Saturday, 14 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      पश्चिम आशियातल्या युद्धाची झळ देशातल्या नागरिकांना बसू होऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील - पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      एलपीजी वाहक दोन भारतीय जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे मार्गस्थ

·      सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची नजरकैद तत्काळ प्रभावाने रद्द

·      वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘एआय’चा वापर

आणि

·      जर्मनीच्या शिष्टमंडळाची जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांना भेट

****

पश्चिम आशियातल्या युद्धाची झळ देशातल्या नागरिकांना बसू होऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आसाममध्ये सिलचर जिल्ह्यातल्या साडेतेवीस हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास कामांची दूरस्थ पद्धतीने पायाभरणी केल्यावर पंतप्रधान बोलत होते. देशातल्या नागरिकांवर या युद्धाचा कमीत कमी प्रभाव पडावा, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

शिवालिक आणि नंदा देवी, या दोन भारतीय जहाजांनी, आज सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे सुरक्षितपणे मार्गक्रमण केलं. जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिल्लीत आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दोन जहाजांवरून ९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी आयात केला जात आहे. ही जहाजे १६ आणि १७ मार्च रोजी गुजरातमधल्या मुंद्रा आणि कांडला बंदरांवर पोहोचतील, असं सिन्हा यांनी सांगितलं.

****

२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अ‍ॅडव्हान्स टॅक्स ई-कॅम्पेन अंतर्गत करदात्यांना पाठवलेल्या काही ईमेल संदेशांबाबत प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण जारी केलं आहे. तांत्रिक त्रुटीमुळे काही करदात्यांना महत्त्वपूर्ण व्यवहारांचीचुकीची माहिती असलेले ईमेल प्राप्त झाले. अशा करदात्यांना मागील ईमेलकडे दुर्लक्ष करण्याची विनंती करण्यात आली आहे.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘फास्टटॅग’ वार्षिक पासचे दर अडीच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन हजार रुपयांत मिळणारा हा वार्षिक पास आता ३ हजार ७५ रुपयांना मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून हे नवे दर लागू होतील.

****

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत झालेली नजरकैद सरकारने तत्काळ प्रभावाने रद्द केली आहे. लेहमध्ये निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून या उद्दिष्टपूर्तीसाठी नजरकैद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं गृह मंत्रालयाने दिलेल्या यासंबंधीच्या निवेदनात म्हटलं आहे.

****

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी साहेबी थाट बाजूला सारून जनतेचं काम करावं, असं आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातल्या हिरडव इथं आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात महसूल विभागासह इतर १५ हून अधिक विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण जनतेने या अभियानाचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव

****

राज्य शासनाच्या विविध योजना तसच महसूल विषयक सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान अभियानराबवण्यात येत असल्याचं, जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी म्हटलं आहे. घनसावंगी तालुक्यातल्या राणी उंचेगाव इथं आज घेतलेल्या महसूल समाधान शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिरात ७२० नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ देण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटावेटर तसंच इतर कृषी उपकरणांचं वाटप करण्यात आलं आहे.

****

सामान्य नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवून शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचाव्यात, असं आवाहन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भांबोरा इथल्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात झालेल्या समाधान शिबिरात ते बोलत होते. शासनाने राबविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातूनप्रशासन जनतेच्या दारी नेण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. महाराजस्व समाधान शिबिरातून शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, सामाजिक न्याय, महिला आणि बालकल्याण यासह सर्वच क्षेत्रांतील योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅस पुरवठा नियमित सुरू असून कुठेही टंचाई नसल्याचं, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितलं आहे. गॅस एजन्सीतर्फे व्यवस्थित गॅस पुरवठा सुरू असून जिल्ह्यात कुठेही काळाबाजार होत असल्याचं वृत्त नाही, मात्र गॅस घेण्यासाठी नागरिक विनाकारण गर्दी करत असल्यानं, रांगा वाढल्या असल्याचं, फुलारी यांनी सांगितलं. जिल्ह्यात भरारी पथकाने आतापर्यंत ४६ एजन्सीची तपासणी केल्याची माहिती फुलारी यांनी दिली.

****

एलपीजीच्या वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा जाणीवपूर्वक करण्यात आलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरी इथं संबंधित विभागाच्या बैठकीत बोलत होते. असा दिरंगाईचा प्रकार आढळल्यास संबंधित कंपन्या किंवा व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असंही सामंत यांनी सांगितलं. शासनाने १३ मार्च रोजी गॅस वितरणाची मार्गदर्शक तत्त्वं ठरवली असून, त्यानुसार वितरण केलं जाणार असल्याचं, सामंत यांनी नमूद केलं.

****

नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशित असलेल्या गावातील नागरिकांचा वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा, यासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करत अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. पिपरिया या गावाजवळ तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात योगदान देणाऱ्या मार्व्हल या संस्थेच्या वतीने ‘एआय’ आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे.

****

जर्मनीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांना भेट दिली. अजिंठा लेणीतील चित्रकला आणि शिल्पकृती पाहून या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुढाकारातून या शिष्टमंडळाचा दौरा आखण्यात आला आहे. राज्यातील शेतकरी, ग्रामीण भागातील पर्यटन उद्योजक तसेच महिलांसाठी पर्यटनाशी संबंधित विविध उद्योग आणि व्यवसायाच्या संधी, आपल्या विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं, पर्यटन विभागाचे उपसंचालक विजय जाधव यांनी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीच्या ऐतिहासिक घटनेला यंदा ३६० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृतींना उजाळा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या विशेष ‘हेरिटेज वॉक’चं आयोजन करण्यात आलं आहे. इतिहासानुसार, पुरंदरच्या तहानंतर पाच मार्च १६६६ रोजी रायगडावरून आग्रा प्रवासासाठी निघालेले छत्रपती शिवाजी महाराज साधारण आठवडाभरात तत्कालीन औरंगाबादला पोहोचले होते. शहराच्या या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे.

****

युवा वर्गामध्ये वाचनाची ओढ निर्माण करण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वपूर्ण ठरतात, असं मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं होत असलेल्या दोन दिवसीय लातूर जिल्हा ग्रंथोत्सव आणि ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी मराठवाड्यातील सुमारे ३५० शाळा आणि महाविद्यालयांना प्रत्येकी ३६ हजार रुपयांची ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं.

****

परभणी विधानसभा क्षेत्रात मतदार यादी अचूक तसंच अ‌द्ययावत ठेवण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केलं आहे.

****

शासनाच्या अमृत संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर इथं दोन दिवसीय ‘अमृत पेठ’ मेळाव्याचा आज प्रारंभ झाला. स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना आणि स्थानिक कारागिरांना बाजारपेठ मिळवून देणं हा या मेळाव्याचा उद्देश आहे.

****

येत्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याकाळात रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिकमध्येही वातावरण उष्ण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिकचा घाटमाथा इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड आणि परभणीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...