Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 18
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेने आज २० राज्यांमधल्या ५९ सदस्यांना निरोप दिला.
उपसभापती हरिवंश, एच डी देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांचा यात समावेश आहे. या निरोप समारंभादरम्यान बोलताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदीय लोकशाहीत या सदस्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील, असं नमूद केलं. संसद हे अर्थपूर्ण चर्चांचं एक असं व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक सदस्य महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि या प्रवासात
त्यांना समृद्ध करणारे तसंच आव्हानात्मक असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात, असं ते म्हणाले. राजकारणात कधीच ‘पूर्णविराम’ नसतो, भविष्यकाळात नेहमीच नव्या संधी दडलेल्या असतात, आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये प्रत्येक सदस्याचा अनुभव आणि
योगदान हे सदैव मोलाचं ठरेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ई-कॉमर्स क्षेत्रात
ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन आणि अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब केल्याप्रकरणी अनेक
संस्थांवर कारवाई केल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी
आज लोकसभेत दिली. २०२० पासून कायदेशीर मापनशास्त्र विभागाने चुकीच्या पद्धतींचा अवलंब
करणाऱ्या अशा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना ९९७ नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत पीडित ग्राहकांना
एक हजर ४४० कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्यात आला असून, ग्राहक व्यवहार विभागाची ही सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक असल्याचं
जोशी यांनी सांगितलं.
****
राज्यात प्लॅस्टिक किंवा तत्सम फुलांवर बंदी घालणारी विशेष
अधिसूचना काढली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. आमदार प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भातला प्रश्न
उपस्थित केला होता. प्लास्टिकची फुलं विकणाऱ्या बाजारपेठांवर कारवाई करायचे अधिकार महानगरपालिकांना दिले जातील, तसंच, अशा फुलांचा वापर सजावटीसाठी करणाऱ्या मंगल कार्यालयांवरही कारवाई
केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत एकल वापर प्लॅस्टिकच्या
बंदीचं उल्लंघन करणाऱ्या ३ हजार ३९० आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून दीड कोटी रुपयांचा
दंड वसूल केल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
****
राज्यातल्या विविध अभ्यासक्रमांसाठी मागास प्रवर्गातल्या
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीतला केंद्र सरकारचा वाटा थेट त्या–त्या
संस्थांच्या खात्यात जमा करता येईल का, याबाबत केंद्राच्या समितीबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू, असं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज
विधानपरिषदेत दिलं. याबाबत आमदार किशोर दराडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या शिष्यवृत्तीतला राज्य सरकारचा वाटा कुठेही प्रलंबित नसून, केंद्राचा वाटा यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असंही शिरसाट यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरण
दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज श्रीक्षेत्र तुळापूर इथल्या संभाजी
राजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्या मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत
सहभागी झाल्या होत्या. तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विविध विकासकामांबाबत
पवार यांनी माहिती घेऊन, ही कामं दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
****
परभणी जिल्ह्यात आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी आणि महावीर जयंती हे सण नागरिकांनी आनंदात आणि उत्साहात
साजरे करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह
चव्हाण यांनी केलं आहे. आगामी सण-उत्सावाच्या पार्श्वभूमीवर काल जिल्हा शांतता समितीच्या
बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यावेळी
उपस्थित होते.
****
नांदेड इथं आज “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष
आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली
यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक
कार्य संचालनालय यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सायंकाळी कुसुम सभागृहात होणार
आहे.
****
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार जालना
जिल्ह्यात दोन दिवसांत हवामानात बदल होण्याची
शक्यता आहे. उद्या १९ मार्च रोजी जिल्ह्यासाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment