Monday, 23 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मार्च २०२ सकाळी.०० वाजता

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत ‘कॉर्पोरेट कायदे दुरुस्ती विधेयक २०२६’ सादर करणार आहेत. या विधेयकाद्वारे ‘मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००६’ आणि ‘कंपनी कायदा २०१३’ मध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त ‘वित्त विधेयक २०२६’ देखील सभागृहाच्या आजच्या कामकाजात विचारार्थ आणि मंजुरीसाठी समाविष्ट करण्यात आलं आहे. तर राज्यसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ‘केंद्रीय सशस्त्र पोलिस दल सामान्य प्रशासन विधेयक २०२६’ सादर करणार आहेत.

****

क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा हुतात्मा दिवस आज पाळण्यात येत आहे. यानिमित्त मेरा युवा भारत आज देशभर पदयात्रा आयोजित करत आहे. माझा भारत माझी जबाबदारी अशी आजच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना अभिवादन केलं आहे. देशासाठी या क्रांतिकारकांनी दिलेलं बलिदान सदैच स्मरणात राहिल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

देशभरात अत्यावश्यक इंधनांचा तुटवडा नसल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारने केला आहे. देशातले तेल शुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत असून, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. किरकोळ विक्री केंद्रांवरही इंधनाची कमतरता नाही, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राज्यांना व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त पुरवठा करण्यात आला असून, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य दिलं जात असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

****

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत आज संध्याकाळी संपेल. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. या तीन विधानसभा निवडणुकांसाठी येत्या नऊ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

****

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत मतदानाच्या वेळी उपस्थित असलेले राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह इतर नेते आणि सदस्यांना पोलिसांनी अरेरावी आणि धक्काबुक्की केल्याचा मुद्दा हेमंत देसाई यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला. याप्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधितांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. या निर्देशांचं तंतोतंत पालन सरकार करेल, असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. शंभुराज देसाई यांनी या घटनेचं सविस्तर वर्णन केलं आणि राज्यात मंत्रीही सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला. सभागृहाच्या अनेक सदस्यांनी या विषयावरच्या चर्चेत भाग घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला.

****

जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी गुढीपाडवा-पट वाढवा; हे अभियान लोकचळवळ बनवून प्रत्येक गावात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असं मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या गरदरेवाडी जिल्हा परिषद शाळेत या राज्यस्तरीय अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

****

आगामी काळात भारत ग्लोबल साऊथ मधल्या सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा पूर्ण करेल, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल आयआयटी मुंबई मध्ये आयोजित भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट २०२६; च्या समारोप समारंभात बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित भारताचं’ उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी शिक्षण, उद्योग, अर्थ क्षेत्र आणि देशातल्या तरुणांची आहे, असं ते म्हणाले. या दोन दिवसीय कार्यक्रमात १३७ स्टार्ट-अप्सनी भाग घेतला असून, त्यांनी सुमारे २०० गुंतवणूकदार आणि ८० कॉर्पोरेट्सशी संवाद साधल्याची माहिती आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी दिली.

****

महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर काल रात्री तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. एका ३३ वर्षाच्या पीडित महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे गरोदर असताना खरात याने तिच्यावर अत्याचार केला तसंच गर्भपात केला असं तक्रारीत म्हटलं आहे.

****

लातूर इथं काल गुढीपाडव्यानिमित्त 'हिंदू युवती आणि महिला संमेलन’ पार पडलं. या संमेलनाच्या प्रमुख वक्त्या म्हणून हिंदू मानवाधिकार कार्यकर्त्या काजल हिंदुस्थानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

****

इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरीत भारतीय खेळाडुंनी विजेतेपद पटकावलं. महिला एकेरीत अनाहत सिंगनं इजिप्तच्या हाना मोताझ हिचा तीन – एक असा पराभव केला. तर पुरुष एकेरीत अभय सिंग याने भारताच्याच वीर चोत्रानी याचा तीन – शून्य असा पराभव केला.

****

मुंबईतल्या महसूल गुप्तचर संचालनालयाने न्हावा शेवा बंदरात एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत चीनमधून बेकायदेशीरपणे आयात केलेले ११ हजार ६० वॉकी-टॉकी संच आणि मोठ्या प्रमाणात जुने हार्ड डिस्क ड्रायव्हर्स जप्त करण्यात आले.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...