Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १९ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा
सण आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार शक संवत १९४८ या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ
झाला. मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगलतोरण आणि कडूलिंबाचे डहाळे बांधून तसंच इष्टदेवतांच्या
दर्शनाने हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने
घर, वाहन
तसंच सोन्याचांदीच्या आभुषणांसह इतर महत्त्वाच्या खरेदीचा प्रघात आहे.
देशाच्या विविध भागात चैत्र शुक्लादि,
उगादी,
चेती चंद,
नवरेह आणि साजिबू चेरोबा,
हे सण देखील आज साजरे होत आहेत. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या. हे सण म्हणजे भारताच्या
समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी,
राज्यपाल जिष्णु देव वर्मा,
तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतिक
असून, नवचैतन्य,
आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येतो,
असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
चैत्र नवरात्रीच्या देखील मोदी यांनी
शुभेच्छा दिल्या. यानिमत्त त्यांनी शक्तिची देवता दुर्गेकडे विकसित राष्ट्राच्या संकल्पाला
नवीन ऊर्जा प्रदान करण्याचं आवाहन केलं.
हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख,
समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांना
निरामय आरोग्य लाभो आणि यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा,
मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा
निर्धार करुया, असं
मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हंटलं आहे.
****
देशात कच्च्या तेलाची उपलब्धता सामान्य
असून, तेलशुद्धीकरण
प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं आहे. नवी दिल्लीत
आयोजित आंतर-मंत्रालयीन बैठकीदरम्यान, पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्रालयाच्या सहसचिव,
सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली.
देशांतर्गत एलपीजी उत्पादनात ४० टक्क्यांनी वाढ झाली असून,
देशभरातल्या कोणत्याही किरकोळ विक्री
केंद्रावर साठा संपल्याची किंवा तुटवड्याची तक्रार नोंदवली गेलेली नाही,
असं त्यांनी सांगितलं. एलपीजीकडून पीएनजीकडे
होणाऱ्या दीर्घकालीन संक्रमणाला सहकार्य करण्याच्या अटीवर,
सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांना व्यवसायिक एलपीजीचा अतिरिक्त दहा टक्के कोटा देऊ केला आहे,
असंही शर्मा यांनी स्पष्ट केलं.
****
वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा
विधेयक २०२६ काल विधानसभेत बहुमतानं मंजूर झालं. वनमंत्री गणेश नाईक यांनी हे विधेयक
सभागृहात मांडलं. राज्य सरकारच्या परवानगीनं बिबट्यांचं स्थानांतरण करणं,
संख्येचं व्यवस्थापन करणं यासाठी वन्यजीव
रक्षकाला आवश्यक पावलं उचलण्याची तरतूद या विधेयकात केली आहे,
असं त्यांनी सांगितलं.
****
पुण्यात वाघोली इथं ६८ व्या महाराष्ट्र
केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं.
खेळाडूंनी आखाड्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवा, आपला खेळ अतिशय चांगल्या प्रकारे सादर करा,
असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
२२ मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत चार आखाड्यांमध्ये १५ नवोदित कुस्तीपटूंनाही
संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत ४२ संघांचे ८५० मल्ल सहभागी झाले आहेत.
****
इंधन बचतीच्या उद्देशाने,
धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा,
मोहगाव आणि चावडीपाडा या तीन गावांतल्या
ग्रामस्थांनी पुढील सहा महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय
घेतला आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे पर्यायी इंधनस्रोत उपलब्ध नसल्यामुळे
त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी स्वतःहून हा त्याग करण्याचा,
देशाहीताच्या अनुषंगानं सर्वोच्च निर्णय
घेतल्याचं यासंदर्भातल्या बैठकीत सांगण्यात आलं.
****
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी आणि अभोणा
इथं भरारी पथकांनी हॉटेल व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच याप्रमाणे दहा घरगुती सिलिंडर
जप्तीची कारवाई केली आहे. एकूण १७ पथकांमार्फत हॉटेल्स,
पेट्रोलपंप,
एजन्सीची तपासणी केली जात आहे.
****
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी परभणी जिल्ह्यातल्या विविध अंगणवाडी केंद्र आणि
प्राथमिक शाळांना भेट देऊन शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीतील पूरक पोषण आहाराची प्रत्यक्ष
पाहणी केली. ऊसतोड मजुरांची लहान मुले, गरोदर, स्तनदा माता, वीटभट्टी कामगार तसंच बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातले
गरजू, भिक्षा
मागणाऱ्या महिला आणि बालकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याबाबत त्यांनी संबंधित
यंत्रणांना सूचना दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड
तालुक्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून वैजापूर तालुक्यातल्या दहेगाव प्रकल्पापर्यंत
कालव्याचं काम पूर्ण करावं, अशी
मागणी दहेगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी केली आहे.
****
No comments:
Post a Comment