Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 08 March 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
महिलांना समान संधी मिळतील असा समाज निर्माण करावा-जागतिक
महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींचं आवाहन
·
एचपीव्ही राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला आज महिला दिनापासून
सुरूवात
·
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना पात्र संस्थांच्या
कृषी कर्जासाठी लागू-मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा
·
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत साठ रुपयांनी वाढ
आणि
·
टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जेतेपदासाठी आज
भारत– न्यूझीलंड लढत; तर ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन अंतिम फेरीत दाखल
****
जागतिक
महिला दिन आज साजरा केला जात आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. महिला या समाजाचा आणि राष्ट्राचा पाया
असून शिक्षित, स्वावलंबी आणि सक्षम महिला समृद्ध आणि प्रगतीशील
राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, कला आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रात महिलांनी आपली प्रतिभा दाखवली असल्याचं
सांगत महिलांना समान संधी मिळतील असा समाज निर्माण करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी देशवासियांना
केलं.
‘सर्व महिला
आणि मुलींच्यासाठी योग्य न्यायिक कारवाई’ हा यंदाचा महिला दिनाचा विषय आहे.
****
राष्ट्रीय
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा
दिल्या आहेत. महिलांनी कायद्याअंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून आत्मविश्वास
कायम ठेवण्याचा आणि पुढे जाण्याचा सल्ला रहाटकर यांनी दिला.
****
जागतिक
महिला दिनानिमित्त राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रमांचा शुभारंभ
करण्यात येत आहे. गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही लसीकरण या राज्यव्यापी मोहिमेला
आजपासून सुरूवात होत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत
हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यातल्या पात्र नऊ लाख,
८४ हजार, ४१४ मुलींचं पालकांच्या संमतीनं मोफत
लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबवण्यात येणार
आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मानही यावेळी
करण्यात येणार आहे.
****
जागतिक
महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया – साईच्या वतीने
विभागीय क्रीडा संकुलावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री
रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची दुचाकी
फेरी काढण्यात येणार आहे. सकाळी साडेसात वाजता क्रांती चौक इथून या फेरीला सुरूवात
होईल. औरंगपुरा भागातल्या महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
पुतळ्यांना अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या फेरीचा समारोप होईल.
****
जागतिक
महिला दिनानिमित्त तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि आरोग्य विभागाच्या
वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या
शिबिरास काल महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
राज्याच्या
अर्थसंकल्पात जाहीर झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, ही कोणत्याही
पात्र संस्थेकडून घेतलेल्या कर्जासाठी लागू राहील, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
ही कर्जमाफी बँकेसाठी नसून शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे प्रत्यक्ष
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंमलबजावणीची कार्यपद्धती तयार करण्यात येत
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
नागपूर
इथं राज्यातल्या पहिल्या एक्स एस आय ओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक आणि निर्मिती
पार्कचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. राज्य शासनाच्या उद्योग
पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत असल्याचं, ते यावेळी
म्हणाले. या प्रकल्पामार्फत राज्यात आठ हजार १४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून,
त्याद्वारे राज्यात ३५ हजार हून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट
आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाला कालपासून प्रारंभ झाला. जालना जिल्ह्यात
बदनापूर तालुक्यातल्या बावणे पांगरी इथं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या अभियानाचं
उद्घाटन केलं. यातून लोकाभिमुख प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
लातूर जिल्ह्यात
अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव इथं आयोजित समाधान शिबिराचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब
पाटील यांच्या हस्ते झालं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बीड तालुक्यात
नित्रुड इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचं आमदार प्रकाश सोळंके यांनी काल उद्घाटन केलं.
****
घरगुती
गॅस सिलिंडरच्या किंमतीत साठ रुपयांनी वाढ झाली आहे. महानगरांमध्ये हे नवे दर लागू
झाले आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत देखील ११५ रुपयांनी वाढ करण्यात
आली आहे.
****
होर्मूझच्या
सामुद्रधुनीतली जलवाहतूक बंद झाल्यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात खंड
पडल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असून, भारताकडे पुरेसा इंधन
साठा आणि पर्यायी पुरवठा स्रोत असल्याचं हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं स्पष्ट केलं
आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये,
असं कंपनीनं ट्विट करून सांगितलं आहे.
****
टी–ट्वेंटी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडासंकुलात सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू होणार आहे.
****
भारताच्या
लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली
आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यने कॅनडाच्या व्हिक्टर लाय याचा
२१-१६, १८-२१, २१-१५ असा पराभव केला. आज या स्पर्धेच्या
अंतिम फेरीत लक्ष्यचा सामना चीनी तैपेईच्या लीन चून ई याच्यासोबत होणार आहे. भारतीय
वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता हा सामना सुरू होईल.
****
रंगपंचमीचा
सण आज साजरा होत आहे. राज्यात नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूरसह काही भागात
धुलिवंदनाऐवजी आज रंग खेळण्याचा प्रघात आहे. नाशिक इथं या सणासाठी पेशवेकालीन रहाडी
म्हणजेच जमिनीतील कमी उंचीचे हौद उघडून त्यांची स्वच्छता करण्यात आली. शहरात पेशवेकालीन
आठ रहाडी असून, त्यात रंग भरून हा उत्सव साजरा केला जातो.
****
अहिल्यानगर
जिल्ह्यात श्री क्षेत्र मढी इथं संत कानिफनाथांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे.
कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असून, त्यांच्या
सोयीसुविधांसाठी देवस्थानच्या वतीने सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. गुढी पाडव्यापर्यंत
चालणारी ही यात्रा, हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतिक म्हणूनही
ओळखली जाते.
****
यंदाच्या
अर्थसंकल्पात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग-एम एस एम ई साठी केलेल्या तरतुदींचं उद्योग
क्षेत्राकडून स्वागत होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथले मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड
यांनी याबाबत सरकारचे आभार मानले. ते म्हणाले,
बाईट – अर्जुन गायकवाड
**
या अर्थसंकल्पात
एज्यूकेशन सिटीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यावर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे
सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
बाईट – डॉ. श्रीरंग देशपांडे
****
रमजान महिन्यात
विविध खाद्यपदार्थांची दुकानं आणि ठेल्यांनी सजलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या
बुढीलेन परिसरात इंटॅकच्या वतीनं काल हेरिटेज फूड वॉक घेण्यात आला. खाद्य संस्कृतीचा
इतिहास आणि त्यातून विकसित झालेली शहरातील खाद्य परंपरा-वारसा याची सविस्तर माहिती
ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉक्टर दुलारी कुरेशी यांनी दिली. महापौर समीर राजुरकर यांची यावेळी
प्रमुख उपस्थिती होती.
****
नांदेड
जिल्ह्यात मालेगाव जिल्हा परिषद शाळेतले राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे
यांची राज्य शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या
सदस्य सचिव पदी निवड झाली आहे. शिवा कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, साहित्य,
सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या
साहित्याचे सात खंड प्रकाशित झाले असून, यामध्ये शिवा कांबळे
यांचं मोठं योगदान आहे.
****
No comments:
Post a Comment