Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 February
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर असून ते १६ हजार
६८० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचं उद्घघाटन आणि पायाभरणी करतील.
नवीकरणीय ऊर्जा पारेषण प्रणालीचं उद्घघाटन आणि २१ हजार ८०० हून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं
वितरणही ते करणार आहेत. पंतप्रधान राजस्थानमधूनच १४ वर्षांच्या मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या
कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या देशव्यापी ‘एचपीव्ही’ लसीकरण कार्यक्रमाचाही प्रारंभ
करतील.
****
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम सेथुरामन यांच्या नेतृत्वाखालील
पाच सदस्यीय शिष्टमंडळ येत्या सहा ते दहा मार्च दरम्यान कोलंबियाच्या अधिकृत दौऱ्यावर
जाणार असून या शिष्टमंडळात संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर रामचंद्र पारकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद,रामटेक इथले निवडणुक नोंदणी अधिकारी प्रीयेश महाजन, नाशिकचे बुथ लेव्हल अधिकारी सागर शिर्के यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाला कोलंबियातील
आठ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात
आलं आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या उपक्रमांतर्गत भारतीय निवडणूक व्यवस्थेचा अनुभव
जागतिक स्तरावर पोहोचवणं, तसंच कोलंबियातील निवडणूक प्रक्रियेचं
निरीक्षण करून सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणं हे या दौऱ्याचं उद्दिष्ट आहे.
****
नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी, ‘रामन इफेक्ट’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला, या
संशोधनाचं स्मरण म्हणून आजचा दिवस देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला
जातो. यानिमित्त पुण्यातील ‘आयुका’, ‘आयसर’, ‘जीएमआरटी’ आणि ‘पुणे वेधशाळा’ यांसारख्या नामवंत संस्थांमध्ये आज प्रदर्शनं, शास्त्रज्ञांशी संवाद आणि विविध वैज्ञानिक प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘आयुका’तील
अद्ययावत संशोधन सुविधा पाहण्याची संधी दिवसभर मिळणार आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी
केंद्र अर्थात ‘एनसीआरए’नं आज आणि उद्या नारायणगाव तालुक्यातल्या खोडद इथं विज्ञान
प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. यावेळी विविध वैज्ञानिक प्रयोग, लघुपट दाखण्यात येणार असल्याचं ‘एनसीआरए’चे प्रशासकीय अधिकारी ए. बी. जोंधळे यांनी
सांगितलं.
****
लातूर शहरात आज 'महा विधी सेवा शिबीर' आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित
करण्यात आला आहे. लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित हा महामेळावा शहरातील रुक्मिणी मंगल कार्यालय इथे सकाळी साडेदहा वाजता
सुरु झाला.
****
होळीचा सण येत्या दोन मार्चला साजरा होत आहे. होळी पेटवताना
तसंच रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महावितरण विभागातर्फे करण्यात आलं आहे.
****
महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वेळेवर आणि
तत्परतेने आरोग्य सुविधा द्याव्यात, तसंच कोणाच्याही दबावाला बळी
न पडता प्रामाणिकपणे काम करावं, अशा स्पष्ट सूचना परभणीचे महापौर
सय्यद इकबाल यांनी दिल्या.
महापौर सय्यद इकबाल यांनी परभणी महापालिकेच्या विविध आरोग्य
केंद्रांची पाहणी केल्यानंतर काल आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.शहरातील सर्व आरोग्य केंद्र पूर्णवेळ सुरू ठेवावीत, नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, प्रत्येक
आरोग्य केंद्रावर पिण्याच्या पाण्याची तसंच स्वच्छतेची योग्य व्यवस्था उपलब्ध करून
द्यावी असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.
***
गडचिरोली इथले भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा नगर
परिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचं काल रात्री गडचिरोली इथं झालेल्या अपघातात
निधन झालं. घरी जाताना वाटेत प्राणी आडवा आल्यामुळे काटवे खाली कोसळले. यामुळे त्यांच्या
डोक्याला गंभीर दुखापत झाली, मात्र प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुक्तेश्वर
काकडे २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक
निवडणुकीत विजयी झाले होते त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पुन्हा ते निवडून आले. त्यानंतर
ते नगर परिषदेचे आरोग्य सभापती झाले.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि श्रीलंका
यांच्यात सामना होईल. श्रीलंकेतील पल्लेकेले इथं सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू
होईल. दरम्यान,
सुपर आठ फेरीत उद्या कोलकाता इथं भारताचा सामना वेस्ट इंडिज
सोबत होणार आहे. या स्पर्धेतले उपांत्य फेरीतले
सामने चार आणि पाच मार्च रोजी तर अंतिम सामना आठ मार्च रोजी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment