Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा क्षेत्रात भारत सक्षमपणे वाटचाल करत
असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
· संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ-विरोधकांच्या गदारोळामुळे
लोकसभेचं कामकाज बाधित
· इंधन टंचाईच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये-मुख्यमंत्र्यांचं आवाहन
· रिक्षा परवान्यांचं वाटप स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
आणि
· पैठण इथं वारकऱ्यांच्या मांदियाळीत नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ
****
प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा क्षेत्रात भारत सक्षमपणे
वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात
जाहीर करण्यात आलेल्या, सबका साथ, सबका विकास – लोकांच्या आकांक्षांची पूर्तता या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला
ते आज संबोधित करत होते. गेल्या काही वर्षांत शेकडो जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयं
सुरू झाली आहेत,
तसंच गावागावत आरोग्य सेवा पोहोचल्या आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले -
बाईट – पंतप्रधान नरेंद्र
मोदी
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु
झाला. लोकसभेत कामकाज सुरु होताच दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर
१२ वाजता पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर घोषणाबाजी
सुरू केली. यामुळे सदनाचं कामकाज प्रथम तीन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब
करावं लागलं.
****
पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी राजनय आणि संवाद हेच प्रभावी
माध्यम असल्याचं, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं
आहे. ते आज लोकसभेत याबाबत निवेदन देत होते. भारत शांततेच्या बाजूने असून, निर्माण झालेला हा तणाव कमी करण्याचं आवाहन करत असल्याचं, जयशंकर यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
राज्यसभेतही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पश्चिम आशियातल्या
देशांमधल्या परिस्थितीवर निवेदन केलं. कोची इथं सध्या आश्रयाला आलेल्या इराणी जहाजाबाबतही
त्यांनी सभागृहाला माहिती दिली. दरम्यान, पश्चिम आशियातल्या विमान वाहतुकीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्री
के राममोहन नायडू यांनी दिली.
****
पश्चिम आशियात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन
टंचाईच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,
असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अहे. विधीमंडळ
परिसरात वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, केंद्र
सरकार सर्व आवश्यक गोष्टींची काळजी घेत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्याबद्दल राज्य विधीमंडळात भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात आलं. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेला हा ठराव, सदनाने
एकमतानं मंजूर केला. संसदेच्या दोन्ही सभागृहातही भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्यात
आलं.
****
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. आज लोकसभेत एका लेखी
उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
महिलांच्या विकासाशिवाय कोणत्याही समाजाचा सर्वांगिक विकास शक्य
नसल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान इथं सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांना
आपल्या कामाचं श्रेय तसंच योग्य मोबदला आतापर्यंत मिळाला नसल्याचं खंत मान्य करावी
लागेल,
असं त्यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या -
बाईट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान
परिषदेचे सभापती राम शिंदे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती
तटकरे,
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात कार्यरत दहा तरुणींना यावेळी मान्यवरांच्या
हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या सध्या
रोहा इथं नियुक्त वनरक्षक ज्योती मिरगणे यांचा समावेश आहे.
****
राज्य महिला आयोगाला निधीची कमतरता भासू दिली जात नाही, महिला आयोगाला मागणीनुसार निधी उपलब्ध करुन दिला जातो, असं
महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितलं. आयोगाच्या
निधीत दरवर्षी वाढ होत असल्याचं सांगत, यावर्षी १८ कोटी ३५ लाखांची
तरतूद करण्यात येत असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली.
****
राज्यातल्या पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात
रिक्षा परवान्यांचं वाटप आजपासून स्थगित करत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांनी जाहीर केलं. आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना, मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. याआधी १९९७ मध्ये घातलेली रिक्षा परवाने वाटपावरची स्थगिती सरकारने
जून २०१७ मध्ये उठवली होती. एक जानेवारी २०२६ पर्यंत राज्यात १२ लाख ९६ हजार रिक्षा
धावत असून अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडी आणि वायूप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येत
होत्या. त्यामुळे रिक्षा परवाने वाटपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती
सरनाईक यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा
नाथषष्ठी सोहळा भक्तिभावाने साजरा होत आहे. नाथवंशजांच्या निर्याण दिंडीने सकाळी नाथांच्या
समाधी मंदिराकडे प्रस्थान ठेवलं. त्यानंतर
समाधी सोहळ्याचं कीर्तन तसंच वारकरी वैष्णव पाद्यपूजन कार्यक्रम पार पडला. हरिपाठ आणि भजनाने आजच्या कार्यक्रमांचा समारोप होत आहे. उद्या
सकाळी विविध पुरस्कार वितरण, गुरूपूजन तसंच नाथ महाराजांचा
छबिना पालखी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरातून वारकऱ्यांच्या सातशे दिंड्या
पैठण नगरीत दाखल झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा इथल्या नाथ मंदिरातून पालखी
काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, आणि वारकरी मंडळाच्या
अभंगगायनात निघालेल्या या पालखीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
****
केंद्र सरकार विरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आज हिंगोली
इथं पदयात्रा काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कळमनुरी
इथून सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेतून आदिवासी तसंच वंचित घटकांच्या
विविध समस्यांबाबत आवाज उचलण्यात आला.
****
नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव खासदार अशोक चव्हाण
यांनी आज राज्यसभेत मांडला. हा फक्त दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प नसून, विदर्भ,
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना रेल्वे
मार्गे जवळच्या अंतराने जोडणारी एक महत्त्वाची ‘मिसिंग लिंक’ असल्याने या प्रकल्पाला मंजुरी द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. या प्रकल्पाचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून, प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या
खर्चात ५० टक्के वाटा उचलण्याचं मान्य केलेलं आहे, याकडेही
चव्हाण यांनी लक्ष वेधलं.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातील खाम आणि सुखना या दोन्ही नद्यांच्या
पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिका
आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भातला आढावा घेतल्यानंतर बोलत होते.
खाम पुनरुज्जीवनाचं काम सहा वर्षांपासून सुरू असून, सुखना
नदीच्या पुनरुज्जीवनालाही वर्षभरापूर्वी प्रारंभ झाला आहे.
****
No comments:
Post a Comment