Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २० मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
देशात गेल्या तीन दिवसांत साडेपाच हजाराहून अधिक ग्राहकांनी
पाईप गॅस जोडणीला पसंती दिल्याची माहिती, पेट्रोलियम आणि
भूगर्भ वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली. आखाती
प्रदेशातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित आंतर-मंत्रालयीन बैठकीनंतर त्या
बोलत होत्या. या बैठकीत शर्मा यांनी गेल्या दोन आठवड्यात सव्वा लाख घरगुती आणि
व्यावसायिक वापरासाठीच्या पाईप गॅस जोडण्या वितरीत कऱण्यात आल्याचीही माहिती दिली.
देशभरात घरगुती वापरासाठीचा पीएनजी आणि वाहतुकीच्या वापरासाठीचा सीएनजी दोन्ही
वायूंचा शंभर टक्के पुरवठा सुनिश्चित करण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या सेफसी विष्णू या
जहाजावरून सुरक्षितपणे सुटका झालेले १५ भारतीय खलाशी लवकरच भारतात परततील. तसंच, या घटनेत ज्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, त्याचं
पार्थिवही भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या
आखात विभागाचे सहसचिव असीम महाजन यांनी सांगितलं.
****
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर
केंद्र सरकारनं निर्यातदारांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली
आहे. १४ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान मध्यपूर्वेच्या मार्गाने निर्यात केलेल्या
वस्तूंना सरकार कुठल्याही अतिरीक्त प्रीमियम शिवाय विमा संरक्षण देणार आहे. विमा
संरक्षणासाठीचा अतिरीक्त प्रीमियम सरकार भरणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालक
लव अग्रवाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निर्यातदारांना
येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विविध मंत्रालयांशी समन्वय साधण्याचं काम सुरू
असल्याची माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली.
****
राज्यातल्या ३७ साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती
प्रकल्पातून खरेदी केलेल्या
विजेचे ३०८ कोटी रुपयांचं वीजबिल महावितरणकडे थकीत आहे. ही रक्कम कारखान्यांना
मिळावी यासाठी राज्य सरकारने आदेश द्यावेत, अशी
मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानं केली आहे. सध्याचे
सहवीजनिर्मितीचे दर प्रतियुनिट साडेचार रुपये ते चार रुपये ९९ पैसे आहेत.
उद्योगांना ते न परवडणारे आहेत, तसंच शेतकऱ्यांची प्रलंबित
वीज रक्कम वसूल करून दिली नाही तर पाच टक्के दर कपात करण्यात येते, त्यामुळे ही वसुली शक्य नसल्याचं संघानं स्पष्ट केलं आहे.
****
पुण्यात सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती
स्पर्धेत कालच्या दिवसाचा समारोप अनेक चित्तथरारक लढतींनी झाला. रात्री उशिरा
झालेल्या किताबी लढतीमध्ये माती विभागातील महेंद्र गायकवाड, बाळू बोडके,
सिकंदर शेख, शुभम शिंदनाळे, संतोष दोरवड आणि सुदर्शन कोतकर यांनी विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद
केली. त्याचप्रमाणे गादी विभागातल्या पहिल्या फेरीत शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर आणि पृथ्वीराज मोहोळ
यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
****
यवतमाळ जिल्ह्यात हॉटेल, भोजनालय
तसंच बार-रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांविरुद्ध
प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, भरारी पथकांकडून धडक कारवाई
सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत महागांव, हिवरा, धनोडा,
गुंज आदी ठिकाणांसह विविध हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून एकूण १३
भरलेले घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढी इथं होळीला सुरु झालेल्या
कानिफनाथांच्या यात्रोत्सवाचा काल समारोप झाला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर
कानिफनाथांच्या समाधिची विधिवत पूजा करून समारोप करण्यात आला. गावातून कावड
मिरवणूक,
पालखी मिरवणूक काढण्यात आली. लाखो भाविक या यात्रेसाठी मढी
इथं दाखल झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या ८२ ग्राम पंचायतींमधल्या
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. सात एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान
उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २८ एप्रिल रोजी
मतदान तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. ८२ ग्रामपंचायतीमध्ये १४३ जागा रिक्त
आहेत. उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी ही माहिती दिली. यामध्ये सर्वाधिक ३६
ग्रामपंचायतीमध्ये ३९ जागा किनवट तालुक्यात आहेत. त्या खालोखाल माहूर तालुक्यात २१
ग्रामपंचायतीमध्ये ३९ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत.
****
वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नांवर बीड इथं काल
शेतकरी हक्क मोर्च्याच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली. देशातल्या पहिल्या
शेतकरी आत्महत्येला ४० वर्ष उलटून गेले, तरीही शेतकरी
आत्महत्या थांबत नाहीत, उलट दिवसेंदिवस
आत्महत्यांची संख्या वाढत आहे, असं शेतकरी नेते राजेंद्र
आमटे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं महिला आर्थिक विकास
महामंडळामार्फत स्थापन महिला बचतगटांच्या विविध उत्पादनांचं जिल्हास्तरीय प्रदर्शन
आणि विक्री मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यात बचतगटांचे सुमारे ५० स्टॉल्स
लावण्यात आले आहेत.
****
फ्रान्स मध्ये सुरु असलेल्या ऑरलियन्स मास्टर्स बॅडमिंटन
स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या तन्वी शर्मा, इशारानी
बरुआ आणि मालविका बनसोड यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीतही
अर्जुन मदाथिल रामचंद्रन आणि हरिहन अमसाकरुनन यांच्या जोडीही उपान्त्यपूर्व फेरीत
दाखल झाली.
****
No comments:
Post a Comment