Monday, 23 March 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      सरकारी प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास, कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं- पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      लोकसभेत वित्त विधेयकावर चर्चेला सुरुवात-विविध पक्षांचा चर्चेत सहभाग

·      भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना हौतात्म्य दिनी सर्वत्र अभिवादन

·      एपस्टिन फाईल” प्रकरणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा नागपुरात संयुक्त मोर्चा

आणि

·      एसटी महामंडळच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या तीन हजार बसचं उद्या लोकार्पण

****

सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास, कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते आज लोकसभेत निवेदन देत होते. या युद्धाच्या दीर्घकालीन परिणामांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातला इंधन साठा, खत साठा, तसंच ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा आढावा घेतला. या काळात इंधन आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार तसंच साठेबाजी करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा त्यांनी राज्य सरकारांना दिला.

युद्धाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान करणाऱ्या हल्ल्यांचा आपण तीव्र निषेध करत असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं. भारताचा युद्धाला नेहमीच विरोध असून, पश्चिम आशियातला हा तणाव कमी करण्यासाठी भारताने संबंधित सर्व देशांच्या प्रमुखांशी संवाद साधून शांततेचं आवाहन केल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

लोकसभेत आज वित्त विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सदनासमोर चर्चेसाठी ठेवलं. या विधेयकावर आतापर्यंत काँग्रेसचे अमरसिंह, भाजपचे निशिकांत दुबे, समाजवादी पक्षाचे रामशंकर राजभर, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, द्रमुकचे अरुण नेहरू, संयुक्त जनता दलाचे सुनीलकुमार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई, शिवसेनेचे रवींद्र वायकर, लोकजनशक्ती रामविलास पक्षाच्या शाम्भवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, आदी खासदारांनी सहभाग घेऊन आपली मतं मांडली.

****

भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त आज त्यांच्या स्मृतींना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी तर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. विरोधी पक्ष नेते अब्दुल समीर साजिद यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी हुतात्म्यांना अभिवादन केलं.

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरात पैठण गेट परिसरात हुतात्म्यांना फासावर चढवण्याचा सजीव देखावा सादर करून, त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे.

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं शहीद दिनानिमित्त केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वतीने भव्य पदयात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

****

एपस्टिन फाईल” प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट भूमिका घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नागपुरात संयुक्त मोर्चा काढण्यात आला. संघ मुख्यालयाकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी झिरो माईल टी-पॉईंट इथे अडवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

****

नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या विधानसभेत सविस्तर निवेदन करणार आहेत. आज विधानसभेत याबाबत बोलतांना फडणवीस यांनी, या प्रकरणात ज्यांचा दुरान्वयेही संबंध असेल त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. महिलांच्या प्रतिष्ठेशी निगडित असलेल्या या विषयावर राजकारण करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं, ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत समाविष्ट रूग्णालयं मोफत उपचार देत नसतील तर अश्या रूग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. याबाबत सदस्य अभिजित पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता.

****

राज्यात विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचा आरोप, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विधानसभेत विरोधकांच्या २९३ च्या प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागातील अनेक गंभीर त्रुटी, पुराव्यासह सदनासमोर मांडल्या. रिक्त पदे, अर्थसंकल्पीय तरतुदीत कपात आणि औषध खरेदीतील भ्रष्टाचारामुळे आरोग्य विभाग हा ‘राम भरोसे’ सुरू असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

****

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून याचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत सांगितलं. हेमंत ओगले यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील फळबागा, गहू, हरभरा आदी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक, २०२६ विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं.

****

एसटी महामंडळच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या तीन हजार बसचं उद्या लोकार्पण होणार आहे. दोन बाय तीन आसन रचनेची ही ५६ आसनी बस राज्याच्या खेड्यापाड्यात कानाकोपऱ्यात नागरिकांना वाहतुक सेवा देईल, असं परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, ते म्हणाले -

बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

****

आकाशवाणीचे हिंगोलीचे वार्ताहर रमेश कदम यांना दैनिक प्रजाशाहीचा आवाज या वृत्तपत्रातर्फे प्रजाभूषण सन्मान हा पुस्कार प्रदान करण्यात आला. आज हिंगोली इथं झालेल्या सोहळ्यात कदम यांना, या पुरस्काराचं सन्मानचिन्हं आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. समाजहिताची बांधिलकी आणि सामाजिक योगदानासाठी कदम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

****

नारायण रेकी सत्संग परिवार च्या वतीने बीड इथे कुबेर का खजानाहा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नारी रत्न राजेश्वरी मोदी ऊर्फ राज दीदी यांनी उपस्थित जनसमुदायाला विविध विषयांवर मार्गदर्शन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीतील कमानीतून जाणाऱ्या महामार्गाला पर्यायी वळण रस्ता केला जाणार आहे. सुमारे चार किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया चालू महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...