Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 16 February 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· राजकीय
स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
· यवतमाळ आणि अहिल्यानगर
जिल्ह्यांत
एटीएसची छापेमारी-अनेक जण ताब्यात
· अखिल भारतीय सरपंच
परिषदेचा
२०
फेब्रुवारीला लाक्षणिक संपाचा इशारा
· महाशिवरात्रीचा
उत्सव भक्तीभावाने साजरा-औंढा इथं नेत्रदीपक लेझर शो
आणि
· टी – ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताचा सुपर आठ मध्ये
प्रवेश
****
राजकीय
स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला
दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.बळकट उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र
तसंच सूक्ष्म,
लघु
आणि मध्यम उद्योग यांच्या बळावर भारताला व्यापार करारांमध्ये वरचढ भूमिका घेता येत
असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
खाजगी क्षेत्रानं संशोधन-विकास, पुरवठा साखळी आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी
अधिक गुंतवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं. कॉम्प्युटिंग पॉवर आणि
डेटा सेंटर पायाभूत सुविधांचा विस्तार करून सक्षम एआय
परिसंस्थेची पायाभरणी केली असून, डेटा
सेंटर्समुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी
व्यक्त केला.
****
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला
यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात चर्चा
आणि मतदान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल वृत्तसंस्थेशी
बोलताना ही माहिती दिली. अधिवेशनाच्या या दुसऱ्या टप्प्यात काही
विधेयकं चर्चेला येतील, असं रिजीजू यांनी सांगितलं.
****
केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांनी काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं सीबीडीसी अर्थात केंद्रीय बँक डिजिटल
चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं उद्घाटन केलं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक
वितरण मंत्रालयातला भ्रष्टाचार यामुळे संपुष्टात येईल असा विश्वास यावेळी शाह यांनी
व्यक्त केला. तसंच गरीबांना अन्न पोहोचणं सुलभ होईल, असं ते म्हणाले.
****
उच्च शिक्षण संस्थांमध्ये
उद्योग तज्ज्ञांची प्राध्यापक
म्हणून नियुक्ती करण्यात महाराष्ट्र, देशात दुसऱ्या क्रमांकावर
असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. या क्रमवारीत तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर
तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरात तात्पुरत्या स्वरुपाच्या अशा एक हजार ८४१
नेमणुका झाल्या असून यातल्या तमिळनाडूत ३४५, महाराष्ट्रात
१९३,
गुजरातमधे
१७९ आणि कर्नाटकमध्ये १७० नेमणुका झाल्या आहेत. शिक्षण संस्था आणि उद्योग
यांच्यात समन्वय साधता यावा, तसंच विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्यं आत्मसात
करता यावीत,
हा या नियुक्त्यांमागचा उद्देश आहे.
****
महाराष्ट्र दहशतवादविरोधी
पथकानं काल यवतमाळ आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये वीसपेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी
करुन काही संशयितांना ताब्यात घेतलं. यवतमाळमधल्या पुसद आणि उमरखेड इथं १४ ठिकाणी राबवलेल्या
शोधमोहिमेत आक्षेपार्ह कागदपत्रं, मोबाईल फोन आणि विद्युत उपकरणं जप्त केल्याची, तसंच सीसीटीव्ही
फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. संशयितांची चौकशी
सुरू असून आत्तापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. अहिल्यानगर शहरात मुकुंदनगर भागात
दहशतवादी कारवायांबद्दलच्या गुप्त माहितीवरून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं.
****
अहमदाबाद विमान
अपघाताबाबत परदेशी माध्यमांनी केलेल्या दाव्याचं, केंद्रीय नागरी
विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खंडन केलं आहे. ते काल सांगली
इथं बोलत होते. या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या संस्थेनं अपघातासाठी वैमानिकांना
दोषी ठरवल्याचा दावा इटलीतल्या एका दैनिकानं केला आहे. मात्र या अपघाताचा तपास
अद्याप पूर्ण
झालेला नाही, त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही संस्थांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मोहोळ यांनी केलं आहे.
