Saturday, 14 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचं संरक्षण कवच: पंतप्रधानांचं प्रतिपादन- प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता जारी

·      देशात एलपीजीसह इंधनाचा पुरेसा साठा- टंचाईच्या शंकेतून खरेदी करू नये- सरकारचं आवाहन

·      महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ विधानसभेत सादर

·      गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेमध्ये शेतमजुरांचा समावेश

आणि

·      पूर्वप्राथमिक शाळेसाठी प्रवेश परीक्षेला राज्यसरकारची मनाई

****

केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षात शेतकऱ्यांना विविध योजनांचं संरक्षण कवच दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल आसाममधल्या गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता पंतप्रधानांनी जारी केला, त्यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी या संरक्षण कवच देणाऱ्या योजनांचा उल्लेख केला, ते म्हणाले…

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे, १८ हजार ६४० कोटी रुपये वर्ग करण्यात आले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत चार लाख नऊ हजार कोटींहून अधिक रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याची भावना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केली, ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

****

जागतिक संकट काळात पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या काल लोकसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देत होत्या.

दरम्यान, पुरवणी मागण्यांना लोकसभेनं मंजुरी दिली. सुमारे दोन लाख ८१ हजार कोटी रुपयांच्या ६१ मागण्या सदनासमोर ठेवल्या होत्या, त्या संमत करण्यात आल्या.

****

नागरिकांनी स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीने वापर करावा, तसंच पाईप नॅचरल गॅस-पीएनजी ची जोडणी घेण्याचं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं केलं आहे. देशात सध्या स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून, राखीव साठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांनी टंचाईच्या शंकेतून गरजेपेक्षा जास्त सिलिंडर खरेदी करु नये, असं आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या…

बाईट - पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा

****

दरम्यान, बीड जिल्ह्यात घरगुती गॅस नोंदणी मागणीची मर्यादा ४५ दिवस करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात गॅससह पेट्रोल डिझेलचा सुमारे ३० दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक असून कुठल्याही प्रकारची तुटवड्याची परिस्थिती नाही, असं जॉन्सन यांनी स्पष्ट केलं आहे.

बीड जिल्ह्यात अवैधरित्या हॉटेलमध्ये वापर केल्या जाणारे २८ गॅस सिलेंडर काल जप्त करण्यात आले. याप्रकरणी तीन हॉटेल चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.

जालना इथं विविध व्यावसायिक आस्थापनांमधून नियमबाह्य वापर होत असलेले ३० घरगुती गॅस सिलेंडर काल जप्त करण्यात आले. संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

लातूर जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी १० विशेष भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी ही माहिती दिली. टंचाईच्या शंकेने लातूर इथं ग्राहकांनी गॅस सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीच्या बाहेर रांगा लावल्याचं दिसून आलं.

दरम्यान, गॅस दर वाढीच्या विरोधात काल हिंगोली इथं तसंच लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी, नागरिकांना इंधनाच्या पुरवठ्याबाबत आश्वस्त करत, इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले…

बाईट - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

****

महिलांना मासिक पाळीच्या काळात सुटी देण्याबाबत राष्ट्रव्यापी धोरणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अशा तरतुदीमुंळे लिंगभेदाबाबतच्या समजुती फोफावण्याचा धोका असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. तरीही सक्षम प्राधिकरण याबर विचार करून, आणि मासिक पाळीच्या काळात सुटीसंदर्भात धोरणाची शक्यता पडताळून पाहू शकतं, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ काल विधानसभेत मांडण्यात आलं. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक सभागृहासमोर सादर केलं. धर्मस्वातंत्र्याचं रक्षण करण्यासोबतच, आमिष दाखवून, जबरदस्ती करून, दिशाभूल करून किंवा फसवणुकीने केलेल्या वैयक्तिक तसंच सामुहिक धर्मांतराला प्रतिबंध करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. अशा प्रकारे धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला सात वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंड अशा शिक्षेची यात तरतूद आहे.

****

गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेमध्ये शेतमजुरांचा समावेश करण्यात आला आला आहे. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ही माहिती दिली. दोन कोटी शेतमजुरांना या निर्णयामुळे लाभ होईल, असं जयस्वाल यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल

****

पूर्वप्राथमिक शाळाप्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेऊ नये यासाठी सरकार नियम करणार आहे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. खासगी बालवाड्यांच्या नोंदणीसाठी एक अधिनियम प्रस्तावित असून, नोंदणी, नियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करणं हा या अधिनियमाचा उद्देश आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी हा अधिनियम लागू केला जाईल, असं भुसे यांनी सांगितलं.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळेत प्रवेश दिला जातो, गरज असेल तर हे अंतर तीन किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा विचार केला जाईल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

****

अतिवृष्टीग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय सरकारनं घेतला आहे, मात्र ऑनलाईन फॉर्म भरताना परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असल्याचं कैलास पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. यावर तांत्रिक अडचण दूर करायचा प्रयत्न केला जाईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.‌

****

सामाजिक न्याय विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीअंतर्गत अनुसूचित जातीच्या शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करायचा निर्णय अधिवेशन काळात घेऊ, या वर्षापासून ही वाढीव शिष्यवृत्ती लागू होईल, असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल विधान परिषदेत दिलं.

****

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या अर्चना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी उषा गायकवाड यांची बहुमताने निवड झाली. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अध्यक्षपद भाजपाला मिळालं आहे.

****

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला जालना जिल्ह्यात प्रारंभ झाला. जास्तीतजास्त मुलींनी लस घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी केलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ७३ जागांसाठी आतापर्यँत ऑनलाईन ६ हजार ८३१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...