Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 March 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचा
मुख्यमंत्र्यांचा निर्धार
·
रबी हंगामात पीक पाहणीसाठी राज्य सरकारकडून ३१ मार्चपर्यंत
मुदतवाढ
·
राज्यात एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची
स्थापना
·
छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून एचपीव्ही लसीकरण मोहिमेला
सुरुवात
आणि
·
लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांना अवकाळी
पावसाचा फटका
****
राज्य शासन
अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणार असल्याचा निर्धार, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल विधानसभेत प्रवीण दटके यांनी उपस्थित
केलेल्या प्रश्नावर बोलत होते. संबंधित प्रकरणात सामाजिक गुन्हेगारी नियंत्रण कायदा,
१९९९ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपपत्र दाखल
करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया
पूर्ण करून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल, असं
फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
व्हिसा
संपल्यावरही देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नागरिकांना
शोधण्यासाठी राज्य सरकार नवीन यंत्रणा राबवणार आहे. पोलीस विभाग आणि इमिग्रेशन यांच्यात
एक समन्वय प्रणाली तयार केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारनं
रबी हंगामासाठी पीक पाहणीसाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. पीक नोंदणीच्या अभावी
नैसर्गिक आपत्ती, पीक वीमा, पीक कर्ज यासारख्या लाभापासून
शेतकरी वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत फक्त ५५
टक्के क्षेत्राची पाहणी पूर्ण झाल्यानं सरकारनं हा निर्णय घेतल्याचं निवेदन महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलं. ते म्हणाले…
बाईट - महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे
छत्रपती
संभाजीनगरमधल्या ब्रिजवाडी इथल्या ५४ एकर जमीन घोटाळ्यासह, नंदूरबार
जिल्ह्यात नवापूर इथल्या भूसंपादन गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास
पथकं स्थापन करण्यात आली आहेत. या प्रकरणांचा सविस्तर अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या
पटलावर ठेवला जाईल, अशी घोषणा बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली.
**
महाराष्ट्र
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सुधारणा विधेयक २०२६ काल विधानसभेत एकमताने मंजूर
झालं. जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा पाच सदस्यांना नामनिर्देशित
करण्याची, तसंच पंचायत समित्यांमध्ये एकूण सदस्य संख्येच्या वीस टक्के किंवा
किंवा एका सदस्याला नामनिर्देशित करण्याची तरतूद या विधेयकात आहे. महाराष्ट्र निरसन
विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक,
महाराष्ट्र मोटर वाहन कार सुधारणा विधेयक, तसंच
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा स्थापना विनियम सुधारणा विधेयकही काल विधानसभेत
मंजूर झाली.
**
महाराष्ट्र
धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६ काल विधानपरिषदेत बहुमताने मंजूर झालं. या विधेयकाचा उद्देश
कुठल्याही एका धर्माला लक्ष्य करणं हा नाही, सर्व धर्मांसाठी
तो सारखा राहील, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या
विधेयकावरच्या चर्चेच्या उत्तरात दिली. हे विधेयक स्वेच्छेने होणारं धर्मांतर थांबवत
नाही, कोणाच्याही धर्मस्वातंत्र्यावर घाला घालत नाही,
फक्त गैरमार्गाने केलं जाणारं धर्मांतर थांबवणं हा या विधेयकाचा हेतू
असल्याचं त्यांनी सांगितलं.
**
बीड जिल्ह्यात
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान कोट्यवधींचा
अपहार केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची ग्वाही मंत्री आकाश फुंडकर यांनी काल विधानसभेत
दिली. याबाबत सदस्य सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
****
नमो शेतकरी
महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
होणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय जारी झाला असून, या हप्त्यासाठी
एक हजार ७७४ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातल्या सुमारे
९० लाख ३४ हजार पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री
दत्तात्रय भरणे यांनी दिली.
****
केंद्र
सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांमधल्या पंचायती राज संस्था तसंच ग्रामीण स्थानिक
स्वराज्य संस्थांसाठी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत अनुदान वितरित केलं आहे. ग्रामीण
स्थानिक प्रशासनाला अधिक बळकट करणं हा याचा उद्देश आहे. महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक
वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यातील रोखून ठेवलेला हिस्सा म्हणून सुमारे १५१
कोटी रुपये निधी मिळाला असून, याचा फायदा १२५ उप-ग्रामपंचायती आणि ३२४
ग्रामपंचायतींना झाला आहे.
****
राज्यात
एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, त्यासाठी
९७-६९-९१-९२-२१ हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा
मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ही माहिती दिली. आवश्यकतेनुसार केरोसिन आणि इतर पर्यायही
उपलब्ध करून दिले जात असून, काही मोठ्या हॉटेल्सनी कोळसा आणि
केरोसिनचा वापर सुरू केला असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.
****
नाशिक इथं
गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरणी गॅस एजन्सी मालकासह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. जिल्हा प्रशासनाने सातपूर एमआयडीसी छापा मारून ही कारवाई केली. या कारवाईत
घरगुती वापराचे १५८ भरलेले सिलिंडर, पाच किलो वजनाचे भरलेले दहा सिलिंडर तसंच
२८९ रिकाम्या सिलिंडरसह पाच मालवाहू वाहनं असा सुमारे २५ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं आज एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. महानगरपालिकेच्या सिडको
N-8 इथल्या रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन
होईल. नागरिकांनी आपल्या १४ आणि १५ वर्ष वयोगटातल्या मुलींना ही लस देण्याचं आवाहन
प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात
अनेक भागात काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.
लातूर शहरासह
जिल्ह्यात काल सायंकाळी गारांसह अवकाळी पाऊस झाला. निलंगा, अहमदपूर आणि
औसा तालुक्यात गारपिटीमुळे गहू, ज्वारी तसंच हरभरा पिकांचं नुकसान
झालं. आंबा बागांनाही या गारपिटीचा मोठा फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव
जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या कदेर आणि नाईचाकुर भागात गारांच्या पावसाने काढणीला
आलेलं ज्वारी आणि गव्हाचं पीक पाण्यात गेलं.
परभणी जिल्ह्यातही
विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काढणी झालेला गहू आणि हरबरा तसंच शिजवलेल्या
हळदी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा
खंडित झाला होता.
सोलापूर
शहर आणि जिल्ह्यातही काल अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
दरम्यान, आजही परभणी,
बीड, हिंगोली, नांदेड,
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
नांदेड
जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प काल संमत झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा
प्रशासक मेघना कावली यांनी या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. महिला, आरोग्य आणि
शेतकरी यांच्यासाठी विशेष प्राधान्य या अर्थसंकल्पात दिल्याची माहिती त्यांनी दिली.
****
लातूर जिल्हा
महसूल क्रीडा तसंच सांस्कृतिक स्पर्धेला काल प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. सर्व खेळाडूंनी सांघिक भावनेनं आणि चिकाटीनं
उत्कृष्ट कामगिरी करावी असं आवाहन त्यांनी केलं.
****
हिंगोली
जिल्ह्यात गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात गांजाची अंदाजे ८४ हजार ६५० रुपयांची
झाडं पोलिसांनी काल जप्त केली. याबाबत विठ्ठल ढोक या आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या
विविध ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये १० थेट सरपंच पदांसह ५८ सदस्य
पदांसाठी ही निवडणूक होणार असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सात
एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत अर्ज सादर करता येणार असून, १५ एप्रिलला अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिलपर्यंत
अर्ज मागे घेता येतील. या निवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान, तर
२९ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तसंच उपाध्यक्ष निवडीसाठी आज विशेष सभा आयोजित
करण्यात आली आहे. प्रथम दोन्ही पदांसाठीची अर्ज प्रक्रिया पार पडेल, त्यानंतर
दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही विशेष सभा होणार आहे.
****
No comments:
Post a Comment