****
अखिल भारतीय सरपंच
परिषदेने येत्या २० फेब्रुवारीला एकदिवसीय लाक्षणिक संपाचा इशारा दिला आहे. परिषदेचे संस्थापक
अध्यक्ष जयंत पाटील यांनी काल नाशिक इथं ही घोषणा केली. राज्यातल्या १६ हजारांहून अधिक
ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे, अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीमुळे
‘मुख्यमंत्री समृद्ध
पंचायतराज अभियानाला’ खीळ बसल्याचं पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे राज्य
सरकारने अध्यादेश काढून किंवा कायदा करून विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नेमावं, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
****
राज्य सरकारच्या
मराठी भाषा विभागाद्वारे घेण्यात येणारं चौथं विश्व मराठी संमेलन नाशिक इथं येत्या
२७ आणि २८ फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी होणार आहे. मराठा विद्या
प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा मराठी
भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल आढावा घेतला. या संमेलनात मराठी
भाषा विभागाच्या वतीने ३५ जणांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
महाशिवरात्रीचा
उत्सव काल सर्वत्र भक्तीभावाने साजरा झाला. देशातल्या बारा
ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणांसह प्रमुख पुरातन शिव मंदीरात काल पहाटेपासूनच रुद्राभिषेक-महापूजा
करण्यात आली.
परळी-वैजनाथ, औंढा-नागनाथ, वेरुळच्या घृष्णेश्वर, तसंच नाशिक जिल्ह्यात
त्रंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या स्थानांवर दर्शनासाठी देशोदेशीहून आलेल्या भाविकांची
मोठी गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या खडकेश्वरच्या महादेव
मंदीरातही भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर
इथल्या साहित्य संगीत कला मंचच्या वतीनं काल महाशिवरात्रीनिमित्त पैठण तालुक्यात शेकटा
इथल्या पुरातन बारव परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भक्ती रंग नादब्रह्मच्या
वतीने भक्ती संगीताचा कर्यक्रम घेण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात
औंढा नागनाथ मंदिरात जिल्हा प्रशासन आणि मंदिर ट्रस्टच्या वतीने १६० ड्रोनच्या भव्य
लेझर शो काल दाखवण्यात आला. विस्तीर्ण आकाशात औंढा ज्योतिर्लिंगाची कथा
पाहून शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. या लेझर शोमुळे
औंढा नागनाथ इथं येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास आमदार
संतोष बांगर यांनी व्यक्त केला.
लातूर शहराचं
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री निमित्त यात्रा कालपासून
सुरु झाली.
नांदेड इथं राष्ट्रसंत
पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ६५ शिवभक्तांनी रक्तदान केलं.
****
संत सेवालाल महाराज
यांची जयंती काल सर्वत्र साजरी झाली. राज्यभरात यानिमित्त
विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी मुंबई इथं त्यांच्या शासकीय निवासस्थानी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. वाशीमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय-महाविद्यालयाचं
नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, असं करण्यात आलं
आहे.
छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिकेत महापौर समीर राजूरकर यांनी, तर परभणी जिल्हाधिकारी
कार्यालयात नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
बीड जिल्ह्यातल्या
विविध सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या
जयंतीनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
****
टी – ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर
आठ मध्ये प्रवेश केला. काल कोलंबो इथं झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक
जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं, भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सात बाद
१७५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला पाकिस्तानचा
संघ १८ षटकात ११४ धावांवर सर्वबाद झाला. जसप्रित बुमराह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती
आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादव आणि तिलक
वर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दहा चौकार आणि तीन षटकारांसह ४० चेंडूत ७७
धावा करणारा ईशान किशन सामनावीर ठरला.
कालच्या अन्य
सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजनं नेपाळचा नऊ गडी राखून, तर अमेरिकेनं
नामिबियाचा ३१ धावांनी पराभव केला.
या स्पर्धेत आज
अफगाणिस्तान
– संयुक्त
अरब अमिरात,
इंग्लंड – इटली आणि ऑस्ट्रेलिया
श्रीलंका हे सामने होणार आहेत.
****
मराठी
भाषेतली पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना
करण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. काल
रत्नागिरीत
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
परदेशातल्या मराठी नागरिकांच्या पुढच्या पिढीसाठी मराठी शिकवणारा ऑनलाईन कोर्स, कवी केशवसुत
स्मारकाचं अत्याधुनिकीकरण अशा घोषणाही सामंत यांनी यावेळी केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर
इथं वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलनाचा काल समारोप झाला. समारोप सत्रापूर्वी विविध कार्यक्रम
पार पडले.
ज्येष्ठ
दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांची काल प्रकट मुलाखत घेण्यात आली.
****
हिंगोली इथं आयोजित
अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद मुंबई पोलिसांनी पटकावलं. काल झालेल्या
अंतिम सामन्यात मुंबई पोलिसांनी इटारसी संघाचा ३-१ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment