Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
·
जागतिक व्यासपीठावर ग्लोबल साऊथचा
बुलंद आवाज म्हणून भारताची ओळख - पंतप्रधानांचं
प्रतिपादन
·
राष्ट्रपती अभिभाषणाचा आभारप्रस्ताव
लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर
·
ॲप-आधारित वाहन सेवा देणाऱ्या
‘भारत टॅक्सी’ सुविधेचं
उद्घाटन
·
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या
निवडणुकीचा प्रचार थंडावला
आणि
·
धाराशिव इथं कॅन्सर जनजागृतीसाठी
साडी वॉकेथॉनचं आयोजन
****
जागतिक व्यासपीठावर ग्लोबल साऊथचा बुलंद आवाज म्हणून भारताची ओळख निर्माण झाल्याचं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद
प्रस्तावाच्या चर्चेला ते आज राज्यसभेत उत्तर देत होते. गेल्या काही दिवसांत जागतिक
पातळीवर अनेक मोठे व्यापारी करार भारतानं केल्याचं, पंतप्रधानांनी
सांगितलं. ते म्हणाले -
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान,
पंतप्रधानांनी फक्त राज्यसभेत भाषण करण्याला काँग्रेस अध्यक्ष
तथा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतला. संसदेत राज्यसभा हे एकच
सभागृह नसून लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते, असं
खरगे यांनी नमूद केलं. दरम्यान, खरगे यांनी माजी लष्करप्रमुख
मनोज नरवणे यांच्या पुस्तकातला मजकूर वाचून दाखवायची परवानगी सभापतींकडे मागितली, ती नाकारण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
****
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभारप्रस्ताव आज लोकसभेनं आवाजी मतदानानं मंजूर केला.
आभारप्रस्ताव मंजुरीचा प्रस्ताव खासदार सर्वानंद सोनोवाल यांनी मांडला, त्याला तेजस्वी सूर्या यांनी अनुमोदन दिलं.
बाईट - अध्यक्ष ओम बिर्ला
त्याआधी सभागृहात आजचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या
सदस्यांच्या कालच्या वर्तनावर नापसंती व्यक्त केली. विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी
करत सत्ताधारी बाकांकडे धावले. हे वर्तन सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन असल्याचं अध्यक्षांनी
सांगितलं. विरोधकांच्या अशा अप्रिय कृतीच्या शक्यतेमुळे आपणच पंतप्रधानांना सदनात येऊ
नये,
अशी विनंती केल्याचा खुलासाही अध्यक्ष बिर्ला यांनी केला. विरोधी
पक्षाच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज दुपारी बारा, दोन
आणि नंतर दुपारी तीन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
ॲप-आधारित वाहन सेवा देणाऱ्या ‘भारत
टॅक्सी’
सुविधेचं आज उद्घाटन झालं. नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री
अमित शाह यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. हा भारताचा पहिला सहकारी-आधारित राईड-हेलिंग
प्लॅटफॉर्म आहे. भारत टॅक्सीची संकल्पना दळणवळण क्षेत्रातला एक परिवर्तनकारी उपक्रम
ठरेल,
सेवा देणाऱ्या चालकाला सारथी या नावानं संबोधलं जाईल, याद्वारे ‘बाईक दीदी’
सारखे उपक्रम राबवले जात असून आतापर्यंत दीडशेहून अधिक महिला
चालक भारत टॅक्सीमध्ये सहभागी झाल्या आहेत. पुढच्या तीन वर्षांत देशभरात या सेवेचा
विस्तार होईल,
असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह
****
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात आज आठ महिला कार्यकर्त्यांसह बारा नक्षलवादी कार्यकर्त्यांनी
आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून ५४ लाख रुपये बक्षीस होतं. तत्पुर्वी, सकाळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवादी कार्यकर्त्यांनी
एक एके-४७ रायफलसह शस्त्रे आणि दारुगोळाही जमा केला. मुख्य प्रवाहात परतलेल्या या नक्षलवादी
कार्यकर्त्यांनी भारताच्या संविधानावर विश्वास व्यक्त करत लोकशाही व्यवस्थेत सन्मानाने
आणि सुरक्षित जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. पुनर्वसन प्रक्रियेअंतर्गत, प्रत्येक आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवादी कार्यकर्त्याला प्रोत्साहनपर म्हणून तत्काळ
५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा प्रचार आज
संपत आहे. येत्या शनिवारी, सात तारखेला मतदान होणार असून, नऊ तारखेला मतमोजणी होईल. या निवडणुकांसाठी मतदारांना आपलं नाव आणि मतदान केंद्र
सहज शोधता यावं,
यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध
करून दिलं आहे.
