Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 26 March 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
आगामी आर्थिक वर्षासाठीचं वित्त विधेयक लोकसभेत आवाजी
मताने संमत
·
देशात इंधनाचा पुरेसा साठा-सरकारचं स्पष्टीकरण, नागरिकांनी
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
·
सुधारित उडान योजनेला पुढच्या दहा वर्षांसाठी केंद्रीय
मंत्रिमंडळाची मंजुरी
·
अशोक खरात प्रकरणी पाळंमुळं खोदून कठोर कारवाई-अंतिम आठवडा
प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांचा इशारा
आणि
·
राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता- परभणी, बीड,
नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना चार दिवसांसाठी
यलो अलर्ट
****
वित्त विधेयक
काल लोकसभेत संमत झालं. अनेक सुधारणा आणि नव्या तरतुदींसह मांडलेल्या या विधेयकावर
दोन दिवस झालेल्या चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. सुक्ष्म-लघु
आणि मध्यम उद्योगांसह शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कार्यरत
असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या…
बाईट - केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन
अर्थमंत्र्यांच्या
या उत्तरानंतर वित्त विधेयक आवाजी मतदानानं संमत झालं. त्यानंतर सीतारामन यांनी दिवाळखोरी
आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं.
****
देशात इंधनाची
कमतरता नसल्याचा निर्वाळा, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमनं दिला आहे. इंधन तुटवड्याच्या
बातम्या पूर्णपणे निराधार आहेत, पेट्रोल डीझेलच्या किंमतीही स्थिर
असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता
शर्मा यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या…
बाईट - सुजाता शर्मा
दरम्यान, प्रधानमंत्री
उज्ज्वला योजनेअंतर्गंत तसंच इतर योजनांर्तंगत सिलिंडरच्या नोंदणीचा कालावधी वाढवल्याच्या
बातम्याही निराधार असल्याचं स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिलं
आहे. सिलिंडर नोंदणीसाठी शहरी भागात २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवसांचा कालावधी
कायम असून, त्यात कोणताही बदल केलेला नाही, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
पश्चिम
आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल संसद भवन संकुलात सर्वपक्षीय
बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला
केंद्रीय मंत्र्यांसह, काँग्रेस नेते मुकुल वासनिक आणि तारिक अन्वर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास, समाजवादी
पार्टीचे धर्मेंद्र यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे इतर नेतेही उपस्थित होते. पश्चिम
आशियातल्या परिस्थितीसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री
किरेन रिजिजू यांनी सांगितलं. विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सरकार
तयार असल्याचं ते म्हणाले. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांना
पाठिंबा देण्याचं आश्वासन विरोधी पक्षांनी यावेळी दिलं.
****
केंद्रीय
मंत्रिमंडळाने प्रादेशिक दळणवळणासाठीच्या सुधारित उडान योजनेला पुढच्या दहा वर्षांसाठी
मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी २८ हजार ८४० कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात
आली. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेत, अद्याप धावपट्टीही
नसलेल्या ठिकाणी शंभर विमानतळं उभारली जाणार असून, सर्वसामान्य
नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुगम होणार असल्याचं, वैष्णव
यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळाने
इमिग्रेशन, व्हिसा, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग-आय
व्ही एफ आर टी योजनेला पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली, यासाठी एक हजार आठशे कोटी रुपये खर्चालाही मान्यता दिल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
आकाशवाणीच्या
दैनंदिन प्रसारणाची सुरुवात आजपासून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण प्रसारणाने
झाली. आतापर्यंत या गाण्याची पहिली दोन कडवीच दररोज सकाळी वाजवली जात, मात्र आता
सर्व सहा कडवी असलेलं वंदे मातरम हे गीत प्रसारित करण्यात येणार आहे.
