Friday, 13 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप; दुसरा टप्पा नऊ मार्चपासून

·      लोकसभेत राहुल गांधी यांच्याविरोधातल्या ठरावावर अध्यक्षांशी चर्चा करुन निर्णय घेणार मात्र हक्कभंग ठराव आणणार नसल्याचा सरकारचा निर्णय

·      सेवातीर्थ’ इमारत संकुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

·      जागतिक रेडियो दिनानिमित्त विविध कार्यक्रम

·      परळी इथं ‘महापशूधन एक्सपो’चं मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन

आणि

·      महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नऊ मार्चपासून सुरू होईल, आणि दोन एप्रिलपर्यंत चालेल. लोकसभेत आज अखेरच्या दिवशीही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरुन गदारोळ केल्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर नऊ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलं.

****

सरकारच्या कडधान्य स्वावलंबन अभियानामुळे २०३०-३१पर्यंत देश कडधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तासात कडधान्य आणि त्यासंदर्भातल्या विविध प्रश्नांना ते उत्तर देत होते. शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधीची स्थापना केली आहे. यामुळे नाशवंत शेतमालाच्या नुकसानाच्या प्रमाणात पाच ते १५ टक्के घट झाल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

 

प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभापती सी पी राधाकृष्णन यांनी राज्यसभेचं कामकाजही नऊ मार्चपर्यंत तहकूब केलं.

****

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दाखल केलेल्या मूळ प्रस्तावानुसार कार्यवाहीचा निर्णय सरकारने घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. दुबे यांचा हा प्रस्ताव लोकसभाध्यक्षांशी चर्चेनंतर विशेषाधिकार समितीकडे पाठवला जाईल किंवा थेट सदनात चर्चेसाठी आणला जाणार असल्याचं रिजीजू यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू

 

दुबे यांनी दाखल केलेला हा प्रस्ताव विचाराधीन असल्यामुळे गांधी यांच्याविरोधात वेगळा हक्कभंग प्रस्ताव आणला जाणार नसल्याचं, रिजीजू यांनी सांगितलं. दुबे यांनी या प्रस्तावात गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्याची तसंच त्यांना आजीवन निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

****

नवी दिल्लीत ‘सेवातीर्थ’ इमारत संकुलाचं अनावरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय तसंच मंत्रिमंडळ सचिवालयाचा समावेश आहे. सेवातीर्थसोबतच कर्तव्यभवन १ आणि २ यांचं औपचारिक उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. या नव्या इमारतींमुळे वित्त, संरक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृषी यासह अनेक महत्त्वाची मंत्रालयं प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा जागेतून कामकाज करणार आहेत.

सेवा तीर्थ म्हणजे कर्तव्य, करुणा आणि राष्ट्र प्रथम यासाठी आमच्या कटिबद्धतेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांच्या सेवेचा अतुट संकल्प आणि नागरिक देवो भव या पवित्र भावनेनं आज सेवा तीर्थ राष्ट्राला समर्पित करण्याचं भाग्य लाभत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे सेवातीर्थ येणार्या पिढ्यांना नि:स्वार्थ सेवा आणि जनतेच्या कल्याणासाठी समर्पित होऊन पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल अशी अशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.

दरम्यान, या कार्यालयात स्थलांतरित झाल्यानंतरच्या पहिल्याच निर्णयांमध्ये, पंतप्रधान मोदी यांनी पीएम राहत योजना, लखपती दिदींचं लक्ष्य दुप्पट करून सहा कोटी रुपये, कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून दोन लाख कोटी रुपये आणि स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स ला १० हजार कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी दिली आहे. शेतकरी, महिला, युवक आणि तळागाळातल्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित महत्त्वाच्या फायलींवर पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली.

****

केवळ आवाजाच्या माध्यमातून जग जोडणाऱ्या प्रसारण कर्मींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १३ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक रेडियो दिवस म्हणून साजरा केला जातो. रेडियो तंत्रज्ञानाला डिजिटल तंत्रज्ञानाची आणि इंटरनेटची जोड मिळाल्यावर आवाजाचं हे माध्यम अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहचत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा या माध्यमातला वापर हे साधन राहील, ते मानवी आवाजाची जागा घेऊ शकणार नाही अशी यंदाच्या रेडियो दिनाची संकल्पना आहे.

