Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 19
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार शक संवत १९४८ या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगलतोरण आणि कडूलिंबाचे डहाळे बांधून
तसंच इष्टदेवतांच्या दर्शनाने हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने
घर, वाहन तसंच सोन्याचांदीच्या आभुषणांसह इतर महत्त्वाच्या खरेदीचा प्रघात
आहे.
देशाच्या विविध भागात चैत्र शुक्लादि, उगादी, चेती चंद, नवरेह आणि साजिबू
चेरोबा, हे सण देखील आज साजरे होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना
या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहे. हे सण म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं
प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण
नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतिक असून, नवचैतन्य, आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येतो,
असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
चैत्र नवरात्रीच्या देखील मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यानिमत्त त्यांनी
शक्तिची देवता दुर्गेकडे विकसित राष्ट्राच्या संकल्पाला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचं
आवाहन केलं.
हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांना निरामय
आरोग्य लाभो आणि यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा, मराठीची गुढी
आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हंटलं आहे.
दरम्यान, फडणवीस आज
नागपूर इथं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त आयोजित 'भव्य शोभायात्रा आणि रामरक्षा पठण' कार्यक्रमात सहभागी झाले होते.
****
महाराष्ट्रातल्या विणकरांच्या हस्तकलेला प्रोत्साहन तसंच पारंपारिक वस्त्रकलेला
बाजारपेठ उपलबध करुन देण्यासाठी गुढी पाडव्याचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या नवीन
महाराष्ट्र सदनात आजपासून भव्य महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
२२ मार्च पर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
****
अकोल्याच्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने नववर्षाच्या स्वागतासाठी
आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत सजलेले नागरिक मोठ्या उत्साहात
यात सहभागी झाले होते. अकोल्याचं आराध्य दैवत श्री राज राजेश्वर महाराज मंदिरापासून या रॅलीची
सुरुवात झाली.
****
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात मिशन ओ टू च्या वतीने महिलांनी वृक्षारोपणाची
गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव साजरा केला.
यावेळी उपस्थित महिलांना वृक्षारोपणाची शपथ देण्यात आली.
****
भारतीय जनता पक्षाने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी
आज जाहीर केली. या यादीत ३९ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी, याच आठवड्यात
पक्षाने ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. केरळमध्ये विधानसभा निवडणुका पुढच्या
महिन्याच्या नऊ तारखेला एकाच टप्प्यात होणार आहेत.
दरम्यान, विविध राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी
देखील भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. त्रिपुरा,
गोवा, नागालँड, कर्नाटक, या राज्यातल्या उमेदवारांचा यात समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून
वैजापूर तालुक्यातल्या दहेगाव प्रकल्पापर्यंत कालव्याचं काम पूर्ण करावं, अशी मागणी दहेगाव
प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या मागणीचं निवेदन त्यांनी
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे
विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना सादर केलं.
****
नवनाथांपैकी एक असणाऱ्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील शिंदेफळ इथं कालपासून सुरुवात
झाली. ही यात्रा तीन दिवस चालणार आहे
अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल
होत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय
यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत महावितरणच्या
वीजचोरी संदर्भातील ३९ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमधून
एकूण १२ लाख ८३ हजार ६४० रुपये वसूल करण्यात आले.
****
फ्रान्स मध्ये सुरु असलेल्या ऑरलियन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष
एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत भारताच्या आयुष शेट्टीचा सामना जपानच्या युदाई ओकिमोतो
सोबत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment