Saturday, 7 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      महिलांना समान संधी मिळतील असा समाज निर्माण करावा-जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं आवाहन

·      एचपीव्ही राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला उद्या महिला दिनापासून सुरूवात

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना पात्र संस्थांच्या कृषी कर्जासाठी लागू-मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

आणि

·      घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात साठ रुपयांनी वाढ

****

जागतिक महिला दिन उद्या साजरा केला जात आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. महिला या समाजाचा आणि राष्ट्राचा पाया असून शिक्षित, स्वावलंबी आणि सक्षम महिला समृद्ध आणि प्रगतीशील राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात असं मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, कला आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रात महिलांनी आपली प्रतिभा दाखवली असल्याचं सांगत महिलांना समान संधी मिळतील असा समाज निर्माण करण्याचं आवाहन मुर्मू यांनी केलं.

****

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उद्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही लसीकरण या राज्यव्यापी मोहिमेला उद्यापासून सुरूवात होत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माहिमेत राज्यातल्या पात्र नऊ लाख ८४ हजार ४१४ मुलींना पालकांच्या संमतीनं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे.

****

जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साईच्या वतीने विभागीय संकुलावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत सकाळी साडे सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी साडेसात वाजता क्रांती चौक इथून या फेरीला सुरूवात होणार असून औरंगपुरा भागातील महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालय इथं या फेरीचा समारोप होईल. जिल्ह्यातल्या सर्व शासकीय विभागांतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, ही कोणत्याही पात्र संस्थेकडून घेतलेल्या कर्जासाठी लागू राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही कर्जमाफी बँकेसाठी नसून शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंमलबजावणीची कार्यपद्धती तयार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

नागपूर इथं राज्यातल्या पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक आणि निर्मिती पार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत असल्याचं प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामार्फत राज्यात आठ हजार १४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून त्याद्वारे राज्यात ३५ हजार हून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

****

बदलत्या युगात युवकांनीही कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय केंद्रित कौशल्यं आत्मसात करण्याचं आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केलं आहे. आज पुण्यात पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या १५व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाणार हा केवळ एक भ्रम असून भारताने तो मोडीत काढल्याचं राज्यमंत्री संजय सेठ यांनी नमूद केलं. सध्या युद्धाचं स्वरूपही बदललं असून, या क्षेत्रातही एआयचा प्रभावी वापर वाढला असल्याकडे संजय सेठ यांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

****

यंदाच्या अर्थसंकल्पात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग-एमएसएमईसाठी केलेल्या तरतुदींचं उद्योग क्षेत्राकडून स्वागत होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथले मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी याबाबत सरकारचे आभार मानले आहेत. ते म्हणाले -

बाईट – अर्जुन गायकवाड

****

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत साठ रुपयांनी वाढ झाली आहे. महानगरांमध्ये हे नवे दर लागू झाले आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत देखील ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

****

होर्मूझच्या सामुद्रधुनीतली जलवाहतूक बंद झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात खंड पडल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असून भारताकडे पुरेसा इंधन साठा आणि पर्यायी पुरवठा स्रोत असल्याचं हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं स्पष्ट केलं आहे. इंधन पुरवठ्यामधला व्यत्यय किंवा तुटवडा या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असं कंपनीनं ट्वीट करून सांगितलं आहे.

****

अमेरीका, इस्राइल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशानं तटस्थ राहून शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे. या संदर्भातलं पत्र त्यांनी पंतप्रधानांकडे सादर केलं आहे. भारतीय संस्कृती ही अहिंसा आणि शांतीचं प्रतीक आहे. भारतासारख्या सशक्त लोकशाही असलेल्या देशाने मानवता आणि शांतीचा संदेश पोहचवावा, अशी विनंती हजारे यांनी केली आहे.

****

लातूर जिल्ह्यात औसा इथं १४ आणि १५ मार्च रोजी लातूर ग्रंथोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर यांनी ही माहिती दिली. राज्य शासन आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा ग्रंथोत्सव होणार आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन, उत्कृष्ट वाचकांचा सत्कार, ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन काटकर यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद शाळेतले राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांची राज्यशासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. शिवा कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे सात खंड प्रकाशित झाले असून यामध्ये शिवा कांबळे यांचं मोठे योगदान आहे.

****

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या बावणे पांगरी इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाचं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज उद्घाटन केलं. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याचं प्रतिपादन मित्तल यांनी यावेळी केलं.

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील किनगाव इथं आयोजित समाधान शिबिराचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

****

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाय याच्यासोबत होत आहे. लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ली शी फेंग याला २१-१३, २१-१६ असं पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...