सार्वजनिक प्रसारण सेवेत ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं माध्यम म्हणून आकाशवाणी गेली अनेक वर्ष चोख कामगिरी बजावत आहे. आकाशवाणीच्या वतीने छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आज जागतिक रेडिओ दिन परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात व्हॉक्स अँड व्हाईब्ज हा पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथले रेडिओ प्रेमी संजय पवार यांनी आज रेडिओ प्रदर्शन आयोजित केलं आहे.

****

परळी इथं पशुसंवर्धन विभागाच्या ‘महापशूधन एक्सपो’ या राष्ट्रीय पशू प्रदर्शनाचं आज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. महाशिवरात्रीच्या औचित्याने प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आयोजित हा उपक्रम राज्यातल्या शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार. पशुपालकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुंडे यावेळी म्हणाल्या. ग्रामीण भागातला पशुपालक हा केवळ शेतकरी न राहता उद्योजक कसा बनेल, यासाठी सरकार प्रयत्नशील असून, पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे वीज बिलात सवलतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. यावेळी मुंडे यांनी विविध पशुधन प्रजातींची पाहणी करुन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी मान्यवर उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या जैतापूर इथल्या महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या परिक्षेदरम्यान उघडकीस आलेल्या कॉपी प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करणार असल्याचं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाशिवरात्रीचा उत्सव येत्या रविवारी साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येतात, या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विवेककुमार राठोड यांनी मंदिराची पाहणी करून सुरक्षा तसंच प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ परिसरात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांसह जवळपास दोन हजार जणांनी वेरुळ परिसरातील येळगंगा नदी, मालोजीराजे भोसले गढी परिसर, अरिहंत चौक, लेणी परिसर स्वच्छ केला.

दरम्यान, महाशिवरात्र काळात वेरुळ गावात जाण्यास वाहनांना परवानगी नसेल. आजपासून सोमवारपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावरील कॅंम्ब्रिज शाळेपासून दहा किलोमीटर पर्यंत शेंद्राला जाणाऱ्या रस्त्यावर ऑईल सांडल्याने या मार्गावरुन वाहनं घसरुन अपघाताच्या घटना घडत आहेत. दुपारपर्यंत सात अपघात झाले असून यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. वाहनधारकांनी या मार्गावरुन जातांना विशेष सावधानता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाया उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या रिडज इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तीन टप्प्यात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात तिसऱ्या टप्प्यात तालुक्यातून उत्कृष्ट नियोजन, शैक्षणिक गुणवत्ता, शाळेची स्वच्छता आणि सुशोभीकरण, या विविध निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आलं.

****

परभणी जिल्हा पोलिस दलातल्या ९७ रिक्त जागांसाठी होणारी शिपाई आणि शिपाई चालक भरती प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. पाच मार्चपर्यंत चालणार्या या प्रक्रियेत रोज एक हजार युवक-युवतींची चाचणी घेतली जाणार आहे. यंदाच्या भरतीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे. गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे

****

आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी आज चार सुवर्ण पदकं पटकावली. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन सांघिक प्रकारात सिफ्त कौर सामरा, तेजस्विनी सावंत आणि मानिनी कौशिक यांच्या चमूने सुवर्ण पदक जिंकलं. याच प्रकारात महिलांच्या कनिष्ठ गटात धावलीका देवी, प्राची गायकवाड आणि अनुष्का ठोकूर यांनीही सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या वरिष्ठ गटात २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल सांघिक प्रकारात मनप्रीत सिंग, गुरुप्रीत सिंह आणि अंकुर गोयल यांनी, तसंच पुरुषांच्या कनिष्ठ गटात २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात मुकेश नेलवल्ली, अभिनव देशवाल आणि सुरज शर्मा यांनी सुवर्ण पदक पटकावलं.

****

क्रिकेट

पुरूषांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज कोलंबो इथं झालेल्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी मात दिली. दिल्ली इथं कॅनडा आणि युएई दरम्यान सुरू आहे. आज रात्री अमेरिका आणि नेदरलँडदरम्यान सामना होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...