Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· निसर्गोपचार देतो निसर्गाशी सुसंवादाला
प्रोत्साहन - उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन
· पाण्याच्या थेंबाचं संरक्षण, जबाबदारीनं वापरासाठी वचनबद्ध राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
· राज्यात ३६ जिल्ह्यांत उमेद मॉल उभारणार
- मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
आणि
· महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतल्या
अंतिम लढती आज रंगणार, हिंगोलीचा सिकंदर शेख माती गटात सोलापूरच्या
गायकवाडशी झुंजणार
****
निसर्गोपचार ही शाखा निसर्गाशी सुसंवाद राखायला प्रोत्साहन देते, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. पुण्यात उरळी कांचन इथल्या
निसर्गोपचार केंद्राच्या ८१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज प्रमुख
पाहुणे म्हणून बोलत होते. पारंपरिक भारतीय उपचार पद्धती सध्याच्या काळाशी अधिक समर्पक
असल्याचं ते म्हणाले. औषधांवर असलेलं अवलंबित्व कमी करुन निसर्गाशी एकरुप होऊन निरोगी
जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी निसर्गोपचार आपल्याला प्रेरणा देत असून पुण्यातल्या
निसर्गोपचार केंद्रानं लोकांच्या निरोगी जीवनासाठी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे, असं त्यांनी सांगितलं. योगाभ्यास, आयुर्वेद आणि निसर्गोपचार यांना आता
जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झालं आहे आणि भविष्यात ते कधीच कमी होणार नाही, असं उपराष्ट्रपती म्हणाले. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. प्रत्येकानं आपल्या दैनंदिन
जीवनात निसर्गोपचाराचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
यांनी आपल्या भाषणात केलं.
****
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं
वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. पाणी जीवनाचा आधार असून पृथ्वीच्या भविष्याचा आकार असल्याचं पंतप्रधानांनी
आंतरराष्ट्रीय जल दिनाच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र
संघानं देखील या निमित्तानं पाणी आणि लिंग समानता या अनुषंगानं ‘जिथे पाणी वाहतं तिथं
समानता वाढते’ ही संकल्पना मांडली असून जल व्यवस्थापनातली महिलांची महत्वपूर्ण भूमिका
आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम तसंच त्याबाबतच्या निर्णय
प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधोरेखित केला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत
पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम, कच्चे तेल, वायू, ऊर्जा आणि खते क्षेत्रातील परिस्थितीचा
आढावा घेण्यासाठी उच्च पदस्थांची बैठक झाली. या बैठकीत देशभरात अखंड पुरवठा आणि कार्यक्षम
वितरण सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर देण्यात आला.
****
महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचं ठिकाण नसून महिला
बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत असल्याची प्रशंसा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केली आहे. राज्यातल्या १२ जिल्ह्यांत महिला गटांचे उमेद मॉल उभारण्यात
येत असून ३६ जिल्ह्यांत टप्प्याटप्प्यानं उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याची माहितीही
त्यांनी आज नागपूर इथं महालक्ष्मी सरस प्रदर्शनात दिली. ते म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर जिल्हा परिषदेनं राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.
****
राज्यातले हॉटेल, ढाबे, उपहारगृहं तसंच कंपन्यांमधली
उपाहारगृहं, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवली जाणारी
भोजनगृहं, अन्न प्रक्रिया आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राला २० टक्के अतिरिक्त
व्यापारी एलपीजी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. व्यापारी एलपीजीच्या
वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळं हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे मात्र, गॅस मिळविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणी करणं आणि पीएनजीसाठी अर्ज करणं बंधनकारक राहणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात केरोसिन वितरणाबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात
आले आहेत. प्रलंबित परवाने नूतनीकरण झालेले मानण्यात येणार असून, कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसंच वारसांच्या नावे परवाने तात्काळ वर्ग करण्याचे
निर्देश देण्यात आले असल्याचं शासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
सीबीआयनं कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी सहभाग असल्याबद्दल अनिल
अंबानी यांच्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपनीची चौकशी सुरु केली आहे. त्याअंतर्गत
आज सीबीआयनं ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सल्लागाराची चौकशी
केली. या कंपनीनं रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या सध्या चौकशी
सुरु असलेल्या दोन कंपन्यांची मालमत्ता खरेदी केली आहे, असं सीबीआयनं म्हटलं आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रनं गेल्या वर्षी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. याशिवाय सीबीआयनं
हजारो कोटी रुपयांच्या एका मोठ्या बँक घोटाळा प्रकरणात रिलायन्स एडीए ग्रुपच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांची चौकशी केली. स्टेट बँक ऑफ इंडियानं केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल
करण्यात आला होता.
****
नाशिक इथं महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू
ज्योतिषी अशोक खरात याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका पीडित महिलेनं गर्भवती असताना खरातनं त्याच्या कार्यालयात
बोलून अत्याचार केला तसंच अघोरी कृत्य करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील ईशान्येश्वर मंदिराच्या
ट्रस्टच्या नावानं पैसे घेतल्याची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा
पोलीस ठाण्यात खरात याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलिसांनी आता चौकशीचं त्यांचं
कार्यालय महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये हलवलं आहे. या ठिकाणी खरातची आज चौकशी सुरू
आहे.
****
ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी
आकर्षण निर्माण व्हावं, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी
आणि जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा या उद्देशानं नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं ६७
विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो इथं शैक्षणिक सहलीसाठी आज उत्साहात
रवाना करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या प्रोत्साहनातून तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी
मेघना कावली यांच्या प्रेरणेतून ही सहल होत आहे. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना केरळ
राज्याची संस्कृती, स्वच्छता, भाषा आणि वाहतुकीचे नियम
यांचा परिचय होणार असून शैक्षणिक दृष्टीनंही हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं
मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांनी सांगितलं.
****
राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या
नेतृत्वाची दखल घेत सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘सोसायटी अचिव्हर्स’ यांनी त्यांच्या
विशेष मुलाखतीसह त्यांना मुख पृष्ठावर स्थान दिलं आहे. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक
प्रवासाचा गौरव याद्वारे करण्यात आला आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन
या विभागांत मंत्री म्हणून काम करताना मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या पुढाकारांचा आढावा
या मुलाखतीत मांडण्यात आला आहे. मासिकाच्या संपादक अँड्रिया कोस्टबीर यांनी ही विशेष
मुलाखत घेतली आहे. मंत्री मुंडे यांच्या हस्ते संपादक कोस्टबर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
काल या विशेष मासिकाचं मुंबईत प्रकाशन करण्यात आलं.
****
पुण्यात वाघोलीमध्ये सुरू असलेल्या ६८व्या महाराष्ट्र केसरी
स्पर्धेत आज समारोपाच्या दिवशी किताबाच्या मुख्य लढती होत आहेत. हिंगोलीचा सिकंदर शेख
विरुद्ध सोलापूरचा महेंद्र गायकवाड अशी माती विभागात तर सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा
हर्षवर्धन सद्गिर यांच्यामध्ये गादी विभागात अंतिम झुंज होणार आहे. संध्याकाळी साडे
सात ते रात्री साडे आठ वाजेदरम्यान निर्णायक लढत रंगणार आहे.
****
बीड जिल्ह्यातून न्यूरोलॉजिस्ट सुपर स्पेशलिस्ट पहिली महिला
डॉक्टर म्हणून डॉक्टर कल्याणी चव्हाण यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. २०२५ च्या एमडी
सुपर स्पेशलिस्ट परीक्षेमध्ये अखिल भारतीय क्रमवारी मिळवणाऱ्या
डॉक्टर कल्याणी या मराठवाड्यातील पहिली महिला विशेषज्ज्ञ ठरल्या आहेत. बीड शहरातील
वृत्तपत्र विक्रेते सुदाम चव्हाण यांच्या त्या कन्या असून या यशाबद्दल त्यांची प्रशंसा
होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांविरुद्ध
गुन्हे दाखल केले आहेत. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी या संदर्भात दिलेल्या आदेशानंतर
अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांचं पथक शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध
कारवाई करत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
जालना तालुक्यातल्या सावंगी तलाव मंडळातील निरखेडा इथं आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ घेण्यात आलं. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशानं आयोजित या शिबिरात महसूल, आरोग्य आणि कृषी विभागांच्या
दालनांद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment