Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
सध्या जगात सुरू असलेल्या
युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीतून एकजुटीनं बाहेर पडू असा विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आकाशवाणीवरील आपल्या मन की बात या कार्यक्रमाच्या
१३२ व्या भागमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते
म्हणाले…
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
ज्ञानभारतम अॅपच्या माध्यमातून
देशभरात अस्तित्वात असलेल्या हस्तलिखितांबद्दल माहिती संकलीत करण्यात येत असल्याचं
त्यानी सांगितलं. आपल्या संस्कृतीशी संबंधित हस्तलिखिते या ॲपवर प्रसिद्ध करण्याचं
आवाहन पंतप्रधानांनी केलं.
MY Bharat संघटनेतर्फे
घेण्यात आलेल्या Budget Quest स्पर्धेत विविध तरूणांनी मांडलेल्या विचारांचा उल्लेख
करत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे विचार अतिशय महत्त्वाचे असल्याचं त्यांनी नमूद
केलं.
क्रिकेट, फुटबॉल यासारख्या
खेळांबरोबरच ॲथलेट, Squash on Fire Open सारख्या आतंरराष्ट्रीय स्पर्धांतही
देशातले खेळाडू यश मिळवत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान
विषयात आवड निर्माण करण्यासाठी प्रयोगातून शिक्षण देणाऱ्या बेंगळूरू इथल्या इन्स्टीट्युट
ऑफ एज्युकेशन रिसर्च या संस्थेनं चालवलेल्या प्रकल्पांतून विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण
संशोधन करण्याची संधी मिळत असल्याचा त्यांनी उल्लेख केला. शिक्षणाच्या माध्यमातून भूतकाळाचे
संरक्षण करण्याचा आणि भविष्याची तयारी करण्याचा प्रयत्न नागा या आदीवासी समाजातील लोक
करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर
जल संरक्षण करण्याचा निश्चय करण्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला आहे. ‘जल संचय
अभियाना’ अंतर्गत देशभरात पन्नास लाख कृत्रिम जल संधारण संरचना उभारण्यात आल्या असल्याचं
त्यांनी सांगितलं. सामुदायिक प्रयत्नातून त्रिपुरामध्ये जंपुई डोंगराळ भागातील वांगमून
या समुद्रसपाटीपासून तीन हजार फुट उंचीवरील गावातील पाणीटंचाईचा सामना करत जल संरक्षणाचं
एक प्रेरणादायक उदाहरण बनलं आहे. तसंच, तेलंगणाच्या मंचेरियाल जिल्ह्यातील
मुधीगुंटा गावातील चारशे कुटुंबांनी आपल्या घरांत शोषखड्डे बनवून जलसंधारणाची एक लोकचळवळच
उभी केली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
देशातले मच्छिमार केवळ सागरातील
योद्धे नसून ते आत्मनिर्भर भारताचा सशक्त पाया देखील आहेत. मत्स्यपालन आणि सागरी शैवाल
लागवड क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग व्यवसायात वाढ होत असल्याचं
पंतप्रधान म्हणाले. नागालँडमधील चिजामी गावातल्या महिलांनी दीडशेहून अधिक वाणांचे पारंपरिक
बियाणे सुरक्षित ठेवत असल्याचं सांगत पारंपरिक ज्ञान आणि सामुदायिक प्रयत्नच आपल्याला
सर्वात बळकट मार्ग दाखवतात असं त्यांनी सांगितलं. देशातल्या वाढत्या सौर उर्जा क्रांतीची
उदाहरणे देत यात सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी मन की बातच्या माध्यमातून केलं.
****
पाम रविवार आज धार्मिक उत्साहात
साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्त यांच्या क्रूसावर खिळण्यापूर्वी त्यांच्या यरुशलममध्ये
झालेल्या विजयी प्रवेशाची आठवण म्हणून हा दिवस पाळण्यात येतो. येशूच्या पवित्र शहरातील
विजयी प्रवेशाचे स्मरण आणि उत्सव साजरा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी पाम
रविवारच्या मिरवणुका काढण्यात आल्या. भाविकांनी खजुराची पानं हातात घेऊन ‘होसन्ना’चा
जयघोष करत आणि गाणी गात फेरी काढली.
****
१९व्या इंडियन प्रीमियर लीग
- आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडीन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर सामना होणार
आहे. मुंबईत संध्याकाळी साडे सात वाजेपासून हा सामना खेळवण्यात येईल.
****
लातूर जिल्हा परिषद विषय समित्यांच्या
सभापती पदाच्या निवडीसाठी उद्या ३० मार्च रोजी दुपारी दोन वाजता विशेष सभा आयोजित करण्यात
आली आहे. याकरता पीठासीन अधिकारी रोहिणी नेऱ्हे-विरोळे यांची नियुक्ती करण्यात आली
आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांना सदर विशेष सभेची सूचना देण्यात
आली आहे.
****
केंद्र शासन पुरस्कृत 'उल्लास - नवभारत
साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षातील पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान
मूल्यमापन चाचणी आज आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातले चार हजार ७०२
नागरिक या परीक्षेला बसणार आहेत.
****
No comments:
Post a Comment