Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या
अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव पारित झाला. विरोधी पक्षांच्या गदारोळातच आवाजी मतदानाने
हा प्रस्ताव पारित करण्यात आला.
दरम्यान, विविध मुद्यांवरुन
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आजही बाधित झालं. विरोधकांच्या कालच्या
वर्तनावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहाची प्रतिष्ठा
राखणं ही सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र गदारोळ
सुरुच राहील्यानं अध्यक्षांनी सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन
वाजेपर्यंत स्थगित केलं.
दरम्यान, राज्यसभेत
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर
देणार असल्याचं, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात
जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या AI Impact शिखर परिषदेची धुरा उचलल्याबद्दल
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी भारताची प्रशंसा केली आहे. आंतरराष्ट्रीय
संबंधांच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, सध्याच्या
काळातील मोठ्या जागतिक आव्हानांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केले. येत्या १९ आणि
२० फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या भारत–AI Impact शिखर परिषदेत
सहभागी होण्यासाठी अँटोनियो गुटेरस भारतात येणार आहेत. या शिखर परिषदेत जनता, वसुंधरा आणि
प्रगती या तीन तत्त्वांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
****
केंद्रीय सहकार मंत्री अमित
शाह आज देशातल्या पहिल्या सहकार आधारित भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ करणार आहेत. देशातल्या
सहकार क्षेत्राला बळकटी देणं तसंच सर्वसमावेशक आणि नागरी केंद्रित परिवहन उपाययोजनांना
चालना देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारत टॅक्सी मंचात चालकांना “सारथी” म्हणून
मालकी, संचालन आणि मूल्यनिर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. भारत टॅक्सी सेवा
शून्य कमिशन आणि कोणतंही अतिरिक्त शुल्क नसलेल्या किंमत मॉडेलवर कार्यरत राहणार असून, यामधल्या नफ्याचा
थेट लाभ चालकांना मिळणार आहे. तसंच आरोग्य विमा, अपघात विमा, सेवा निवृत्ती
बचत योजना आणि समर्पित चालक समर्थन प्रणालीद्वारे सारथींच्या सामाजिक सुरक्षेला प्राधान्य
देण्यात येणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
सात आणि आठ फेब्रुवारीला मलेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर
इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी
मलेशियाच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करणार असून सहकार्य वृद्धीसाठी विविध उद्योगांच्या
प्रतिनिधींशी बैठका घेतील.
****
छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यात
आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला आहे. या परिसरात
सशस्त्र नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने
शोधमोहीम सुरू केली. चकमकीच्या ठिकाणाहून काही शस्त्रं जप्त करण्यात आली असून, शोधमोहीम अद्याप
सुरूच आहे.
****
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा
आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा पत्रचार आज संपत आहे. यात सात तारखेला मतदान
होणार असून, नऊ तारखेला मतमोजणी होईल. या निवडणुकांसाठी मतदारांना आपलं नाव आणि मतदान केंद्र
सहज शोधता यावं, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे.
****
बीड तालुक्यात घरकुल योजनेंतर्गत
एकूण २५ हजार ३५३ लाभार्थी उद्दिष्ट असून, त्यापैकी २३ हजार ३८६ घरकुलांना
मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १९ हजार ८७५ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला
असून सध्या सुमारे ७ हजार १०० घरकुलांचं काम प्रगतीपथावर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर
सुरू असलेल्या घरकुल बांधकामासाठी वाळू ही अत्यावश्यक बाब असल्याने मोफत वाळू वितरण
योजना ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. बीड तालुक्यात दहा वाळू घाट निश्चित
करण्यात आले आहेत.
अथरवन पिंपरी जवळील टुकूर
नदीपात्रात खांडे पारगाव इथल्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचं वितरण करण्यात आलं.
बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ
इथं होणारा महाशिवरात्र यात्रा महोत्सव उत्साहात आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने
सर्व यंत्रणा सज्ज ठेवून नियोजनबद्ध काम करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांनी दिले. यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. महाशिवरात्र यात्रा
१५ फेब्रुवारी रोजी सुरु होणार असून, पाच दिवस हा महोत्सव चालणार
आहे. यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था, भाविकांची गर्दी, आरोग्य सुविधा
आणि स्वच्छता तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
****
लातूर परिमंडलातील २३ हजार
५६६ वीज ग्राहकांनी वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत फक्त 'ईमेल' आणि 'एसएमएस'चा पर्याय
निवडला आहे. या वीजग्राहकांना २८ लाख २७ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
****
No comments:
Post a Comment