Sunday, 8 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

जागतिक महिला दिन आज साजरा होत आहे. या दिनाची यावर्षीची संकल्पना “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशा आशयाची आहे.जागतिक स्तरावर महिला अधिकारांचं बळकटीकरण,न्याय सुनिश्चितीकरण आणि लैंगिक समानतेच्या दिशेनं वेगवान कार्यवहनाची आवश्यकता यांवर याद्वारे भर देण्यात येत आहे.

****

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे कर्तव्य पथावर आज सकाळी ‘शक्ती वॉक –शी लिडस भारत’ ही महिलांच्या नेतृत्वातील पदयात्रा झाली. पांढरी टोपी परिधान करुन मोठ्या संख्येनं यात महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या. नवी दिल्ली इथं आज  राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांसह केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकुर यांच्या उपस्थितीत दुपारी साडे अकरा वाजता एक विशेष कार्यक्रम झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या निमित्त महिलांना शुभेच्छा देतांना; महिला या समाजाचा आणि राष्ट्राचा पाया असून शिक्षित, स्वावलंबी आणि सक्षम महिला समृद्ध आणि प्रगतीशील राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात असं म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी भारताच्या नारी शक्तीची शक्ती, जिद्द आणि यशाचा गौरव केला. पंतप्रधानांनी देशभरातील महिलांना शुभेच्छा दिल्या असून भारताच्या प्रगतीला आकार देण्यात त्यांच्या वाढत्या भूमिकेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात महिला जिद्द, सर्जनशीलता आणि अतुलनीय उत्साहानं योगदान देत आहेत आणि त्यांची उपलब्धी देशाला प्रेरणा देत असून विकसित भारत घडवण्याचा सामूहिक संकल्प अधिक दृढ करत आहे. महिलांचं सक्षमीकरण हे सरकारच्या अनेक योजना आणि उपक्रमांच्या केंद्रस्थानी आहे. प्रत्येक महिलेला तिची पूर्ण क्षमता ओळखता यावी आणि भारताच्या विकास प्रवासात योगदान देता यावं यासाठी संधी निर्माण करण्यास सरकार वचनबद्ध आहे. भारताच्या महिला शक्तीचं यश हे देशासाठी अभिमानास्पद असून राष्ट्र उभारणीत महिलांनी बजावलेल्या परिवर्तनात्मक भूमिकेची ती एक शक्तिशाली आठवण आहे, असं त्यांनी सांगितलं. ते पुढं म्हणाले की, जसा भारत प्रगती करेल, तशा महिलांच्या आकांक्षा आणि योगदान एका मजबूत आणि समृद्ध राष्ट्राकडे जाणाऱ्या आपल्या सामूहिक प्रवासाला मार्गदर्शन करत राहतील.

****

महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या विभागिय क्रिडा संकुलावर खेलो इंडीया अभियानांतर्गत ‘अस्मिता लिग’ क्रिडा स्पर्धांचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालं. महिलांमध्ये क्रिडाविषयक जागरुकता, खेळांमध्ये संधी उपलब्ध करुन देणं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रक्षा खडसे यांनी याठिकाणी सकाळी महिलांच्या सायकल तसंच वॉकेथॉन स्पर्धांना हिरवा झेंडा फडकवून प्रारंभ केला. विकसित भारत घडवतांना तंत्रज्ञानासोबतच नागरिकांनीही तंदुरुस्त होण्याची गरज असल्याचं खडसे यांनी बोलतांना नमूद केलं. राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये यश मिळवणा-या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं सकाळी क्रांती चौकातून महिलांची दुचाकी फेरी काढण्यात आली. औरंगपुरा भागातल्या महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादनही करण्यात आलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीचा समारोप झाला.

जागतिक महिला दिनानिमित्त तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि आरोग्य विभागाच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे. गोंदिया, यवतमाळ जळगाव आणि धुळे इथंही महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले.

****

महिला दिनानिमित्त राज्य शासनातर्फे गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राज्यव्यापी अशा १४ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ मुख्य शासकीय कार्यक्रम आज दुपारी दोन वाजता मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात होणार आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या पात्र अशा १४ वर्ष वयाच्या वीस हजार ६७१ मुलींना ही लस मोफत देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण-उपजिल्हा - तसंच सामान्य आणि स्त्री रुग्णालयं इथं याची व्यवस्था केलेली आहे.तसंच या लसीकरणासाठी ‘यु विन’ संकेतस्थळावर नोंदणीची सोय आहे.

****

आयसीसी पुरुष टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी, गतविजेत्या भारताचा सामना आज अहमदाबाद इथं न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ चौथ्यावेळी पोहोचला आहे. तर न्यूझीलंडसाठी हा दुसरा अंतिम फेरीतला सामना असेल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं मुंबईत झालेल्या रोमांचक उपांत्य फेरीत इंग्लंडला सात धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर मिशेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडनं कोलकाता इथं दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...