****
श्रीरामनवमी
आज साजरी होत आहे. अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिरासह देशभरात ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये
आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास राम जन्मोत्सव साजरा होणार आहे. जालना जिल्ह्यात जांब
समर्थ या रामदास स्वामी यांच्या जन्मगावी, सज्जनगडावर राम मंदिरात, नाशिकचं काळाराम मंदिर, शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात
तसंच छत्रपती संभाजीनगर इथं जसवंतपुरा तसंच समर्थ नगर भागातल्या मंदिरांसह इतर राम
मंदिरांमध्ये रामजन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
****
विधिमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं. या अधिवेशनात विधानसभेत २२ शासकीय
विधेयकं मंजूर झाली. विधिमंडळाचं पुढचं अधिवेशन २२ जून २०२६ रोजी सुरू होणार असल्याचं, विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदनात जाहीर केलं.
**
नाशिक इथला
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची पाळंमुळं खोदून कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिला आहे. ते काल विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या
चर्चेला उत्तर देत होते. या प्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहे, या संदर्भात
असलेली माहिती संबंधितांनी सरकारपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी उपमुख्यमंत्री
दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघात, त्यांचा मृत्यू आणि संबंधित अपघाताची
चौकशी, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सदनाला सविस्तर माहिती दिली.
या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवालासह सर्व प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली जात
असल्याबाबत, त्यांनी सदनाला आश्वस्त केलं. या अपघातामागे घातपात
असल्याचं आढळून आलं, तर संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईची ग्वाही
त्यांनी दिली.
राज्यात
सुरक्षा व्यवस्थेसाठी राबवल्या जात असलेल्या महानेत्र या सीसीटीव्ही यंत्रणेबाबतही
मुख्यमंत्र्यांनी सदनाला अवगत केलं.
**
भारतीय
न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६ काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने
मंजूर झालं. ॲसिड हल्ल्यातील पीडितेचं नाव उघड करू नये तसंच डिजिटल माध्यमांवर महिलेची
बदनामी केली तर तो विनयभंग समजला जाईल अशा तरतुदी या विधेयकात आहेत.
महाराष्ट्र
सहकारी संस्था सुधारणा विधेयक तसंच महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा
विधेयक २०२६ काल विधानपरिषदेत मंजूर झालं.
****
ज्येष्ठ
इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं, ते ८५ वर्षांचे
होते. मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारतातील इतिहास या विषयात त्यांनी व्यापक संशोधन
केलं होतं. त्यांनी २५ पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.
****
राज्यात
२०१९ ते २०२४ या कालावधीत मंजुरी मिळालेली मनरेगाची २७ टक्क्यांहून अधिक कामं सुरूच
झाली नसून, साडे १९ टक्के कामं पूर्ण झाली नसल्याचं, कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. काल हा
अहवाल जाहीर झाला. या कालावधीत मनरेगासाठी १३ हजार ९५७ कोटी रुपयांचा निधीची तरतूद
केलेली होती, त्यातले साडे १३ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचं
या अहवालात नमूद आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ मार्फत ३० मार्चपर्यंत मतदारांच्या
घरी भेटी देऊन मतदार यादी मॅपिंग आणि पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी निरीक्षकांना दिले आहेत. मतदान केंद्रस्तरीय निरीक्षकांच्या प्रशिक्षण
कार्यशाळेत ते काल बोलत होते. मतदार यादीसंदर्भात कामकाजाचा आढावा घेऊन, स्वामी यांनी
संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.
****
धाराशिव
जिल्ह्यात सहकार भारतीच्या माध्यमातून बाजारातील जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित
ठेवण्यासाठी विविध सहकारी संस्थां स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं, सहकार भारतीचे
प्रमुख संजय पाचपोर यांनी सांगितलं. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळाचा
सत्कार समारंभ काल पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. सहकार क्षेत्राची
व्याप्ती वाढवून सर्वसामान्य नागरिक, महिला आणि सर्व आर्थिक स्तरातील
नागरिकांचं जीवनमान उंचावत देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पाचपोर यांनी
सांगितलं.
****
मराठवाड्यात
आजपासून रविवारपर्यंत, परभणी, बीड, नांदेड,
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा
इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातही बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा
अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment