Friday, 13 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘सेवातीर्थ’चं अनावरण

·      संरक्षण अधिग्रहण परिषदेची तीन लाख ६० हजार कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी

·      छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्याचं प्रमाणपत्र युनेस्कोकडून प्रदान

·      'गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र' अभियानात छत्रपती संभाजीनगरचा समावेश

·      धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

आणि

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नामिबियावर ९३ धावांनी विजय

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत ‘सेवातीर्थ’ इमारत संकुलाचं अनावरण करणार आहेत. या संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय तसंच मंत्रिमंडळ सचिवालयाचा समावेश आहे. सेवातीर्थसोबतच कर्तव्यभवन १ आणि २ यांचं औपचारिक उद्घाटनही पंतप्रधान करतील. सायंकाळी ६ वाजता सेवातीर्थ इथं आयोजित सार्वजनिक कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत. कर्तव्यभवन १ आणि २ या नव्या इमारतींमुळे वित्त, संरक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृषी यासह अनेक महत्त्वाची मंत्रालयं प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा जागेतून कामकाज करणार आहेत.

****

संरक्षण अधिग्रहण परिषद-DAC ने तीन लाख ६० हजार कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत वायू दलासाठी राफेल विमानं, क्षेपणास्त्रं तसंच छद्म उपग्रह, नौदलासाठी गॅस आधारित विद्युत जनरेटर, हेरगिरीसाठीची विमानं, तसंच पायदळासाठी रणगाडे आणि रणगाडेरोधी बॉम्बची खरेदी केली जाणार आहे. यापैकी बहुतांश राफेल विमानांची बांधणी देशांतर्गत केली जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औद्योगिक संबंध संहिता विधेयक, २०२६ संसदेत काल मंजूर झालं. हे विधेयक औद्योगिक संबंध संहिता, २०२० मध्ये सुधारणा करतं. ट्रेड युनियन कायदा १९२६, औद्योगिक रोजगार कायदा, १९४६ आणि औद्योगिक वाद कायदा, १९४७ यामधली संभाव्य गुंतागुंत टाळणं, हे या नवीन विधेयकाचं उद्दीष्ट आहे. काल दुपारी लोकसभेनं आणि त्यानंतर राज्यसभेनंही या विधेयकाला संमती दिली.

****

निरंतर आणि सर्वसमावेशक विकासासह आर्थिक क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेवर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं त्यांनी नमूद केलं. या अर्थसंकल्पात १६ नवीन योजनांची घोषणा करण्यात आली असून, या योजनांची राज्यांनी सक्रिय अंमलबजावणी केल्यास राज्यांना मोठा फायदा होईल, असंही सीतारामन म्हणाल्या.

****

काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कथित असभ्य वर्तनाविरोधात कारवाईचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान निराधार वक्तव्य करून सदनाची दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं.

दरम्यान, राहुल गांधी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा प्रस्ताव, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सदनात सादर केला. गांधी यांचं सदस्यत्व रद्द करावं, आणि त्यांनी निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालावी, असं दुबे यांनी या प्रस्तावात म्हटलं आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्याचं प्रमाणपत्र काल पॅरीस इथं राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आलं. युनेस्को कार्यालयात झालेल्या समारंभात, राज्याचे सांस्कृतिक कामकाज मंत्री आशीष शेलार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारलं. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि जगभरातील शिवप्रेमींसाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

****

दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदक सरला माहेश्वरी यांचं काल निधन झालं, त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निकटवर्तीयांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. १९८० ते २००५ पर्यंत दूरदर्शनवर वृत्तनिवेदन करणाऱ्या माहेश्वरी यांची बातम्या वाचनाची संयत शैली, सर्वसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

****

'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र' अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून, लवकरच जिल्ह्यात अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. कॉर्पोरेट घटकांनी CSR च्या माध्यमातून या अभियानात सहभागी होऊन, या सामूहिक लढ्याला बळ देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

****

बीड जिल्ह्यातली सर्व कामं ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावीत, कोणतीही कामं अर्धवट राहू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातल्या ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्याचं, पालकमंत्री पवार यांनी सांगितलं.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीचा ८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय काल मंजूर करण्यात आला, तर ७६५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली. नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या ५०६ कोटी ३८ लाख रुपयाच्या प्रारुप आराखड्याला काल मान्यता देण्यात आली.

परभणी जिल्ह्यासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजना २०२६–२७ साठी निर्धारित करून दिलेली कमाल वित्तीय मर्यादा ३११ कोटी रुपये आहे. जिल्ह्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी या बैठकीत केली.

****

धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाने काल पाहणी केली. भूम तालुक्यातल्या चिंचपूर – ढगे, चिंचपूर वालवड तसंच बेलगाव इथल्या बाधित शेतकऱ्यांशी पथकाने संवाद साधून सविस्तर माहिती घेतली. कोल्हापुरी बंधारा, तसंच शाळा, अंगणवाडी इमारत आणि ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या नुकसानाची पथकाने पाहणी केली. त्यापूर्वी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी नुकसानीची सविस्तर माहिती दिली.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातही सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पाथर्डी अणि शेवगाव तालुक्यातल्या विविध गावांत झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाने काल पाहणी केली.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे २०२०च्या खरीप हंगामातील पीकविम्याचे १३४ कोटी रुपये जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

****

जालना औद्योगिक वसाहत फेज तीनमध्ये असलेल्या ठिबक सिंचनचं उत्पादन करणाऱ्या कंपनीला काल दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या चार बंबाच्या मदतीने तीन तासात ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं.

****

परभणीच्या महापौर पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सय्यद इकबाल तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची बहुमताने निवड करण्यात आली. इकबाल यांना ३७ मतं तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना २६ मतं मिळाली. उपमहापौर पदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी ३८ मतं मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाझेमा शेख यांचा पराभव केला.

****

लातूरच्या नवनिर्माचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी काल मनपातील अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. उद्या रविवारपासून सुरू होणारी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा तसंच शिवजयंतीच्या अनुषंगाने महापौर सोनकांबळे यांनी विविध सूचनाही केल्या.

****

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेनं वाशी तालुक्यातल्या दशमेगाव शिवारातून अफूची ४८५ किलो वजनाची झाडं जप्त केली. याप्रकरणी मनोहर उघडे या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

बीड जिल्ह्यात नेकनूर पोलिसांनी एका शेतात छापा मारत ११ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत २ लाख ७८ हजार ७५० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली.

****

जागतिक रेडिओ दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर इथले रेडिओ प्रेमी संजय पवार यांनी आज रेडिओ प्रदर्शन आयोजित केलं आहे. एन आठ परिसरात वेणुताई चव्हाण शाळेजवळ आयोजित हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. सुमारे चारशेहून अधिक विविध प्रकारचे रेडिओ या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

****

बनारस हिंदू विद्यापीठाच्या कला शाखेने महात्मा गांधी विद्यापीठातल्या महागामीच्या संचालक गुरू पार्वती दत्ता यांना 'कौस्तुभ कला रत्न सन्मान' प्रदान केला. या विद्यापीठाने पंडित बिरजू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या विशेष ध्रुपदंगी कथक कार्यशाळेत पार्वती दत्ता यांनी मार्गदर्शन केलं.

****

जालना जिल्हा बालविवाहमुक्त करण्याच्या दिशेने काल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 'बालविवाह निर्मूलन चित्ररथाचं उद्घाटन करण्यात आलं.

****

क्रिकेट

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने नामिबियावर ९३ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करत नऊ बाद २०९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास आलेला नामिबियाचा संघ ११६ धावांवर सर्वबाद झाला. ५२ धावा आणि दोन बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पंड्या सामनावीर ठरला.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...