Tuesday, 31 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलप्रभावित भागांमध्ये विकास पोहचला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं संसदेत निवेदन

·      उद्यापासून देशभरात जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला प्रारंभ

·      जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत-केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

·      भगवान महावीर जयंतीचा आज सर्वत्र उत्साह

आणि

·      बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका, जालना जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नक्षलवादाविरुद्ध निर्णायक लढा देऊन, नक्षलग्रस्त भागात विकास पोहोचवला, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत या विषयावर निवेदन करत होते. गेल्या दशकात देशात नक्षलवादी हिंसाचारात लक्षणीय घट झाली असून, अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं त्यांनी सांगितलं. २०२४ पासून छत्तीसगडमध्ये दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला, २०२५ मध्ये ३०० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आणि ८०० हून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जे शस्त्र खाली ठेवतील त्यांच्याशीच चर्चा केली जाईल, पण गोळीबार करणाऱ्यांना गोळ्यांनी प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं.

 

****

देशभरात जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. देशातली ही १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. देशाचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी काल दिल्लीत ही माहिती दिली.

दोन टप्प्यात होणाऱ्या या प्रक्रियेअंतर्गत एक एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून घरांची यादी तयार करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले:

बाईट- जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण

 

जनगणनेसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रश्नांची अधिसूचना आधीच जारी केलेली आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठीचे प्रश्न लवकरच प्रसिद्ध केले जातील, असं मृत्युंजय कुमार यांनी सांगितलं. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातिनिहाय गणना केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आणि मूलभूत संरचना या जागतिक अस्थिरतेच्या काळातही मजबूत असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. जगभरातल्या सर्वच देशांचं चलन या युद्ध परिस्थितीमुळे प्रभावित झालं आहे, तर आपल्या देशात महागाई कमी झाली, एकूण देशांतर्गत उत्पन्न – जीडीपी सात टक्क्याहून अधिक दराने वाढत आहे, आणि चालू खात्यातली तूट एक टक्क्याहून कमी असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

****

देशात एक एप्रिलपासून ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ लागू होणार आहे. या नियमानुसार घनकचऱ्याच्या उगमस्थानीच ओला कचरा, सुका कचरा, जैविक कचरा आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा, अशा चार गटात वर्गीकरण, अनिवार्य केलेलं आहे.

****

पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजे पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणं बंधनकारक असल्याची माहिती, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नागरिकांमधला संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी, स्वस्त धान्य दुकानांमधून तीन महिन्यांचं अन्नधान्य आगाऊ देण्यास परवानगी देण्यात आली आहे, तसंच केरोसिनचं वाटपही सुरू करण्यात आलं असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने काल धाराशिव जिल्ह्यात सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रा काढली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत काँग्रेस पदाधिकारी, महिला तसंच शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

****

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांसह शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

धाराशिव शहरातून सकल जैन समाजाच्या वतीनं काल शोभायात्रा काढण्यात आली. एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने शहरातल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.

****

तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. तीन एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात आज, उद्या आणि परवा देवीची पारंपरिक छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून, उद्या देवीचा जोगवा असेल. या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने मंदिर संस्थानच्या वतीने आवश्यक तयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

 

दरम्यान, येडेश्वरी देवीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेलाही काल प्रारंभ झाला, या यात्रेत दोन एप्रिल तसंच तीन एप्रिलला पालखी मिरवणूक आणि चुनखडी सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कळंब मार्गावरील अवजड वाहनं अन्य मार्गाने वळवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी पुजार यांनी दिले.

****

मराठवाड्यात सर्वत्र काल अवकाळी पाऊस पडला.

छत्रपती संभाजीनगरात काल जोरदार पाऊस झाला. पैठण तसंच सिल्लोड तालुक्यासह छत्रपती संभाजीनगरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे. सिल्लोड तालुक्यात वीज पडून चार जनावरे दगावली.

परभणी शहर परिसरातही काल गारपिटीसह पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड शहरातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

जालना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा बियाणे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकालाही फटका बसत आहे. अंबड तालुक्यातल्या महाकाळा इथल्या दोन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. गोविंद लहाने आणि आदित्य बेद्रे हे दोघे विज्ञानेश्वर आपेगाव इथल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असताना, ही दुर्घटना घडली.

हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री वादळी वारे, वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू, हळद पिकांचं मोठं नुकसान झालं असून, आंबा पिकाचीही पडझड झाली आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.

दरम्यान, राज्यात पुढच्या चार दिवसात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बीड जिल्ह्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात अला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची तसंच विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण करण्याची सूचना केली आहे.

****

नांदेड महापालिकेच्या ७४ सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवांच्या संनियंत्रणासाठी उभारलेल्या 'अविरत कक्षा'चं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. नागरिकांना आता पालिकेत न येता घरबसल्या विविध दाखले आणि परवाने मिळवता येणार आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...