Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 23 March 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या
अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक
·
राज्यात हॉटेल्स, उपाहारगृहांसाठी आजपासून २० टक्के अतिरिक्त
गॅस पुरवठा
·
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने उमेद
मॉल उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
·
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पटकावला महाराष्ट्र केसरीचा
किताब
आणि
·
लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा
यलो अलर्ट
****
पश्चिम
आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल
नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक घेतली. या बैठकीत पेट्रोलियम, कच्चं तेल,
गॅस, ऊर्जा आणि खतं या महत्त्वाच्या क्षेत्रांचा
सविस्तर आढावा घेण्यात आला. देशभरात सुरळीत पुरवठा, स्थिर लॉजिस्टिक्स
आणि प्रभावी वितरण सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला. नागरीकांचा या संघर्षातून
बचाव करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
आवश्यक वस्तुंचा काळाबाजार आणि साठेबाजी होऊ नये, यासाठी राज्य
सरकारांसोबत समन्वय साधण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
आंतरराष्ट्रीय
जल दिनाच्या निमित्तानं काल दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, पाण्याच्या
प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध
असल्याचं सांगितलं. पाणी जीवनाचा आधार असून, पृथ्वीच्या भविष्याचा
आकार असल्याचं त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्र संघानं देखील या निमित्तानं पाणी
आणि लिंग समानता या अनुषंगानं ‘जिथे पाणी वाहतं तिथं समानता वाढते’ ही संकल्पना मांडली
आहे.
****
दरम्यान, देशात सर्वाधिक
काळ सरकारप्रमुख राहण्याचा ऐतिहासिक विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर
नोंदवला गेला आहे. यापूर्वी पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर असलेला आठ हजार ९३० दिवसांचा
विक्रम मोडीत काढत मोदी यांनी, आठ हजार ९३१ वा दिवस पूर्ण केला
आहे. या विक्रमात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा दीर्घ कार्यकाळही समाविष्ट आहे.
****
राज्यातली
हॉटेल्स, उपाहारगृहांसाठी आजपासून २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार असल्याची
माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यातली
हॉटेल्स, ढाबे, उपहारगृहं, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय,
राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या
अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांचा यात समावेश आहे. पेट्रोलियम
आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भातली सूचना गेल्या शनिवारी जारी केली होती.
तसंच, राज्यातल्या केरोसिन वितरणाबाबतही महत्त्वाचे निर्णय घेतले
आहेत. प्रलंबित परवान्यांचं नूतनीकरण झाल्याचं मानलं जाईल आणि त्यासाठी कोणतंही शुल्क
आकारलं जाणार नाही, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
****
निसर्गोपचार
हा निसर्गाशी साहचर्य राखणाऱ्या जीवनशैलीला प्रोत्साहन देतो, असं प्रतिपादन
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. पुण्यात काल निसर्गोपचार आश्रमाच्या ८१
व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. निसर्गोपचार हा भारताच्या प्राचीन परंपरेचा
अविभाज्य भाग असून, आधुनिक युगातही तो तितकाच समर्पक असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
राज्यसभा
उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. निसर्गोपचार जीवनशैलीचा
भाग म्हणून स्वीकारण्याचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
****
राज्यातल्या
१२ जिल्ह्यांत महिला बचत गटांचे उमेद मॉल उभारण्यात येत असून, ३६ जिल्ह्यांत
टप्प्याटप्प्याने उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर इथं काल महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला
भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महालक्ष्मी
सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचं ठिकाण नसून, महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ
म्हणून कार्य करत असल्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली.
**
दरम्यान, नागपूर इथं
वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, भोंदू ज्योतिषी अशोक
खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी दुर्व्यवहार झालेल्या
प्रत्येक पीडितेला न्याय देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
**
अशोक खरात
याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका पिडित महिलेनं गर्भवती असताना खरातनं त्याच्या
कार्यालयात बोलून अत्याचार केला तसंच अघोरी कृत्य करण्यासाठी सिन्नर तालुक्यातल्या
ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या नावानं पैसे घेतल्याची तक्रार नोंदवली आहे.
****
जालना तालुक्यातल्या
निरखेडा इथं काल 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहात पार पडलं. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा,
या उद्देशाने आयोजित या शिबिरात महसूल, आरोग्य
आणि कृषी विभागांच्या स्टॉल्सद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं, तसंच सातबारा, ८-अ उतारे, फेरफार
प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. तसंच संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड दुरुस्ती तसंच विविध दाखल्यांचं वितरणही करण्यात आलं.
****
नांदेड
जिल्हा परिषदेच्या वतीनं ६७ विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इसरो इथं
शैक्षणिक सहलीसाठी काल उत्साहात रवाना करण्यात आलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये
विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आकर्षण निर्माण व्हावं, त्यांच्या
बुद्धिमत्तेला चालना मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा या उद्देशानं या सहलीचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
माजी खासदार
दत्ता मेघे यांचं काल नागपूर इथं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. राजकारण,
शिक्षण या क्षेत्रामध्ये आपली छाप उमटवणाऱ्या दत्ता मेघे यांनी विदर्भातल्या
राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्ता
मेघे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. विदर्भातल्या शैक्षणिक आणि वैद्यकीय
क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.
****
माजी खासदार, ज्येष्ठ साहित्यिक,
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक
कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना काल लातूर इथं आयोजित सभेत श्रद्धांजली वाहण्यात
आली. डॉ. नागोराव कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांनी यावेळी वाघमारे यांच्या शैक्षणिक आणि
वैचारिक प्रवासाचा वेध घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
****
एपस्टिन
फाईल प्रकरणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आज संयुक्तपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
नागपूरमधल्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे. नागपुरातल्या संविधान चौक ते राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली
हा मोर्चा निघणार आहे.
****
पुण्यात
वाघोली इथं झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती
स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात त्याने
सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा ४-३ अशा चुरशीच्या लढतीत पराभव करत दुसऱ्यांदा महाराष्ट्र
केसरी किताब जिंकला. मानाची चांदीची गदा, पाच लाख रुपये आणि फॉर्चुनर गाडी हर्षवर्धन
सदगीरला प्रदान करण्यात आली.
****
एकही विद्यार्थी
शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने कार्यरत असलेल्या लातूरच्या दिशा प्रतिष्ठानच्या
वतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना काल धनादेशाचं वाटप करण्यात आलं.
या उपक्रमांतर्गत १६ विद्यार्थ्यांना एकूण दोन लाख ५३ हजार रुपयांची शैक्षणिक मदत करण्यात
आली.
****
चारठाणा-मंठा
मार्गावर काल कार आणि मिनी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण
जखमी झाले. मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथल्या सय्यद कुटुंबातले पती–पत्नी
आणि त्यांच्या आठ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेनं अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले
आहेत. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात दिलेल्या आदेशानंतर अतिक्रमण नियंत्रण
अधिकारी संतोष वाहुळे यांचं पथक शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असल्याची
माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
हवामान
विभागाने आज लातूर, धाराशिव, सातारा, सांगली,
सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात तुरळक
ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची आणि हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडन्याची
शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment