Friday, 13 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ फेब्रुवारी २०२ सकाळी.०० वाजता

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होईल आणि २ एप्रिलपर्यंत चालेल. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिलं. हा अर्थसंकल्प आर्थिक विकासाला चालना देऊन तसंच सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करून, एक मजबूत आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सीतारामन यांनी नमूद केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत ‘सेवातीर्थ’ इमारत संकुलाचं अनावरण करणार आहेत. या संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय तसंच मंत्रिमंडळ सचिवालयाचा समावेश आहे. सेवातीर्थसोबतच कर्तव्यभवन १ आणि २ यांचं औपचारिक उद्घाटनही पंतप्रधान करतील. सायंकाळी ६ वाजता सेवातीर्थ इथं आयोजित सार्वजनिक कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत. कर्तव्यभवन १ आणि २ या नव्या इमारतींमुळे वित्त, संरक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृषी यासह अनेक महत्त्वाची मंत्रालयं प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा जागेतून कामकाज करणार आहेत.

****

जागतिक रेडिओ दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने, आकाशवाणीच्या वतीने छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आज जागतिक रेडिओ दिन परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. युनेस्कोच्या सहकार्याने होत असलेला हा परिसंवाद, “रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता: एआय हे एक साधन आहे, आवाज नाही.” या यंदाच्या रेडिओ दिनाच्या संकल्पनेवर आधारित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रेडिओ दिना निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रेडिओ हे दूरदूरच्या गांवांपासून शहरांत व्यस्त असनार्या लोकांपर्यंत आवाज पोहचवण्याचं एक माध्यम असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आजचा दिवस रेडिओशी जोडलेल्या लोकांच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, जागतिक रेडिओ दिना निमित्ताने छत्रपती संभाजीनगर इथले रेडिओ प्रेमी संजय पवार यांनी आज रेडिओ प्रदर्शन आयोजित केलं आहे. एन आठ परिसरात वेणुताई चव्हाण शाळेजवळ आयोजित हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. सुमारे चारशेहून अधिक विविध प्रकारचे रेडिओ या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

****

भारत आणि अमेरिकेमधील अंतरिम व्यापार कराराचं कृषी क्षेत्रानं स्वागत केलं असल्याचं राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिवेइट्व्हज एक्सजेंज लिमिटेड एन सी डेक्सचे व्यवस्थापकीय संचालक अरुण रास्ते यांनी आकाशवाणीशी बोलतांना सांगितलं. छोट्या शेतकर्यांच्या हितासाठी गहू, तांदूळ, दुध आणि कुक्कुटपालन सारख्या कृषी उत्पादनांना या करारातून वगळण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एकूण निर्यातीवर लावल्या जाणार्या १८ टक्के शुल्काचा  भारतीय निर्यातदारांना फायदा होणार असल्याचं त्यांनी नमुद केलं. या काही तरतुदींमुळे हा करार निर्यातदार, लघु उद्योजक आणि शेतकर्यांसाठी लाभदायी ठरेल असंही रास्ते यावेळी म्हणाले.

****

राज्यातील औषध संशोधन, उत्पादन आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नाशिक, पुणे आणि नागपूर इथं ‘इन्क्युबेशन पार्क’ तसंच ‘फार्मा पार्क’ उभारण्यासंदर्भात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. या प्रकल्पांना नड्डा यांनी प्राथमिक स्तरावर मान्यता दिल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली. महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक निधीत वाढ करण्यास नड्डा यांनी मान्यता दिल्याचं, झिरवाळ यांनी सांगितलं.

झिरवाळ यांनी काल केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांचीही भेट घेतली. आयुष मंत्रालयांतर्गत राज्यातील आदिवासी भागात सुमारे ३०० आयुर्वेदिक दवाखाने उभारण्याचा मानसही झिरवाळ यांनी व्यक्त केला.

****

विविध स्वयंसेवी संस्थांशी राज्य शासनानं केलेल्या भागीदारीतून राज्याचं वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट तसंच नाम फाउंडेशन यांच्यामध्ये काल सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी बोलत होते. या करारामळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तंत्रज्ञान आणि डिजिटल नवोपक्रमाद्वारे आरोग्य, पोषण, जलसंधारण आणि ग्रामीण उपजीविका यांमधील शासकीय प्राधान्यक्रमांना चालना देणं आणि सर्व घटकांपर्यंत प्रमुख योजनांचा लाभ पोहोचवण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात उद्या १४ आणि परवा १५ फेब्रुवारी रोजी अभिरूप न्यायालय स्पर्धा होणार आहे. यंदा या स्पर्धेत विविध राज्यांतील २१ विधी महाविद्यालयांचे संघ सहभागी होत असल्याची माहिती प्राचार्या डॉ. अपर्णा कोत्तापल्ले आणि समन्वयक डॉ. अंजू सिंह यांनी दिली.

****

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील पाच हजार १२ रिक्त पदं भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली. ज्या शैक्षणिक संस्थांकडे 'नॅक' मान्यता आहे, त्यांनाच नवीन पदनिर्मितीचा लाभ मिळेल, असं पाटील यांनी सांगितलं आहे.

****

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया – झिम्बाब्वे, कॅनडा – युएई आणि अमेरिका-नेदरलँड हे सामने होणार आहेत. काल भारताने नामिबियावर ९३ धावांनी विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी पाकिस्तानसोबत होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...