्के होणार आहे. दिल्ली, चेन्नई आणि मुंबई या तीन महानगरांमध्ये आकाशवाणीने मीडियम वेव्ह बॅण्डवर डिजिटल प्रसारण सुरू केल्याची माहितीही मुरुगन यांनी दिली.

****

राज्यसभेनं काल वित्त विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक दोन दिवसापूर्वीच मंजूर केलं आहे. या नियमित प्रक्रियेनंतर यंदाच्या अर्थसंकल्पाची कार्यवाही पूर्ण झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राला पहिल्या टप्प्याचे ७९ कोटी रुपये वितरीत केले आहे. या अनुदानाचा उपयोग स्वच्छता, पेयजल पुरवठा, पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पासारख्या मूलभूत सेवांसाठी केला जातो.

****

राज्यात जानेवारी २०११ पर्यंत झालेली, आणि सध्या अस्तित्वात असलेली सरकारी जमिनीवरची निवासी अतिक्रमणं नियमित केली जाणार आहेत. यातून बृहन्मुंबईला वगळण्यात आलं आहे. राज्यातल्या गरीब आणि गरजू कुटुंबांना घरं देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा घेतला निर्णय घेतला आहे. यासाठी पात्रता आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती ठरली असून, ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबत महसूल विभागाचा शासन निर्णय जारी झाला आहे.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास राज्यशासनाने मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या दृष्टीकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांची निवड करण्यात आली असून त्या शाळांमधील कामं अंतिम टप्प्यात आहेत.

****

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनाम्याचं पत्र सादर केलं. चाकणकर यांनी गेल्या आठवड्यात व्यक्तिगत कारण देत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे.

****

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी बळी पडलेल्या पीडित महिलांचे फोटो समाज माध्यमावर पसरवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सातपूर इथल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित चित्रफिती काही लोकांनी सोशल मीडियावर अपलोड केल्या होत्या, त्या हटवण्यात आल्या आहेत.

****

हवामानावर आधारित कृषीविषयक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे महाराष्ट्रात ११ नवीन स्वयंचलित कृषी हवामान केंद्रं उभारण्यात येणार आहेत. मिशन मौसम च्या दुसऱ्या टप्प्यांत ही हवामान केंद्र उभारली जातील. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग असून, २०२६ च्या अखेरीपर्यंत अशा प्रकारची २०० केंद्रं देशात उभारण्याचं उद्दिष्ट आहे. या नव्या केंद्रांमुळे कृषी हवामानविषयक निरीक्षणं अधिक सक्षम होतील आणि शेतकऱ्यांना हवामानाधारित अचूक सल्ला देणे शक्य होणार आहे.

****

धाराशिव जिल्हा परिषदेच्या सर्व चार विषय समित्यांच्या सभापतीपदी महायुतीचे सदस्य निवडून आले आहेत. काल झालेल्या सभेत महिला बालकल्याण सभापती पदी पूजा शिंदे, समाज कल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे, कृषी आणि पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खरसडे तर अर्थ आणि बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे यांची बहुमताने निवड झाली आहे.

****

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत पंढरपूर-शेगाव नवीन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी केली. सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.

**

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. काल या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी बीड जिल्ह्यातील केज, बीड तसंच गेवराई तालुक्यात खासगी जमीन संपादित होणार आहे. इतर शासकीय विभागाच्या जमीन हस्तांतरणाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

****

चालू आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने कर वसुलीत विक्रमी कामगिरी करत एकूण २२१ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये मालमत्ता करापोटी २०० कोटी रुपये तसेच पाणीपट्टीपोटी २१ कोटी रुपये संकलित झाले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचं सुक्ष्म नियोजन आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे ही विक्रमी वसुली शक्य झाल्याचं, मनपाचे उपायुक्त तथा कर निर्धारक आणि संकलक विकास नवाळे यांनी सांगितलं आहे.

****

जालना महानगरपालिकेने काल नवीन मोंढा परिसरात धडक कारवाई करत सुमारे १० क्विंटल प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टिक जप्त केलं. संबंधित व्यापाऱ्यांकडून एकूण ३० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

****

यंदाच्या टाटा आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. विद्यमान विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना आज एम. चिन्नास्वामी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. ३१ मे पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...