Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
राज्यभरात उत्साहात साजरी; किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा
· कृत्रिम बुद्धिमत्तेला खुल अवकाश देतांना, त्याचं नियंत्रण आपल्या हाती असणं आवश्यक, पंतप्रधानांचं प्रतिपादन
· मुंबई हवामान परिषदेचा राज्यपाल आचार्य
देवव्रत यांच्या उपस्थितीत समारोप
· एसटीच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात
८ हजार ३०० गाड्या दाखल होणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती
आणि
· राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या
परीक्षेला उद्यापासून सुरुवात
****
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
आज उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रत होत आहेत.
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या
उपस्थितीत शिवजन्माचा सोहळा साजरा झाला. शिवरायांची पालखी पूजन तसंच पाळणा उत्सवात
मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेला मार्ग विकासाचा आणि प्रत्येकाच्या
उत्थानाचा मार्ग असल्याचं प्रतितपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. त्यांनी पुण्यातील
सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा केली. येत्या चार वर्षांनी महाराजांचा चारशेवा
जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते
म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलतांना, शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी विकास आराखड्यासह इतरही स्मारकांसंदर्भात दिवंगत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं नमूद केलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना शिवाजी महाराज हे काळाच्या पुढे
विचार करणारे राजे असल्याचं सांगितलं. शिवनेरी आणि जुन्नर भागाचा विकास, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग, तसंच सुरक्षित आणि स्वाभिमानी महाराष्ट्र
घडवण्याचा त्यांनी संकल्प केला.
****
शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर सह सर्वत्र विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -
छत्रपती संभाजीनगर इथं ठिकठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहन फेरी काढण्यात येत आहेत. विविध ठिकाणी
रक्तदान शिबीर तसंच आरोग्य तपासणी शिबीरासह, विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाला जिल्हा नियोजन
समितीकडून मिळालेल्या नऊ चारचाकी वाहनांचं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याहस्ते लोकार्पण
करण्यात आलं.
ही शिवजयंती शिस्तबद्ध आणि कायदेशीर बाबीचं पालन
करून डीजे मुक्त वातावरणात साजरी करण्याच्या पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांच्या
आवाहनाला जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातल्या क्रांती चौक
येथे पाच हजार युवतींना भगवे फेटे बांधण्यात येणार आहेत.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
प्रशासकीय इमारतीत कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
बीड इथं आज सकाळी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची
शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, यांच्यासह इतर अधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं
उपस्थित होते.
बीड इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक
कार्यक्रमात प्रिया पवार यांनी एकच राजा इथे जन्मला शिवनेरीच्या किल्लयावर, हे गाणे सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं.
शिवजयंतीनिमित्त लातूर इथं ‘गौरव गाथा शिवरायांची’
या कार्यक्रमांतर्गत शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग रंगमंचावर साकारण्यात
आले. त्यापूर्वी सादर झालेल्या ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ या कार्यक्रमात शाहिरी पोवाडे
आणि स्फूर्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन अपर जिल्हाधिकारी
शिल्पा करमरकर यांच्या हस्ते झालं.
****
धाराशिव शहरातील कलाकार कलायोगी राजकुमार कुंभार यांच्या कलाविष्कारातून, छत्रपती शिवाजी महाराज यांची 2D आणि 3D प्रकारातील अद्भुत कलाकृती
साकारण्यात आली आहे. या कलाकृतीची नोंद प्रक्रिया सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
शिवजयंतीनिमित्त तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची भवानी
तलवार अलंकार महापूजा आज मांडण्यात आली होती. भोसले घराण्याची कुलदेवता असलेल्या श्री
तुळजाभवानी मातेने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.
देवीची ही पूजा पाहण्यासाठी अनेक भाविक आज तुळजापुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये
तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं
पूजन करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण
आहे. जालना शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवाद करण्यासाठी सकाळपासून
शिवभक्तांची गर्दी झाली आहे. ठिकठिकाणी आकर्षक मिरवणुका, व्याख्याने, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान आणि सामाजिक उपक्रमही
राबवले जात आहेत.
****
आर्टिफिशिल इंटेलिजन्स-एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेला खुल
अवकाश देतांना, त्याचं नियंत्रण आपल्या हाती असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज दिल्लीत भारत मंडपम इथं भारत एआय
शिखर परिषदेचं औपचारिक उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. एआयच्या संदर्भात मानव ही
नवी संकल्पना पंतप्रधानांनी सादर केली. ही संकल्पनाच २१ व्या शतकात मानवतेच्या कल्याणाचं
मुख्य माध्यम ठरेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. कृत्रीम
बुद्धिमत्तेच्या वापराबाबत पंतप्रधान म्हणाले -
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जगातली सर्वात मोठी तरुण लोकसंख्या, आणि सर्वात मोठ्या तंत्रज्ञान
प्रतिभेचं केंद्र असलेल्या भारतात एआय परिषदेचं आयोजन होत असून, ग्लोबल साऊथ मधल्या देशांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असं पंतप्रधान म्हणाले. या परिषदेला जगभरातले नेते आणि उद्योग आघाडीच्या कंपन्यांचे
मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत.
****
रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी
हानी होत असून, रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल
आचार्य देवव्रत यांनी केल. ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथं मुंबई हवामान परिषदेच्या
समारोप प्रसंगी बोलत होते. पर्यावरण तज्ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना
कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असं आवाहनही राज्यपालांनी
केलं. या परिषदेच्या माध्यमातून हवामान बदलाच्या गंभीर प्रश्नावर देश-विदेशातल्या तज्ज्ञांनी
चिंतन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचं अभिनंदन केलं.
****
एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढच्या काही वर्षांत २० ते
२५ हजार बसगाड्या खरेदी करण्याला राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून, यंदा पहिल्या टप्प्यात ८ हजार ३०० गाड्या दाखल होणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी
महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य शासनानं
महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्यानं
प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला. सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास
करतात; मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत, असं त्यात म्हटलं आहे.
****
२०२७ ची जनगणना डिजिटल पद्धतीनं होणार असून ती अचूक आणि पारदर्शक
करताना राष्ट्रीय मानकांचं पालन करून वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज व्हावं, असं आवाहन महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण यांनी केलं आहे.
जनगणना २०२७ च्या अनुषंगानं आयोजित राज्यस्तरीय संमेलनात ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे
मार्गदर्शक करत होते. नारायण यांनी जनगणनेचं घटनात्मक महत्त्व सांगत, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसह वित्त आयोगाच्या शिफारशी तसंच
केंद्र आणि राज्यांच्या अनेक योजनांचा पाया जनगणना आकडेवारीवर आधारित असल्याचं सांगितलं.
****
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
होत आहे. राज्यभरातील सोळा लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत
शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. १८ मार्च पर्यंत
दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे.
****
लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवालय इथं
महाशिवरात्री पासून यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी
भव्य पशुपक्षी, अश्व आणि श्वान प्रदर्शन भरणार आहे. यात्रा समिती, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि लातूर पंचायत समिती यांच्यातर्फे हा उपक्रम
होणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य स्मॉल ॲण्ड मीडियम न्यूज पेपर्स असोसिएशन या संघटनेच्या वतीनं देण्यात येणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार नांदेड इथले जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना जाहीर झाला आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-बार्टी आणि
छत्रपती संभाजीनगर इथलं महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
अनुसूचित जाती प्रवर्गातल्या युवक–युवतींसाठी अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण
कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment