Thursday, 12 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      कृषी अन्न प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त

·      देशात घरगुती वापराचा गॅस तसंच इंधनाचा पुरेसा साठा-सरकारचा निर्वाळा

·      प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता उद्या पंतप्रधान जारी करणार

·      बॉम्बच्या मेलमुळे विधान भवनात खळबळ-तपासाअंती अफवा असल्याचं निष्पन्न

आणि

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोटूल इथं गती शक्ती कार्गो टर्मिनलला मंजुरी

****

कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विशेषत: कृषी अन्न प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी व्यक्त केली आहे. ‘कृषी अन्न प्रक्रियेत महिलांची भूमिकाया विषयावरील जागतिक परिषदेचं उद्घाटन नवी दिल्लीत आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. या क्षेत्रात महिलांच्या योगदानाचा उल्लेख करतांना राष्ट्रपती म्हणाल्या -

बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू

****

संसदेचं मर्यादा पालन हे आपलं कर्तव्य असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. बिर्ला यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव काल फेटाळून लावण्यात आला, त्यानंतर आपल्या पदावरून ते आज बोलत होते. सदनातल्या प्रत्येक सदस्याला नियमाप्रमाणेच बोलण्याची संधी मिळत असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईटओम बिर्ला

लोकशाहीत व्यवस्था निर्माण करण्याची आपली जबाबदारी असून, घोषणाबाजी, पत्रकं भिरकावणे अशा गोष्टी सदनाच्या प्रतिष्ठेला अनुसरुन नसल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. या सदनाची मर्यादा, प्रतिष्ठा राखणं सामूहिक जबाबदारी असून, तसा सगळ्या सदस्यांनी संकल्प केला पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यासंदर्भात लोकसभेत विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळून लावला. या मुद्यावर संबंधित खात्याचे मंत्री निवेदन देतील असं त्यांनी सांगितलं. मात्र या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी देशात घरगुती वापराचा गॅस तसंच इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. नागरिकांनी यासंदर्भात चिंता करण्याचं किंवा अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असंही पुरी यांनी म्हटलं आहे.

****

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात झालेल्या चर्चेनंतर इराणने, भारताचे ध्वज असलेल्या दोन तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. पुष्पक आणि परिमल ही दोन्ही जहाजं होर्मुझमधून प्रवास करून भारतात येतील. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे भारताची २८ जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात थांबून आहेत. या जहाजांवर सुविधा आणि सुरक्षा पुरवणं, यावर संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

****

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावरच्या हल्ल्याची सखोल चौकशी केली जाईल, असं आश्वासन राज्यसभेचे सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी दिलं आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. फारुख अब्दुल्ला यांच्यावर काल जम्मू इथं गोळीबार झाला, त्यातून ते सुखरूप बचावले, हल्लेखोराला पोलिसांनी पकडलं असून पुढचा तपास सुरु आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आसाममधल्या गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता जारी करतील. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत चार लाख नऊ हजार कोटींहून अधिक रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. उद्या पंतप्रधान मोदी सुमारे ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे, १८ हजार ६४० कोटी रुपये जारी करतील असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान

देशातलं एकूण अन्नधान्य उत्पादन २०१४ मध्ये २५२ दशलक्ष टनांवरून २०२५ मध्ये सुमारे ३५७ दशलक्ष टनांपर्यंत वाढलं असल्याची माहिती चौहान यांनी दिली. सरकारने एआय-आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म, भारत विस्तारचा पहिला टप्पा देखील सुरू केला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये कृषी प्रश्नांशी संबंधित व्यापक माहिती मिळत असल्याचं चौहान यांनी सांगितलं.

****

ऐतिहासिक दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिवादन केलं. १९३०मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आजच्याच दिवशी सुरू झालेली दांडी यात्रा हा स्वातंत्र्यलढ्यातला एक निर्णायक क्षण होता, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

****

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड इथल्या प्रीती संगमावर जाऊन चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेआदरांजली अर्पण केली. मुंबईत मंत्रालयात तसंच इतर जिल्ह्याजिल्ह्यांच्या मुख्यालयांमधे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा प्र-कुलगुरु डॉ.अशोक महाजन यांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करण्यात आली.

****

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना विधानभवन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आज विधानभवनाच्या अधिकृत ईमेल आयडीवर प्राप्त झाला. या मेलमुळे काही काळ परिसरात गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शोधमोहीम राबवली, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकाला तत्काळ पाचारण करण्यात आलं. दरम्यान, हा मेल म्हणजे एक अफवा असून, विधानभवन सुरक्षित तसंच सुरळीतपणे सुरू असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत चर्चा झाली. यावेळी विविध विभागाशी संबंधित मागण्या सदस्यांनी केल्या. विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली.

****

नवीन नेरळ-शिरूर महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी आशा आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकावर गती शक्ती कार्गो टर्मिनल सुरु करण्यास दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने मंजुरी दिली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत या टर्मिनलचं कार्यान्वयन सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. या टर्मिनलमुळे परिसरातली औद्योगिक तसंच कृषी उत्पादनं यांची कार्यक्षम रेल्वे वाहतूक शक्य होईल, पर्यायाने औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

****

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. महानगर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा येत्या रविवारी होणार आहे. या सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ज्येष्ठ क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेला देशांतर्गत सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघटना म्हणून गौरवण्यात येईल. या सोहळ्यात यंदाचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार सध्याचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला दिला जाण्याची शक्यता याबाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...