Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 March 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२६ सायंकाळी
०६.१०
****
· भारत तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मजबूत पाया घालणारा देश बनत असल्याचं
पंतप्रधानांचं प्रतिपादन
· १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राला १०९ कोटींहून अधिक रक्कम
वितरित
· राज्य शासनाच्या 'माझं गाव, आरोग्यसंपन्न
गाव'
अभियानाला उद्यापासून सुरुवात
आणि
· भगवान महावीर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रांसह विविध उपक्रम
****
भारत केवळ बदलाचा साक्षीदार नसून, तंत्रज्ञान
आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मजबूत पाया घालणारा देश बनत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या साणंद इथं आज केन्स
सेमिकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
जागतिक पुरवठा साखळीतलं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही ओ एस
ए टी सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर दररोज सहा पूर्णांक तीन दशलक्ष युनिट्स
उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प आधीच
कॅलिफोर्निया-स्थित कंपनीला इंटेलिजेंट पॉवर मॉड्यूल्सचा पुरवठा करत असून, उत्पादनाचा मोठा वाटा निर्यातीसाठी निश्चित करण्यात आला आहे.
भारत सरकार एक परिपूर्ण सेमिकॉन परिसंस्था तयार करण्याचा
प्रयत्न करत असून, देशाला गरज असलेल्या चिपपैकी जास्तीत
जास्त चिप भारत स्वदेशात बनवेल, असं सांगून पंतप्रधानांनी, यावर्षीच्या अर्थसंकल्पातल्या, सेमिकॉन व्हिजन टू घोषणेचा
उल्लेख केला. ते म्हणाले,
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस खऱ्या अर्थाने “मेक इन इंडीया, मेक फॉर द वर्ल्ड” या भावनेचं प्रतीक आहे. या प्रकल्पात उत्पादन सुरू
झाल्यामुळे भारत जागतिक बाजारपेठेत एक विश्वासार्ह सेमीकंडक्टर पुरवठादार म्हणून
आपली भूमिका अधिक मजबूत करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आगामी काळात अनेक भारतीय
कंपन्या जागतिक सहकार्याच्या माध्यमातून जगासाठी सक्षम आणि लवचिक सेमीकंडक्टर
पुरवठा साखळी उभारण्यात योगदान देतील, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी गांधीनगरमधल्या कोबा इथं
‘सम्राट संप्रती संग्रहालया’चं उद्घाटन केलं. नव्यानं स्थापन झालेल्या वाव-थराड
जिल्ह्यात सुमारे १९ हजार ८०० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि
भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.
****
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या मघडा गावात आज सकाळी माता
शीतला देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर सहाहून अधिक जण जखमी झाले. शीतलाष्टमीच्या पूजेसाठी मंदिरात मोठ्या
प्रमाणावर झालेल्या भाविकांच्या गर्दीमध्ये अचानक गोंधळ उडून ही चेंगराचेंगरी
झाली. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख
रुपये तर राज्य शासनाकडून प्रत्येकी सहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
****
पंचायती राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी
१५व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार अनुदानाला मंजुरी देऊन केंद्र सरकारनं निधी
वितरित केला आहे. याअंतर्गत महाराष्ट्राला २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पहिल्या
आणि दुसऱ्या टप्प्यात १०९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित झाली आहे. या
अनुदानामुळे गावपातळीवर प्रशासन अधिक सक्षम होईल आणि गरजेनुसार विकासकामं राबवता
येतील. ठरावीक उद्दिष्टांसाठी मर्यादित निधी आणि स्थानिक गरजेनुसार वापरता येणारा
निधी,
अशा दोन प्रकारचा हा निधी आहे.
****
राज्य शासनाच्या, 'माझं
गाव,
आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला उद्या एक
एप्रिलपासून सुरुवात होत आहे. ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध
करून देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश
आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती या अभियानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर
देखरेख ठेवणार आहे. गाव पातळीवर आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट निकष
ठरवण्यात आले असून, या निकषांच्या आधारे ७० टक्क्यांपेक्षा
अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून पुरस्कार देण्यात येणार
आहेत. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारनं ८० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर
केला आहे.
****
२०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचं निर्मूल करण्याच्या
केंद्र सरकारच्या उद्दिष्टात महाराष्ट्र शासनानं सक्रिय सहभाग घेतला आहे. या
रोगाच्या निर्मूलनासाठी, ट्रिपल ड्रग थेरपी अर्थात
तीन औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे, अशी
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात लातूर, धाराशीवसह एकूण अठरा जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत असल्याचं
त्यांनी सांगितलं. राज्यात ५५ लाख नागरिकांना या रोगासाठीच्या औषधोपचारांचा लाभ
देण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात साजरी
केली जात आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांसह
शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
**
छत्रपती संभाजीनगरमध्ये महावीर जयंतीनिमित्त काढण्यात
आलेल्या शोभायात्रेत, माझे शहर, माझी
जबाबदारी,
या उद्घोषणेवर आधारित देखावे सादर करण्यात आले. पर्यावरण
संवर्धन,
स्वच्छता आणि एकतेचा संदेशही यावेळी देण्यात आला.
जालना शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सुमारे आठ हजार
शुभ्रवस्त्रधारी समाजबांधव, महिला आणि मुलं सहभागी झाले
होते. यामधल्या अहिंसा परमो धर्म, जिओ और जीने दो, या घोषणांमुळे आणि जागोजागी होणाऱ्या पुष्पवृष्टीमुळे या शोभायात्रेला भव्य सोहळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
भोकरदन,
अंबड, परतूर इथंही शोभायात्रा
काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
काढण्यात आली. यावेळी नागरीकांसह बालगोपाळही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
बीड इथंही सकल जैन समाजतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं होतं. यामध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान असलेल्या रथाची
शहरातून फेरी,
रक्तदान, दंतचिकित्सा आणि फिजिओथेरपी
शिबिरं,
विविध धार्मिक कार्यक्रम आणि गौतम प्रसादीचा समावेश
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा चौथा दीक्षांत
समारंभ मुंबईत आज पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि या
विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोनशे
पंचावन्न विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या.
****
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातल्या नदी आणि नाल्यांच्या
काठावरची अतिक्रमणं हटवण्याची कारवाई उद्यापासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त
श्रीकांत यांनी दिले आहेत. नालेसफाईच्या कामांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत
होते. विशेषतः नारेगाव परिसरात नदीकाठावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्यानं ते
प्राधान्यानं हटवावं, असं त्यांनी सांगितलं. भविष्यात
पुरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी काटेकोर
नियोजन करण्याचे निर्देशही श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथल्या
ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिराच्या जतन आणि दुरुस्ती कामांसाठी राज्य शासनानं तीन
कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या मंदिराच्या
संवर्धनासाठी यापूर्वीही विविध टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
नव्यानं मिळालेल्या या निधीमुळे संवर्धनाची अपूर्ण कामं पूर्ण होण्याला मदत होणार
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या यावर्षीच्या उन्हाळी परीक्षांसाठी
अर्ज सादर करण्याला चार एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. RTGS द्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख सहा एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची लिंक उद्या, एक एप्रिलपासून
उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या
दहा जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपच्या १३, एमआयएमच्या तीन इच्छुकांसह, शिवसेनेचे १५ आणि शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ जणांचा समावेश आहे. उद्या या अर्जांची छाननी
होणार आहे.
****