Wednesday, 18 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 18 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मार्च २०२ सकाळी.०० वाजता

****

लोकसभेत आज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या २०२६–२७ वर्षासाठीच्या अनुदान मागण्यांवर चर्चा होऊन मतदान होणार आहे. याशिवाय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील अनुदानाच्या मागण्यांवरही चर्चा आणि मतदान करण्याचं नियोजन आहे.

****

राज्यातल्या विविध अभ्यासक्रमांसाठी मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीतला केंद्र सरकारचा वाटा थेट त्या–त्या संस्थांच्या खात्यात जमा करता येईल का, याबाबत केंद्राच्या समितीबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू, असं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत दिलं. सध्या हे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असून, ते पैसे वेळेवर शैक्षणिक संस्थांना मिळत नाहीत, त्या संस्थांचा तगादा सुरू होतो, त्यांच्या कागदपत्रांसाठी अडवणूक केली जाते, याबाबत आमदार किशोर दराडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या शिष्यवृत्तीतला राज्य सरकारचा वाटा कुठेही प्रलंबित नसून, केंद्राचा वाटा यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असंही शिरसाट यांनी सांगितलं. 

****

टपाल खात्यानं २४ तासात किंवा ४८ तासात पत्र आणि वस्तू पोहोचवण्याची सुविधा सुरू केली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये कालपासून या सेवेला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत या सेवेचं उद्घाटन झालं. यात पत्र किंवा वस्तू मिळाल्याची खात्री ओटीपीद्वारे केली जाणार आहे. या गोष्टी पोहोचवण्यात उशीर झाला तर पैसे परत देण्याची सुविधाही टपाल खात्यानं उपलब्ध करुन दिली आहे.

****

महाराष्ट्र महावितरण कंपनीने एक लाख कोटी रुपयांचा वार्षिक महसुलाचा टप्पा पार करून देशातली सर्वात मोठी कंपनी होण्याचा मान मिळवला असून, महावितरणनं केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत विजेचे दर वाढण्याऐवजी दरवर्षी कमी होत जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे आता राज्यातल्या उद्योगांना, सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीज वापरल्यास २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. पूर्वी रात्री वीज शिल्लक असल्यानं १२ ते ६ या वेळेत वीज वापरासाठी सवलत दिली जात असे असंही ते म्हणाले.

****

राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्यपाल आणि कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी काल राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यापीठांनी आपलं राष्ट्रीय मानांकन सुधारावं आणि त्यासाठी वेळोवेळी लक्ष निर्धारित करावं, अशी सूचना त्यांनी कुलगुरुंना केली. विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी या दृष्टीने विद्यापीठांनी शाळांशी संपर्क वाढवावा आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावं, महिला सक्षमीकरण तसंच कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून महिलांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी सुरु केलेला ‘स्वयंसिद्धा’ हा उपक्रम विद्यापीठांनी गांभीर्यपूर्वक राबवावा, आदी सूचनाही राज्यपालांनी केल्या.

****

राज्यात महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. शिक्षण विभागातर्फे २०२३–२४ आणि २०२४–२५ या वर्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत एसएनडीटी महिला विद्यापीठात करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. उच्च आणि तंत्र शिक्षणासाठी मुलींचं शिक्षण शुल्क माफ केल्यामुळे सकारात्मक बदल घडून येत असून, मुलींच्या प्रवेशात लक्षणीय वाढ होत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी आणि महावीर जयंती हे सण नागरिकांनी आनंदात आणि उत्साहात साजरे करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. आगामी सण-उत्सावाच्या पार्श्वभूमीवर काल जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यावेळी उपस्थित होते.

****

दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक जीवनात सहजतेनं वावरता यावं यासाठी सार्वजनिक ठिकाणी विविध पायाभूत सुविधा तसंच संकेतस्थळांवर सुलभ प्रवेश उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाबाबतच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

****

भंडारा इथल्या औद्योगक वसाहतीत पोलिसांनी एका अनधिकृत गॅस सिलेंडर गोदामावर धाड टाकली. या कारवाईत घरगुती आणि व्यावसायिक वापराचे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. यात घरगुती वापराचे ४० रिकामे सिलेंडर, व्यावसायिक वापराचे आठ रिकामे सिलिंडर तर लहान पाच सिलेंडरचा समावेश आहे.

****

फ्रान्स मध्ये सुरु असलेल्या ऑरलियन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आकर्षि कश्यप हिने दोन्ही पात्रता सामने जिंकून महिला एकेरीच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळवलं आहे. पहिल्या फेरीत आकर्षिचा सामना सिंगापूरच्या येओ जिया मिन हिच्याशी होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...