Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १४ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकाता इथं सुमारे १८ हजार ६८०
कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घघाटन आणि पायाभरणी करतील; यामध्ये १६,९९० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या, ४२०
किलोमीटरहून अधिक लांबीच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचंही उद्घघाटन करतील.
****
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कायेदशीर तोडगा काढण्यासाठी
राज्याच्या महाधिवक्तांसोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक होणार आहे.
या बैठकीत धनगर बांधवाच्या
आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल, असं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
धनगर आरक्षणासंदर्भात समाजाच्या शिष्टमंडळाच्या
मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत काल ते बोलत होते. कायद्याच्या चौकटीत बसणारं
धनगर आरक्षण देताना सर्व बाजू तपासून त्याची खातरजमा करुन त्यानंतर आरक्षणाचा
प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ
कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांसाठी २२ हजार १८१ कोटी
रुपयांच्या कामांना काल कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ हजार १४० कोटी आणि
दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. कुंभमेळाच्या
प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब आणि अडथळा
आणत असेल,
तर त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
*****
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ
नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी
राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण राज्यामध्ये गॅस सेवा सुरळीत ठेवण्याविषयी तसंच
पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे
निर्देश अन्न,
नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव
अनिल डिग्गीकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
दरम्यान, पर्यायी इंधनाच्या वापराची
शक्यता तपासण्याचे निर्देशही यंत्रणांना देण्यात आले आहेत. यामध्ये कोळसा, रॉकेल आदी पर्यायांचा विचार केला जाणार असला तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसंच जिल्हास्तरीय
समित्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांसोबत बैठक घेऊन पर्यायी इंधनाच्या
वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देशही डिग्गीकर यांनी दिले आहेत.
या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, अन्न-धान्य
पुरवठा नियंत्रक आणि तेल कंपन्यांनी दररोज साठा स्थिती तसंच अद्ययावत अहवाल
राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
पालघरमध्ये रेल्वे मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच
मृत्यू झाला,
ही घटना जुना पालघर परिसरात, जैन
मंदिराजवळ घडली. स्वप्निल पालांडे, कुणाल दुबळा आणि अफरोज शेख
अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून नेमकी घटना कशी
घडली,
याचा तपास केला जात आहे.
****
राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या
बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याची अधिसूचना लागू करण्यात
आली आहे. ज्या शाळा या नियमाचं उल्लंघन करतील, त्यांच्यावर
कठोर कारवाई केली जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री
दादाजी भुसे यांनी विधानसभेत
सांगितलं. मराठी विषय शाळेत शिकवणं हा नियम केवळ शासकीय शाळांपुरता मर्यादित नसून
खासगी,
विनाअनुदानित आणि सर्व परकीय मंडळांच्या शाळांनाही लागू
आहे. हा आदेश न मानणाऱ्या संस्थाची मान्यता रद्द करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची पोर्टलवर अनिवार्य
नोंदणी,
नियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं अधिनियम
आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही भुसे यांनी
दिली.
****
बीड शहरातील शिवनेरीनगर परिसरात अजय घोडके या व्यक्तीने
राहत्या घरात अवैध रित्या ठेवलेला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा, ७३ हजार ५५० रुपये किमतीचा साठा पोलिसांनी आज पहाटे जप्त केला. पुरवठा
विभागाचे निरीक्षण अधिकारी प्रशांत सुपेकर यांच्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात
आली.
****
हवामान
राज्यात आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी
मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहतील तर कोकणात तुरळक ठिकाणी
वातावरण उष्ण आणि दमट असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment