Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 March 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२४ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक
क्षयरोग दिन आज पाळला जात आहे. “होय! आपण क्षयरोग संपवू शकतो” ही यंदाची या दिनाची
संकल्पना आहे. या दिवशी क्षयरोगच्या आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक परिणामांबाबत
जनजागृती केली जाते आणि जगभरात हा रोग नष्ट करण्यासाठी प्रयत्न वाढवण्याचं आवाहन केलं
जाते.
भारताची
क्षयरोगाविरुद्धची मोहिम ही फक्त सार्वजनिक आरोग्याचा उपक्रम नाही, तर लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या एका ध्येयासाठी एकजूट होण्याच्या आपल्या
राष्ट्राच्या क्षमतेचा हा एक पुरावा आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा
यांनी म्हटलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी, टीबी-मुक्त भारत साध्य करण्यासाठी फक्त वैज्ञानिक नवोन्मेष नव्हे तर जनभागीदारीची
ताकद आवश्यक असल्याचं नमूद केलं. एकजुटीने, जनकेंद्रीत दृष्टिकोनाने
भारत क्षयरोग नष्ट करण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.
“टीबी मुक्त भारत अभियान
– १०० दिवसांची विशेष मोहीम” आजपासून देशभरात राबवण्यात येत असून, महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत
११ हजार ९१ जोखीमग्रस्त गावं आणि शहरी प्रभागांमध्ये विशेष तपासणी करण्यात येणार आहे.
****
लोकसभेत
आज वित्त विधेयकावरची चर्चा पुढे सुरु राहणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
काल सदनात हे विधेयक मांडलं. त्याचबरोबर लोकसभेत सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र
कुमार ट्रान्सजेंडर व्यक्तींचे अधिकार विधेयक सादर करतील. राज्यसभेत आज दोन विनियोग
विधेयकांवर चर्चा होईल. चर्चेनंतर हे विधेयक लोकसभरकडे परत पाठवले जातील.
दरम्यान, संसदेचं कामकाज येत्या २८ आणि २९ तारखेला, म्हणजेच शनिवार आणि रविवारी
देखील सुरु राहणार आहे. लोकसभा सचिवालयाने यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं. या महिन्यात
१९ आणि २० तारखेला सणांमुळे संसदेचं कामकाज झालं नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला
आहे.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाबद्दल सविस्तर निवेदन करणार
आहे.
**
वन्यजीव
संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६ विधानपरिषदेनं काल एकमतानं मंजूर केलं. मानव-बिबट्या
संघर्ष कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीने बिबट्यांचं स्थानांतरण करणं, संख्येचं व्यवस्थापन करणं यासाठी वन्यजीव रक्षकाला आवश्यक पावलं उचलण्याची तरतूद
या विधेयकात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक, २०२६, तसंच महाराष्ट्र निरसन विधेयकही, विधान परिषदेत मंजूर झालं. ही तिन्ही
विधेयकं विधानसभेनं याआधीच मंजूर केली आहेत.
****
एसटी
महामंडळच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या तीन हजार बसचं आज लोकार्पण होणार आहे. दोन बाय
तीन आसन रचनेची ही ५६ आसनी बस राज्याच्या कानाकोपऱ्यात नागरिकांना वाहतुक सेवा देईल, असं परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
****
भारतीय
प्रतिभूती आणि विनिमय मंडळ-सेबीचे अध्यक्ष आणि पूर्ण वेळ सदस्यांना शेअर आणि संबंधित
गोष्टीमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. सध्या सेबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना हा
नियम लागू होतो. यापुढे सेबीचे अध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य, अधिकारी - कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही शेअर मध्ये गुंतवणूक
करता येणार नाही. अध्यक्ष आणि पूर्ण वेळ सदस्यांना सेबीमध्ये रुजू होताना त्यांची विद्यमान
गुंतवणूक काढून घ्यावी लागेल किंवा गोठवून ठेवावी लागेल, असं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीतील कमानीतून जाणाऱ्या महामार्गाला
पर्यायी वळण रस्ता केला जाणार आहे. सुमारे चार किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठीची
भूसंपादनाची प्रक्रिया चालू महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. विशेष भूसंपादन
अधिकारी विजय राऊत यांनी ही माहिती दिली. सुमारे १८ हेक्टर जमिनीचे संपादन यासाठी करावं
लागणार असल्याचं, राऊत यांनी सांगितलं.
****
लातूर
इथं काल पालकत्वातील आव्हाने, संधी आणि बदलत्या नातेसंबंधांवर भाष्य
करणारी ‘पालकशाळा’ पार पडली. प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांची, डॉ. मिलिंद पोतदार यांनी, ‘तंत्रज्ञान युगातील पालकत्व – कानगोष्टी
पालकत्वाच्या’ या विषयावर मुलाखत घेतली. पालकांनी मुलांचे ‘मित्र’ न बनता ‘पालक’ म्हणूनच
भूमिका पार पाडावी, असं शुक्ल यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल
सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाविद्यालयस्तरावर होणारी
अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा परवा २५ मार्चपासून चार एप्रिलपर्यंत
होणार आहे.
****
पहिल्या
राष्ट्रीय इनडोअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून ओडिशात भूवनेश्वर इथं सुरुवात
होत आहे. भारतीय ॲथलेटिक्समध्ये एका नव्या पर्वाची नांदी ठरणार्या या स्पर्धेच्या पहिल्याच
आवृत्तीला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चालणार्या या क्रिडा स्पर्धेत ९७ महिला खेळाडुंसह
२९८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
****
No comments:
Post a Comment