Friday, 20 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देश सध्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या प्रक्रियेतून जात असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      नाशिक इथल्या अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष महिला पोलीस अधिकाऱ्याकडे

·      गडचिरोली इथं अकरा नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

·      गुढीपाडव्याचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

आणि

·      सलग तिसऱ्या दिवशी राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात पिकांचं नुकसान

****

आपला देश सध्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या प्रक्रियेतून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल अयोध्या इथं श्री राम जन्मभूमी मंदिरात एका कार्यक्रमात बोलत होत्या. अयोध्येतलं हे श्रीराम जन्मभूमी मंदिर हे याच पुनर्जागरणाचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. विकसित देशाची संकल्पना राम राज्याच्या वर्णनातून स्पष्ट होते, विकसित राष्ट्राचं उद्दीष्ट २०४७ साली किंवा त्यापूर्वीच साध्य होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या…

बाईट-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान, राम जन्मभूमी मंदिरात दुसऱ्या मजल्यावरच्या गर्भगृहात ‘श्रीराम यंत्र’ काल राष्ट्रपतींच्या हस्ते स्थापन करण्यात आलं. दीडशे किलो वजनाच्या या श्रीराम यंत्रावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.

आदित्यनाथ यांनी यावेळी केलेल्या भाषणात, गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशातल्या विविध मंदिरांना अंदाजे दीड अब्जाहून अधिक भाविकांनी भेट दिल्याचं सांगितलं.

****

आगामी काही वर्षांत देशाने स्वदेशी ड्रोन निर्मितीचं जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करणं आवश्यक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेला ते काल संबोधित करत होते. सध्याच्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक स्वायत्तता सुनिश्चित करणं, संरक्षण सज्जता वाढवणं आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ड्रोन उत्पादन परिसंस्था उभारण्याची तातडीची गरज त्यांनी अधोरेखित केली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातला एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत आहे, असं देखील राजनाथ सिंह म्हणाले.

****

राष्ट्रीय महामार्गांवरच्या पथकर संकलनात पारदर्शकता आणि सुगमता रहावी याकरता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग नियमांच्या सुधारणेची अधिसूचना जारी केली आहे. पथकर चुकवणाऱ्यांकडून वसुली, ई–नोटीस एसएमएसद्वारे पाठवण्याची सुविधा, याबरोबरच पथकर दात्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी वेगळं पोर्टल इत्यादी नवीन बाबींचा यात समावेश आहे.

****

राज्यातल्या प्रत्येक ग्राम पंचायतीचं डिसेंबर २०२८ पर्यंत ‘हर घर जल’ प्रमाणीकरण साध्य करणं, तसंच पाणी पुरवठा योजनांची सक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची प्रमुख उद्दिष्टे ठेऊन, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि राज्य शासन यांच्यात काल दिल्ली इथं सामंजस्य करार झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमाला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ दिली असून, या नवीन टप्प्याला ‘जल जीवन मिशन-2.O असं संबोधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यांनी संरचनात्मक सुधारणा, कालमर्यादेचं पालन, योजनांची शाश्वतता आणि नागरीक-केंद्रित सेवांचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

****

नाशिक इथला तथाकथित ज्योतिषी अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष महिला पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे देण्यात आला आहे. सातपुते यांनी काल या प्रकरणाचा आढावा घेतला. अशोक खरात याने एका २८ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात याचं कार्यालय आणि घरातील झडतीत पेन ड्राइव्ह मध्ये ५८ व्हिडीओ सापडल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

गडचिरोली इथं काल ११ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांचावर एकूण ६८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. याप्रसंगी नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते

****

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, केळी क्लस्टरसह कोल्ड स्टोरेज, राइपनिंग चेंबर आणि आधुनिक साठवण सुविधांसाठी भरघोस अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. ते काल जळगाव इथं बोलत होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केळी उत्पादक शेतकऱ्यांशी चौहान यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

****

गुढीपाडव्याचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूर इथं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त काढलेल्या 'भव्य शोभायात्रा आणि रामरक्षा पठण' कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी नववर्षाच्या संकल्पाविषयी माहिती दिली. ते म्हणाले..

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

छत्रपती संभाजीनगरासह जिल्ह्यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. पैठण इथं शालिवाहनाच्या तीर्थस्तंभ परिसरात या निमित्तानं विशेष कार्यक्रम तसंच शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

**

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिराच्या कळसावर पहाटे गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजी बुवा आणि महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरगाठीचा हार अर्पण करण्यात आला.

**

हिंगोली इथल्या संतोष धारे यांच्या कुटुंबाने पुस्तकांची गुढी उभारून वाचनाचा संदेश दिला. विचारांचा वारसा समृद्ध करण्यासाठी आणि वाचन चळवळ अधिक मजबूत व्हावी, याकरता मराठी नववर्षाच्या स्वागताला पुस्तकांची गुढी उभारल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पाणलोट क्षेत्र विकासामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वात हिवरे बाजार गावाची यशोगाथा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मानस अमेरिकीतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकी शास्त्रज्ञांच्या पथकाने काल हिवरे बाजार गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गावातल्या माथा ते पायथा फिरून विविध उपक्रमाची माहिती घेतली. या दौऱ्याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

बाईट-मनोज सातपुते,अहिल्यानगर

****

राज्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काढणीस आलेल्या गहू आणि हरभरा पिकाचं या बेमोसमी पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काल गारपिटीत एक म्हैस तसंच एक बैल दगावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या कोंढुर, दिग्रस शिवारात तसंच हिंगोली तालुक्यातल्या जोडतळा, सिरसम भागात काल गारपीट झाली. गहू, हरभरा, तसंच हळद काढणीच्या दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. आंबा पिकाचंही नुकसान झालं आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात, अकोले, पाथर्डी तालुक्यात गावांमध्ये गारांसह पाऊस झाला.

सोलापूर, नाशिक, अकोला जिल्ह्यातही झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 

दरम्यान, आज मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सोमठाणा या उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार जाहीर झाला आहे. या मानांकन कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्राने निर्धारित केलेल्या निर्देशांकांची पूर्तता करून, विशेष परीक्षण करण्यात आले.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...