Thursday, 26 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

देशभरात आज श्रीरामनवमी उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान रामाचं जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि सद्गुणाच्या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करतं, त्यांचं जीवन आपल्याला समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचं पालन करण्याची देखील प्रेरणा देत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

दरम्यान, रामनवमीनिमित्त देशभरातल्या राम मंदिरांमध्ये राम जन्म सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. मराठेशाहीचा इतिहास व्यापकपणे समाजासमोर यावा यासाठी त्यांनी आयुष्यभर अविरत परिश्रम घेतले. त्यांच्या लेखणीतून साकारलेले २५ हून अधिक ग्रंथ हे इतिहास संशोधन क्षेत्रातील मोलाचे योगदान आहे. इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांचे चरित्रलेखन करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. पंचगंगा तिरी या नावाने डॉ. जयसिंगराव पवार यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे. पवार यांनी अनेक इतिहास परिषदांचं अध्यक्षस्थान भूषवलं, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. इतिहास संशोधन क्षेत्रातल्या कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं होतं. पवार यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर इथं अंत्यसंस्कार होत आहेत.

****

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यामध्ये ८९ लाख ७५ हजार २९८ शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर एकूण एक हजार ७९८ कोटी ७८ लाख रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरित करण्यात आले.

****

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन, कायदा-सुव्यवस्थेचं बळकटीकरण, गुन्हेगारी नियंत्रण, सायबर गुन्ह्यांवर आळा आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणा या सर्व क्षेत्रांत राज्य शासन व्यापक पातळीवर काम करत ठोस प्रगती साधत आहे. राज्यात गुन्हेगारीत घट झाली असून, न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधानसभेत विरोधी पक्षांच्या वतीनं मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला सविस्तर उत्तर देताना सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पोलीस दलाचं सशक्तीकरण आणि जलद न्यायप्रक्रिया यावर भर देत राज्यातली सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

पुणे जिल्ह्यात महसूल कायदा कलम १५५ चा गैरवापर करून बेकायदेशीर आदेश पारित केल्याच्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या तपासणीत ४२४ प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता आढळली. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

****

भोंदू बाबा अशोक खरातवर नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा काल दाखल झाला. खरात याने पुण्याच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडून वेळोवेळी एकुण सुमारे पाच कोटी रूपयांची खंडणी उकळली आणि मर्सीडीज कारची गिफ्ट म्हणून बळजबरीने खरेदी करण्यास भाग पाडल्याची तक्रार संबंधीत उद्योजकाने केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या २०२५–२६ च्या सुधारित, आणि २०२६–२७ च्या मूळ अर्थसंकल्प पुस्तिकेचं काल मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

परभणी इथं 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी तसंच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

****

नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं श्री सप्तश्रृंगी देवीच्या गडावर आजपासून चैत्र उत्सवाला सुरुवात झाली. आज दुपारी नवचंडी याग आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दोन एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लासूर इथल्या दाक्षायणी देवीच्या यात्रेला आज कंकण बांधण्याच्या विधीनं सुरुवात झाली. प्रत्यक्ष यात्रा सात एप्रिलपासून अक्षय्य तृतीयेपर्यंत चालणार असल्याचं, मंदिर व्यवस्थापन समितीकडून कळवण्यात आलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...