Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं केलेल्या
चवदार तळे सत्याग्रहाला आज ९९ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त महाड इथं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. चवदार तळे जल शुद्धीकरण प्रकल्प
आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. चवदार तळ्याचा हा सत्याग्रह
भारताला समतेकडे नेणारा ठरला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत असून, हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं दोनशेवं जयंती वर्ष आणि संत गाडगेबाबा यांचं दिडशेवं
जयंती वर्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे समता आणि समरसता वर्ष म्हणून
साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत इंदू मिल इथलं
बाबासाहेबांचं स्मारक लवकरच पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
समाजामध्ये विषमता दूर करण्याची तसंच एक समतायुक्त समाज निर्माण करण्याची प्रतिज्ञा
आज आपण घेऊया, असं मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, सामाजिक न्याय मंत्री
संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. गोरगरीबांना न्याय देणं, हा बाबासाहेब आंबेडकर
यांचा वारसा पुढे सुरु ठेवणार असल्याचं आठवले यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या चवदार तळे इथल्या स्मारकाला अभिवादन केलं.
****
एड्स या आजाराबाबत जिल्हास्तरावरुन जनजागृती आणि उपचार मिळण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या माध्यमातून
आज दिल्लीत ‘सुरक्षा संकल्प कार्यशाळा’ आयोजित केली आहे. संघटनेचे महासंचालक डॉ. राकेश
गुप्ता यांनी यावेळी बोलताना, एड्स हे एक मोठं सार्वजनिक आरोग्य
आव्हान असून, त्यासाठी प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सातत्यपूर्ण दक्षता, नवनवीन कल्पना आणि समन्वित कृती आवश्यक असल्याचं नमूद केलं. एचआयव्हीचा आईकडून
बाळाला होणारा संसर्ग रोखण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. जागतिक एड्स दिन २०२७
पर्यंत एड्सला नियंत्रणात असलेली महामारी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा
त्यांनी पुनरुच्चार केला.
****
मौखिक आरोग्य दिवस आज पाळला जात आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब
कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी यानिमित्त समाजमाध्यमावर दिलेल्या संदेशात, लोकांना तोंडाच्या स्वच्छतेच्या चांगल्या सवई अंगिकारण्याचं आवाहन केलं आहे. आपलं
हास्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी दात व्यवस्थित घासणं, साखरेचे पदार्थ मर्यादित
प्रमाणात खाणं आणि दातांची नियमित तपासणी करून घेणं यांसारख्या साध्या कृतींच्या महत्त्वावर
त्यांनी भर दिला. नागरिकांनी दररोज तोंडाची योग्य स्वच्छता
राखण्याचा संकल्प करावा, असं आवाहन नड्डा यांनी केलं.
****
जागतिक चिमणी दिवस आज साजरा होत आहे. चिमण्यांच्या घटत चाललेल्या
संख्येबद्दल जागरुकता निर्माण करणं आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. वृक्ष बीज प्रसार करण्यात आणि किटकांच्या संख्येवर
नियंत्रण ठेवण्यात चिमण्यांसह सर्वच पक्षांचा मोठा वाटा असतो. बुलडाणा जिल्ह्यातले
निसर्ग पर्यावरण अभ्यासक आणि पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरव गेल्या २० वर्षांपासून
चिऊताई घरकूल योजनेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाकरता प्रयत्न करत आहेत. त्यांनी लाकडी
घरट्यांची निर्मिती केली असून, महाराष्ट्रासह इतर सात ते आठ राज्यांमध्ये
या घरट्यांचं वितरण करण्यात येतं.
****
सीमा शुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय
विमानतळावर सुमारे ६४ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करुन एका परदेशी नागरीकासह
चार प्रवाशांना अटक केली आहे. बँकॉकहून तस्करी करुन हे अंमली पदार्थ आणण्यात आले होते.
****
बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात काल जोरदार अवकाळी पाऊस झाला.
मेहकर तालुक्यात उकळी, सुकळी, डोणगावसह देऊळगाव साकरशा
परिसरात गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी पावसाने
संग्रामपूर तालुक्यातल्या बावनबीर तुनकी या परिसरात कांदा आणि गहू पिकाचं मोठं नुकसान
झालं असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी
मागणी शेतकरी करत आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या ८२ ग्राम पंचायतींमधल्या पोटनिवडणुकीचा
कार्यक्रम घोषीत झाला आहे. सात एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता
येणार आहे.
****
No comments:
Post a Comment