Sunday, 22 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्वाधिक काळ निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख राहून भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या उपलब्धीमुळे,  मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून ८ हजार ९३० दिवस पदभार सांभाळलेल्या पवन कुमार चामलिंग यांना मागं टाकलं आहे. मोदी यांचा कार्यकाळ आता ८ हजार ९३१ दिवसांचा झाला आहे. पंतप्रधान मोदी आपल्या नेतृत्वाच्या भूमिकेतील २५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पंतप्रधान मोदींनी या वर्षी, डिजिटल क्षेत्रातही, इतर अनेक महत्त्वपूर्ण टप्पे पार केले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ३० दशलक्ष अनुयायींचा टप्पा गाठला गेला, ज्यामुळे या मंचावरील सर्वाधिक पाठीराखे असलेल्या जागतिक नेत्यांपैकी एक म्हणून त्यांचं स्थान अधिक बळकट झालं आहे. गेल्याच महिन्यात मोदींनी इंस्टाग्रामवर १० कोटी पाठीराख्यांचा टप्पाही ओलांडला तर  एक्स या सामाजिक प्रसार माध्यमा वर पंतप्रधान मोदींचे १० कोटी ६४ लाख अनुयायी आहेत.

****

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर सुनिश्चित करण्यास आपण सर्व वचनबध्द असल्याबाबत पुनरुच्चार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात मोदी यांनी या विषयावर आपले विचार मांडले. पाणी हा जीवनाचा आधार असून पृथ्वीच्या भविष्याचा आकार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. संयुक्त राष्ट्र संघातर्फे पाणी आणि लिंग समानता या अनुषंगानं ‘जिथे पाणी वाहते तिथं समानता वाढते’ या आशयानं स्त्रीया आणि मुलींची जल व्यवस्थापनातील महत्वपूर्ण भूमिका आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम तसंच त्याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग या दिनाच्या निमित्तानं अधोरेखीत करण्यात येत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या जनतेला बिहार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारनं भारतीय वारशाला प्रदीर्घ काळापासून भव्यता आणि दिव्यता प्रदान केली आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये नमूद केलं. बिहार राज्य सध्या दररोज प्रगतीचे नवीन अध्याय लिहित आहे, यावर भर देत पंतप्रधानांनी बिहारमधील कष्टाळू आणि ऊर्जावान लोकांची समर्पित वृत्ती आणि क्षमता, 'विकसित भारत' सोबतच 'विकसित बिहार'चा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही बिहार दिनानिमित्त बिहारमधील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

****

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन कालपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पुण्याजवळ उरळीकांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाचा स्थापना-दिन कार्यक्रम उपराष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

****

आखाती देशांतील युध्दजन्य परिस्थितीत जागतिक ऊर्जा संकट भेडसावत असतांना, अमेरिकेहून एल.पी.जी. गॅसचा साठा घेऊन आलेलं 'पायक्सिस पायोनिअर' मालवाहू जहाज कर्नाटकात मंगळुरू बंदरात आज सकाळी दाखल झालं.

****

विमान इंधनाच्या  वाढत्या किमती आणि विमान वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय तणावामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढला आहे, त्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं उद्यापासून देशांतर्गत विमान भाड्यांवरील नियंत्रण हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तिकीट दरांवरील तात्पुरती मर्यादा हटवण्यात येत असल्यामुळं वाढत्या परिचालन खर्चाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना मुक्तपणे भाडे निश्चित करण्याची परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळं, विमान कंपन्यांना एकेरी प्रवासाच्या इकॉनॉमी क्लास तिकिटासाठी असलेल्या अंदाजे १८ हजार रुपयांच्या पूर्वीच्या कमाल मर्यादेचं बंधन राहणार नाही आणि विमान कंपन्या, मागणी तसंच बाजारातील परिस्थितीनुसार तिकीट दर निश्चित करू शकणार आहेत.

****

उन्हाळ्याच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभाग आणि व्याघ्रप्रकल्पाने २४० कृत्रिम पाणवठे तयार केले असून  त्यात टँकर्सच्या सहाय्याने नियमित पाणी भरण्यात येत आहे. गुगामल राष्ट्रीय अभयारण्य प्रकल्पाअंतर्गत देखील १०० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.  वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे वळू नयेत, आणि मानव- वन्यजीव संघर्ष टाळला जावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून वन्यजीवांचं संवर्धन, संरक्षण आणि त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं ही वनविभागाची प्राथमिकता असल्याचं उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी म्हटलं आहे.

****

पुण्यात वाघोलीमध्ये सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज समारोपाचा अंतिम दिवस असून महाराष्ट्र केसरी या किताबाची मुख्य लढत होणार आहे. हिंगोलीचा सिकंदर शेख विरुद्ध सोलापूरचा महेंद्र गायकवाड अशी माती विभागात तर सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सद्गिर यांच्यामध्ये गादी विभागात अंतिम लढत होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...