Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 February 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१८ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
वास्तविक जगातल्या समस्या सोडवण्यासाठी
भारत कृत्रिम बुद्धिमत्ता – एआयवर लक्ष केंद्रित करत असल्याचं, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत आज संशोधन
परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. उद्योगांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी
आणि आरोग्यसेवा, शेती आणि हवामान बदल
यासारख्या व्यापक आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार एआयच्या वापराला प्राधान्य देत
असल्याचं त्यांनी सांगितलं. एआय हे एक शक्तिशाली साधन असून, त्याचा वापर मानवतेच्या हितासाठी
केला पाहिजे, असं वैष्णव म्हणाले.
****
दरम्यान, या शिखर परिषदेसाठी जगभरातून आलेल्या
नेत्यांची आणि उद्योगधुरिणांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत. संध्याकाळी
भारत मंडपम इथं ते जागतिक नेत्यांचं स्वागत करतील. नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं
स्पेन, फिनलँड, सर्बिया, क्रोएशिया, एस्टोनिया, भूतान आणि कझाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांशी
द्विपक्षीय चर्चा होणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सॅम ऑल्टमन यांची देखील पंतप्रधान भेट घेणार आहेत.
****
राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला
प्राधान्य देत असल्याचं, पर्यावरण आणि वातावरणीय
बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंबई हवामान परिषदेत अर्थशॉट
प्राईज उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अर्थशॉट उपक्रमातून पुढील पाच
महत्त्वाच्या उद्दिष्टांना प्राधान्य देण्यात आलं आहे. स्वच्छ हवा, कचरामुक्त जग, निसर्ग संवर्धन, सागरी परिसंस्थेचं पुनरुज्जीवन, हवामान सुधारणा पर्यावरण संवर्धन
हे आर्थिक विकासाला चालना देणारे आहेत, हे भारताने जगाला दाखवून
दिल्याचं मुंडे यांनी नमूद केलं. महाराष्ट्राची विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता सागरी
पर्यावरण संरक्षणाला विशेष प्राधान्य देत नैसर्गिक उपाययोजनांद्वारे हवामान बदलाला
सामोरं जाण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.
****
छत्तीसगडमधल्या सुकमा इथं काल २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत
प्रत्येक नक्षलवाद्यास ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा समारोप काल
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थिती झाला. राष्ट्रीय
सेवा योजनेतून घडणारा विद्यार्थी भविष्यात देशाला प्रगतीपथावर नेईल, विकसित भारताचं स्वप्न
अशा युवाशक्तीच्या आधारानेच साध्य होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शिबिरात बारा राज्यातले
१९५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
****
स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात एक नवीन पथदर्शी आणि
नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याचा निर्णय पुण्यात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला. ऊसतोड हंगामासाठी दरवर्षी जिल्ह्याबाहेर स्थलांतर करणाऱ्या हंगामी
कामगारांना शासन आणि संस्थांची अस्तित्वातील धोरणे आणि कल्याणकारी योजनांचे लाभ, प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर मिळवून
देणं, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या चर्चेत स्थलांतरित ऊसतोड कामगारांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यातील अडचणींवर
लक्ष केंद्रित करण्यात आलं.
****
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या
पाचव्या टप्प्याअंतर्गत नाशिक महापालिकेला विभागात पहिल्या क्रमांकाचं दीड कोटी रुपयांचं
बक्षीस जाहीर झालं आहे. शहरात कचरा व्यवस्थापन
अधिक कार्यक्षम करण्यासाठी महानगरपालिकेने घरपातळीवर ओला-सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती
मोहिमा, विशेष पथकं, दंडात्मक कारवाई तसंच स्वच्छता मित्रांच्या
माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला, त्यामुळे महापालिकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या
शिरळी इथं छापा घालून पोलिसांनी चार गुंठ्यातली अफूची शेती नष्ट केली. याप्रकरणी प्रताप
नलगे या आरोपीला अटक करण्यात आली असून, कुरुंदा पोलीस ठाण्यात
गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या
धाकटेवाडी इथं अंमली पदार्थ विरोधी कृती दलानं काल गांजाची झाडं जप्त केली.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
आज भारताचा सामना नेदरलँड सोबत होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानात संध्याकाळी
सात वाजता हा सामना होईल.
दरम्यान, या स्पर्धेत ब गटात आयर्लंड आणि झिम्बाब्वे
यांच्यातला कालचा सामना रद्द झाला, त्यामुळे झिम्बाब्वे सुपर आठ मध्ये
पोहोचला आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर गेला. अन्य सामन्यांमध्ये नेपाळने स्कॉटलंडचा, तर न्यूझीलंडनं कॅनडाचा पराभव केला.
भारतासह श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड यांनीही सुपर आठ मध्ये प्रवेश
केला आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अपक्ष
निवडून आलेले सहा भाजप बंडखोर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन सदस्य
यांनी एकत्र येऊन ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी’ नावाचा नवा गट स्थापन केला
आहे. त्याचं अधिकृत पत्र त्यांनी काल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सुपूर्द
केलं.
****
No comments:
Post a Comment