****
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुजाता सूरज पाटील यांची तर उपमहापौरपदी
भाजपाचे दशरथ सीताराम भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी शिवसेनेच्या
उमेदवारांनीही अर्ज भरले होते, मात्र त्यांनी माघार घेतली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन नगरसेवक, मनसेचा
एक नगरसेवक,
आणि एक अपक्ष नगरसेवक यांनीही भाजपाला पाठिंबा दिला आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला नववा अर्थसंकल्प देशाला
दिशा देणारा आहे, असं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण
यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या अर्थसंकल्पातून
भारताची वेगवान आर्थिक घोडदौड, सर्वसमावेशक विकासाप्रती कटीबद्धता
आणि विकसित भारताचे उद्दिष्ट स्पष्ट होतं, असं
चव्हाण यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट - माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण
****
अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले ३९ विद्यार्थी आणि
दोन शिक्षकांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत. नासा या आंतरराष्ट्रीय अवकाश
संशोधन संस्थेच्या आर्टेमिस-२ मोहिमेत त्यांचा ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे. या
विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पास नासाकडून देण्यात आले आहेत. या मोहिमेत व्हर्चुअल
गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आवाहन केलं होतं, अशी
माहिती शाळेतील शिक्षक नारायण मंगलारम यांनी दिली.
****
धाराशिव इथं कॅन्सर जनजागृतीसाठी साडी वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. ८ फेब्रुवारी
रोजी होणारं हे वॉकेथॉन ओस्ला ओयासीस लेडीज फाउंडेशन, धारासुर
मर्दिनी महिला फेडरेशन, धाराशिव आयएमए डॉक्टर वुमन्स
विंग,
धाराशिव अक्षरवेल महिला साहित्य मंडळ आणि निमा वुमन्स फोरम धाराशिव
यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात कॅन्सर जनजागृती मार्गदर्शन
करण्यासाठी पुणे इथून डॉ. श्रुती गांधी मार्गदर्शन करणार असून, डॉ. माया जगदीश पाटील, पुर्वी अभय गजेंद्रगडकर, प्रतिभा श्रीकांत देशमुख, स्नेहा बर्डे, प्रगती कोळगे या कर्तृत्ववान महिलांना धाराशिव नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित
करण्यात येणार आहे.
****
नांदेड इथं आजपासून विश्वशांती महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला. जगदगुरु केदार
पीठाधीश्वर भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांचा पट्टाभिषेक रौप्य महोत्सव देखील
होत आहे. हा आध्यात्मिक सोहळा १२ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
****
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे येणारी वाहतूक तब्बल ३३ तासानंतर सुरळीत
झाली. खंडाळा घाटात मंगळवारी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील
वायू घेऊन जाणारा एक टँकर उलटल्यानं वाहतूक खोळंबली होती. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या
लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनातले प्रवासी, महिला
आणि लहान मुले यांची गैरसोय झाली. दूध आणि भाजीपाल्याची वाहतूक करणारे ट्रक देखील अडकून
पडल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला.
एसटी महामंडळालाही शिवनेरी आणि साध्या गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्यानं
एसटीच्या एकट्या पुणे विभागाचं एक दिवसात सुमारे ५० लाख रुपयांचं नुकसान झालं. मुख्यमंत्र्यांनी
या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
****
ओदिशामधल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम मध्ये १० ते १५ फेब्रुवारी
दरम्यान होणार असलेल्या एफ आय एच प्रो लीग स्पर्धेसाठी हॉकी इंडियानं २४ खेळाडूंच्या
पुरुष संघाची निवड केली आहे.
****
No comments:
Post a Comment